मराठा राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा!
By अतुल कुलकर्णी | Published: December 11, 2017 12:28 AM2017-12-11T00:28:46+5:302017-12-11T00:58:34+5:30
मराठा पार्टी ही राष्ट्रवादीची प्रतिमा पुसण्यास जर मदत होत असेल तरी ती पवारांना हवीच आहे.
सरत्या आठवड्यात काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करून भाजपात आलेल्या प्रसाद लाड यांना विधानसभेची लॉटरी लागली. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्याने रिकाम्या झालेल्या जागेवर लाड निवडून आले. काँग्रेसने जनआक्रोश आंदोलन तर राष्ट्रवादीने यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल यात्रा काढली. राज्यात दोन्ही काँग्रेस सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या असताना मुंबईत मात्र दोन्ही काँग्रेसची मिळून नऊ मतं भाजपाच्या पारड्यात पडली. त्यातली तीन मतं जगजाहीर होती. नीतेश राणे, कालिदास कोळंबकर हे दोन काँग्रेसी आमदार आणि राष्ट्रवादीचे रमेश कदम यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या असल्या तरीही दोन्ही काँग्रेसच्या सहा मतांवर भाजपाने हल्लाबोल केला. त्यासाठी कोणाला कोणत्या देवाचा प्रसाद मिळाला याची चर्चा आता रंगली आहे. भाजपाची रणनीती यशस्वी ठरली अशा कौतुकाच्या बातम्याही सुरू झाल्या. पण प्रसाद वाटप चालू असताना कोणी हात पुढे केला तर त्यात नवल ते काय? देणा-यानेच साधनसुचिता ठेवली नसेल तर घेणा-याला तरी का दोष द्यायचा? आपल्या पक्षाचे नेते रोज दहा पंधरा किलोमीटरची पायपीट करत आंदोलन करत असताना काही आमदार सरकारी पक्षाच्या गळ्यात गळे घालतात याची चिंता मात्र आता दोन्ही काँग्रेसने करण्याची वेळ आली आहे.
हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीला राज्यभर नेता येईल असा चेहरा धनंजय मुंडेच्या रूपाने मिळाला आहे. या हल्लाबोल यात्रेत जो प्रतिसाद धनंजय मुंडेंना मिळतोय तेवढा राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांना मिळताना दिसलेला नाही. विदर्भात एका शेतकºयाने आपल्या उभ्या कापसावर ट्रॅक्टर चालवा आणि शेत मोकळं करा अशी भावनिक सादही धनंजय मुंडेंना सुप्रिया सुळेंच्या समोर घातली. त्याचे कारण सरळ आहे. मुंडेंची पाटी कोरी आहे. त्यांच्या आक्रमकपणामुळे ते काहीतरी करून दाखवतील असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. आधीचे नेते ‘टेस्टेड’ आहेत. त्यांच्या मर्यादा आणि क्षमता पंधरा वर्षात जनतेने पाहिल्या आहेत. म्हणूनच या हल्लाबोल यात्रेत म्हणावा तसा प्रतिसाद आपल्याला मिळत नाही हे लक्षात येताच काही नेत्यांवर पक्षाचा ध्वज खांद्यावर घेऊन तीन चार किलोमीटरचा प्रवास केल्याच्या बातम्या देण्याची वेळ आली.
आर.आर. पाटील पक्षाचा चेहरा असतानाही त्यांना त्यावेळी पक्षाने कधी तसे प्रोजेक्ट केले नव्हते. त्याचे भले बुरे परिणाम पक्षाला भोगावेही लागले. आता लोक धनंजय मुंडेंना पहायला, ऐकायला येत आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्या कामाचे मूल्यमापन वेगळ्या विश्लेषणाचा भाग असला तरी आज लोक त्यांच्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काळाची ही बदललेली पावले ओळखूनच शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला बारामती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुंडेंच्या प्रचारसभा ठेवाव्या लागल्या. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने आणि विविध निवडणुकांसाठी सातत्याने मुंडे राज्यभर फिरत आहेत. अजित पवार, सुप्रिया सुळे त्यांना पुढे करत आहेत. यानिमित्ताने मराठा पार्टी ही प्रतिमा पुसण्यास मदत होत असेल तरी ती पवारांना हवीच आहे. शिवाय मुंडेंच्या रूपाने ओबीसींचा नेता उभा रहात असेल तर त्याचा फायदा ओळखण्याइतके पवार कुटुंबीय चाणाक्ष आहेत.