मराठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:13 AM2018-02-26T00:13:46+5:302018-02-26T00:13:46+5:30

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! ही ओळ केवळ कविता म्हणून नाही तर आपले जीवन-सत्त्व आहे. यातील भाग्य हा शब्द केवळ मराठी बोलणा-या, असणा-या माणसासाठी आहे. ते मान्य करायलाच हवे.

 Marathi | मराठीच

मराठीच

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! ही ओळ केवळ कविता म्हणून नाही तर आपले जीवन-सत्त्व आहे. यातील भाग्य हा शब्द केवळ मराठी बोलणा-या, असणा-या माणसासाठी आहे. ते मान्य करायलाच हवे. उद्या मराठी भाषा दिन. मराठी भाषेचा जागर करण्याचा दिवस. कुणीही अभिमान बाळगावा असा. मराठीचे प्रेम म्हणजे इंग्रजीचा दु:स्वास नाही. तिने एक बºयाच देशांशी संपर्क करण्याची भाषा म्हणूनच राहावे. जगाचं बोलणं समजण्यासाठी ती खिडकी आहे. परंतु खिडकी म्हणजे दार नाही तो दरवाजा कायम मराठीसाठीच राहणार आहे.
मराठीच्या भवितव्याची काळजी करताना मराठी भाषा आणि शाळा हा कायम चिंतेचा विषय असतो. पण अलीकडे बहुसंख्य कार्यालये, त्यांची परिभाषा मराठीच होत असताना त्या गोष्टीकडे पहावे. म्हणजे महदाईसा महदंतचा धावा, धवळे, लीळाचरित्र मुकुंदराज, ज्ञानेश्वर ते फुले, शाहू, आंबेडकर या सर्वांनी मराठीला अतिशय कणखरपणे जपले, जोपासले, वाढविले. तिचे अभिजातपण अबाधित ठेवले. यात शासनापासून सगळे प्रयत्नशील आहेत. असायलाच हवेत. वेगवेगळ्या समित्या कायम काम करीत असतात. त्यांचे अहवाल आपण वाचतोही. हा मराठी प्रवास इतर भाषांना सांभाळून सावरून पुढे होतो. म्हणून तिला ‘अभिजात’ दर्जा प्राप्त होईपर्यंत लढत राहायला हवेच. मराठी भाषा भवन दिमाखाने स्थापन व्हायला हवे. मुंबईत जागा नसेल तर सगळी यंत्रणा इतरत्र हलविता येईल. कदाचित ते खर्चिक, वेळघेऊही काम असेल. पण मराठीचे प्रेम अबाधित राहायलाच हवे. मराठी टिकेल न टिकेल हे गळा काढणे बंदच व्हायला हवे. हे स्वप्न नाही. भविष्यकाळ भीषण आहे वगैरे भाकड गोष्टी करण्यापेक्षा ‘भिलार’सारखी पुस्तकपेठ उभी राहाते आहे. आय.ए.एस.सारखी उच्च दर्जाची परीक्षा मराठीतून उत्तीर्ण होता येते. आपले संवादसाधन मराठीच असू शकते. या सगळ्या प्रगतीच्या खुणाच आहेत. कुसुमाग्रजांचा आत्मविश्वास वांझोटा नव्हता, नाही. फक्त डोळस प्रयत्न हवेत. अभिजात दर्जा मिळेल. मराठीचा अभ्यास फोफावेल ही आशा ठेवायलाच हवी तरच होकारार्थी मराठी महाराष्टÑ मराठी भारत आणि मराठी जग आपण पाहू शकू. परदेशातले लाखो मराठी बांधव हाच विश्वास जागवून आहेत. हा सकारात्मक दृष्टिकोनच आपल्याला म्हणायला आनंद देईल, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा.
-किशोर पाठक

Web Title:  Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी