पुनर्जन्मासाठी ताटकळलेली मराठी चित्रपटसृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 07:31 AM2021-03-24T07:31:01+5:302021-03-24T07:31:46+5:30
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीची घोडदौड असली, तरी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर होणारं कौतुक बॉक्स ऑफिसपर्यंत पोहोचत नाही, ही रडकथा कधी संपणार?
अमोल परचुरे, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत असोसिएट डायरेक्टर
मृत्यू आणि पुनर्जन्म यामधील तरल अवस्था म्हणजे बार्डो, अशी एक व्याख्या तिबेटी बौद्ध तत्त्वज्ञानात सांगितलेली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या निमित्ताने पुन्हा एकदा नीट तपासून पाहिलं तर मराठी चित्रपटसृष्टीची अशीच अवस्था आहे, असं जाणवतं. ‘श्वास’पासून ‘सैराट’पर्यंत अनेकदा कात टाकलेल्या मराठी चित्रपटाचा पुनर्जन्म कधी होणार, याची प्रतीक्षा आपण सगळेच करतोय आणि ही प्रतीक्षा लवकरच संपेल अशी अंधुकशी आशा राष्ट्रीय पुरस्कार बघून वाटतेय, एवढाच काय तो दिलासा!
नव्या दमाचे दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांनी घेतलेली राष्ट्रीय पुरस्कारांची भरारी नक्कीच कौतुकास्पद आहे. ज्या मराठी चित्रपटांना यश मिळालंय त्यांचे विषय, आशय, मांडणी यामध्ये विविधता दिसून येते. प्रतिभा, कौशल्य यात आपण कुठेही कमी नाही हे मराठी चित्रकर्मींनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. धानोरसारख्या छोट्याशा गावात एका शिक्षिकेची तळमळ भीमराव मुडे दिग्दर्शित ‘बार्डो’मध्ये दिसते. याच चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गीतासाठी सावनी रवींद्रला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला आहे.
पतीच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या ६५ वर्षीय ‘लता करे’ यांचा संघर्ष दिसतो ‘लता भगवान करे : एक संघर्षगाथा’ या चित्रपटात. दशावतार सादर करणाऱ्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यातले दशावतार सह-लेखक आणि दिग्दर्शक अभिजित वारंगने ‘पिकासो’मध्ये चितारले आहेत. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जीवनपट समीर विद्वांस यांनी ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटातून मांडला. मणिकर्णिकासारख्या भव्य-दिव्य चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘आनंदी गोपाळ’ला ‘प्रॉडक्शन डिझाईन’साठी पुरस्कार मिळणं ही खरंच खूप मोठी कामगिरी आहे. त्रिज्या या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट ध्वनिसंयोजन हा पुरस्कार पटकावला. गावातून थेट शहरात येऊन आदळलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा स्वतःचा शोध घेताना सुरू असलेला झगडा दिग्दर्शक अक्षय इंडीकरने ‘त्रिज्या’मध्ये दाखवलेला आहे. राष्ट्रीय एकात्मता विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिला जाणारा नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला ‘ताजमाल’ या चित्रपटाला. नियाज मुनावर दिग्दर्शित या चित्रपटात ‘ताजमाल’ हे एका बोकडाचं नाव आहे. चित्रपटात कुर्बानी प्रथेवर हसत-खेळत कोरडे ओढलेले आहेत.
नॉन-फिचर विभागात दिग्दर्शक राज मोरे यांना ‘खिसा’ या लघुपटासाठी पुरस्कार मिळाला. लहान मुलांचं विश्व खरंच निरागस राहिलंय का यावर विचार करायला लावणारा हा लघुपट आहे. विवेक वाघ दिग्दर्शित ‘जक्कल’ या माहितीपटालाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्यातील गाजलेल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडाचा तपास कशा प्रकारे झाला याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न या माहितीपटातून घेण्यात आला आहे. ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट वगळता इतर विजेते मराठी चित्रपट हे अजून सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेले नाहीत. ‘पिकासो’ हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे. आता इथे जर दाक्षिणात्य चित्रपटांशी तुलना केली तर काय दिसतं?
सुवर्णकमळ विजेता प्रियदर्शन दिग्दर्शित ‘मरक्कर’ असेल किंवा धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ज्या चित्रपटासाठी मिळाला तो ‘असुरन’ असेल... किंवा ‘सुपर डीलक्स’, ‘विश्वासम’सारखे चित्रपट असतील, बॉक्स ऑफिसवर ते प्रचंड यशस्वी ठरलेले आहेत आणि आता त्यांना राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मानही मिळालाय. मराठीच्या बाबतीत हेच चित्र नेमकं उलटं आहे. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीची घोडदौड गेली अनेक वर्षे सातत्याने दिसतेय; पण कौतुक बॉक्स ऑफिसपर्यंत पोहोचत नाही. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला असतानाही त्याचं महत्त्व सर्वसामान्य प्रेक्षकांना वाटत नाही का? हा प्रश्न दरवर्षी भेडसावतो. यावर्षी आनंद देणारा एक पुरस्कार म्हणजे ज्येष्ठ समीक्षक अशोक राणे यांच्या ‘सिनेमा पाहिलेला माणूस’ या पुस्तकाचा राष्ट्रीय पुरस्काराने झालेला गौरव. अशोक राणे यांचं अभिनंदन करीत असतानाच, त्यांचं पुस्तक वाचून मराठीत जास्तीत जास्त ‘सिनेमा पाहणारे डोळस प्रेक्षक’ तयार व्हावेत हीच आशा आपण बाळगू शकतो.
amolparchure@gmail.com