मराठी टक्का आणि श्रेणी

By admin | Published: May 13, 2016 03:13 AM2016-05-13T03:13:11+5:302016-05-13T03:13:11+5:30

मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१५ परीक्षेचे निकाल जाहीर झाले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा केंद्रीय सेवेत जाणाऱ्या राज्यातील उमेदवारांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.

Marathi percentages and categories | मराठी टक्का आणि श्रेणी

मराठी टक्का आणि श्रेणी

Next

मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१५ परीक्षेचे निकाल जाहीर झाले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा केंद्रीय सेवेत जाणाऱ्या राज्यातील उमेदवारांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. यंदा राज्यातील यशस्वी उमेदवारांच्या संख्येने शतक साजरे केले आहे. शिवाय राज्यात प्रथम येणारा सोलापूर जिल्ह्यातील योगेश कुंभेजकरचा देशपातळीवरील क्रमांक आठवा आहे. गेल्या २५ वर्षात राज्यातील उमेदवाराला मिळालेली ही सर्वोच्च श्रेणी आहे.
लोकसेवा आयोगातील राज्याचे यश यंदा काकणभर वाढल्याने या सेवांमधील मराठी टक्क्याची चर्चा काहीशी मागे पडली. अन्यथा यूपीएससीतील अत्यल्प वा घसरता मराठी टक्का आपल्या सार्वजनिक चर्चेचा आवडता विषय असायचा. यंदाच्या निकालानंतर आपल्या चर्चेची दिशा बदलावी लागणार आहे. निकालात केवळ मराठी टक्का वाढून चालणार नाही. या टक्क्यासोबत वरच्या श्रेणीत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची संख्याही वाढवावी लागणार आहे. विश्ोष म्हणजे यंदाच्या निकालांनीच त्यासाठीचे दिशादर्शन केले आहे. देशातील पहिली येणारी दिल्लीतील डीना दाबी असो अथवा जालन्यातील अन्सार शेख या सर्वांनी कमी वयातच आयएएस होण्याचे केंद्रीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले. लहान वयातच आपले लक्ष्य निर्धारित करून त्यादृष्टीने तयारी केल्यास यशस्वी होता येते. अगदी कमी वयात देशातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यशाचे शिखर गाठता येते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आगामी काळात शालेय जीवनातच विद्यार्थ्यांसमोर केंद्रित सेवेचा पर्याय उपलब्ध करावा लागणार आहे. या परीक्षांचे महत्त्व, त्यासाठी करावी लागणारी तयारी आदि बाबींची माहिती शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना मिळाल्यास राज्याचा टक्का आणि श्रेणी नक्कीच वाढेल, याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञांचे एकमत आहे. अन्यथा पहिल्या दहामध्ये येण्यासाठी २५ वर्षे लागावीत, हे काही राज्याच्या प्रतिभेला खचितच शोभणारे नाही.

Web Title: Marathi percentages and categories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.