मराठी माणस आपणोच छे !
By सचिन जवळकोटे | Published: January 24, 2018 11:37 PM2018-01-24T23:37:24+5:302018-01-25T00:23:38+5:30
‘मराठी भाषेला कुणी वाली राहिला नाही,’ अशी तळटीप असलेली पोस्ट सदाशिव पेठेतल्या दामू तात्यांनी टाकताच अनेकजण सुग्रीवासारखे आक्रमक बनले. मराठीच्या बचावासाठी ‘सोशल मीडियावर कमेंटस्’चा भडीमार सुरू झाला. साºया जगाला कामाला लावून दामू तात्या मात्र दुपारी १ ते ४ वामकुक्षीत रममाण झाले.
‘मराठी भाषेला कुणी वाली राहिला नाही,’ अशी तळटीप असलेली पोस्ट सदाशिव पेठेतल्या दामू तात्यांनी टाकताच अनेकजण सुग्रीवासारखे आक्रमक बनले. मराठीच्या बचावासाठी ‘सोशल मीडियावर कमेंटस्’चा भडीमार सुरू झाला. साºया जगाला कामाला लावून दामू तात्या मात्र दुपारी १ ते ४ वामकुक्षीत रममाण झाले.
एवढ्यात दार वाजलं. ‘१ ते ४ बेल वाजवू नये. मोबाईलवर रिंगही देऊ नये,’ असा बोर्ड लावूनही त्यांची झोपमोड केली गेली. बाहेरची मंडळी त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेली. ‘मराठीसाठी नेत्यांनी काय केलं, याचा जाब विचारू. चला!’ मंडळींची तळमळ पाहून तात्याही निघाले. पुण्याच्या कट्ट्यावर राजकीय गप्पा मारणाºया मंडळींमध्ये त्यांना चक्क पृथ्वीबाबा क-हाडकर दिसले. ‘बाबा माणसात आले,’ या आश्चर्यानंदानं सा-यांनी एकमेकांकडं बघितलं. ‘मराठीसाठी काय करणार?’ असं विचारताच बाबा म्हणाले, ‘अजितदादांनी एक महिना अगोदर सरकार पाडलं नसतं तर मी नक्कीच मराठी बचावाच्या ठरावाची फाईल मंजूर केली असती. आता दिल्लीत पार्टी हायकमांडशी बोलून जीआर काढतो.’
‘अजूनही सत्तेत असल्यासारखं ही मंडळी का वागतात?’ या विचारानं डोक खाजवत टीम कोल्हापूरकडं गेली. तिथं चंद्रकांतदादा भेटले. त्यांचं सारं लक्ष धनंजय बीडकरांच्या सोशल मीडियावरील खड्ड्याच्या फोटोंवर केंद्रित. ‘नमस्कार दादाऽऽ’ टीमनं हाक मारताच ‘हेळरीऽऽ यारू?’ असा प्रतिप्रश्न दादांनी केला. ‘बोलाऽऽ कोण?’ असं दादांनी कन्नडमध्ये विचारल्याचं कुणीतरी सांगितलं, तेव्हा टीमच्या लक्षात आलं की इथं मराठीचा ‘राँग नंबर’ लागलाय. टीम पुरती दचकली. आपण कोल्हापुरात आलोत की गोकाकमध्ये... याची खात्री करण्यासाठी त्यांनी एकमेकांना चिमटेही काढले. टीमनं शेवटी ‘हिंग ह्यँग री चंदू अण्णा ?’ असं काकुळतीनं विचारत त्यांना रामराम ठोकला. (म्हणजे ‘असं कसं हो दादा ?’) कारण कर्नाटकात दादा म्हणजे अण्णा...
असो. टीम ‘मातोश्री’वर पोहोचली. तिथं युवराजांच्या राज्याभिषेकाची जोरदार लगबग सुरू झालेली. मिलिंदरावांचा रुबाब (आता सेक्रेटरी झाल्यानं ते राव बनले नां!) भलताच वाढलेला. त्यांनी टीमला स्पष्टपणे सांगितलं, ‘मेट्रो सिटीच्या नाईट लाईफमधील पेग्वीनला मराठीत काय म्हणतात, हे अगोदर शोधा. मग आमच्या छोट्या अन् मोठ्या साहेबांशी भेट घालून देतो.’ चेहरा बारीक करून टीम ‘कृष्णकुंज’वर गेली. मात्र, ‘पद्मावत’ला हीट करण्यासाठी टिष्ट्वट करण्यात ‘वहिनीसाहेब’ रमलेल्या. तेव्हा ‘इंग्रजी मीडियम’च्या अमितशी बोलण्यात अर्थ नाही, हे ओळखून टीम तेथून थेट बाहेर पडली.
‘वर्षा’वर आशिषभाई अन् किरीटभाई दीडशे भावी आमदारांच्या विषयावर देवेंद्रपंतांसोबत गंभीरपणे चर्चा करत होते. ‘मराठी’बद्दल बोलावं म्हणून टीम पुढं सरसावली. तेवढ्यात रिंग वाजली. कानाला मोबाईल लावत पंत अत्यंत सावधपणे बोलू लागले, ‘हां अमितभाईऽऽ हूं बोलू छू. अंय्या बध्धू ठीक छे. महाराष्ट्राना विकास माटे तमारू ध्यान रेहवा देजो. मराठी माणस पण आपणोच छे,’ आता हे ऐकून टीम बेशुद्ध पडली... हे शुद्ध मराठीत सांगण्याची गरज आहे काय राव?
- सचिन जवळकोटे sachin.javalkote@lokmat.com