मराठीचे चित्र धूसर

By admin | Published: December 20, 2014 06:53 AM2014-12-20T06:53:42+5:302014-12-20T06:53:42+5:30

महाराष्ट्रात गर्जणा-या ठाकरी भाषेच्या तेजाखाली तयार झालेल्या शिवसेनेच्या मावळ्यांनी दिल्लीत मात्र मराठीपणाला रजा दिली आहे

Marathi picture gray | मराठीचे चित्र धूसर

मराठीचे चित्र धूसर

Next


रघुनाथ पांडे, विशेष प्रतिनिधी, लोकमत समूह, नवी दिल्ली - 

महाराष्ट्रात गर्जणा-या ठाकरी भाषेच्या तेजाखाली तयार झालेल्या शिवसेनेच्या मावळ्यांनी दिल्लीत मात्र मराठीपणाला रजा दिली आहे. लोकसभेत हे शिवसेनेचे खासदार मराठी तर सोडाच, मराठीची मावशी असलेल्या हिंदीलाही दूर ठेवतात. मराठी खासदार हिंदीतून उत्तम व भावपूर्ण बोलतात. शहिदांवरील चर्चेत अरविंद सावंत यांनी ते दाखवून दिले; पण हेच सावंत, डॉ. श्रीकांत शिंदे, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ झोपडपट्ट्यांचेही प्रश्न सभागृहात इंग्रजीतून मांडतात. ‘बॉम्बे हायकोर्टाचे’ नाव ‘मुंबई हायकोर्ट’ करा अशी मागणी करायची, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आग्रह धरायचा आणि प्रश्न मात्र इंग्रजीतूनच मांडायचे, असे मराठीचा जयजयकार करणाऱ्या शिवसेनेकडून आता घडत आहे. सभागृहात अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी एका उत्तरात चक्क ‘बंबई’म्हटले तरी त्याला कोणीच आक्षेप घेतला नाही.!! मंत्र्यांना कळावे म्हणून हे लोक इंग्रजीतून बोलतात, असे लंगडे समर्थन केले जाते. यामुळे मराठी भाषेच्या बेगडी प्रेमाचा उमाळा तर शिवसेनेला येत नसावा ना, असा प्रश्न पडतो. देशातील अन्य खासदार त्यांच्या-त्यांच्या राज्यांच्या भाषेतून आपले प्रश्न मांडतात. ज्या झोपडपट्टीधारक मराठी माणसांच्या जीवावर विधानसभा व लोकसभा शिवसेनेने पादाक्रांत केली, निदान त्यांचे तरी प्रश्न मराठीत मांडावयास हवे होते.
नाशिकच्या गारपीटग्रस्तांचा विषय मराठीतूनच बोलू द्या, अशी विनंती खा. सुप्रिया सुळे यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना केली आणि त्यांनी मराठीतच हा विषय मांडला. एरवी सुळेसुद्धा इंग्रजाळलेल्याच असतात; पण संबंधित घटकाला कोणती भाषा कळते, ते अचूक हेरून त्यांनी पवारनीती पाळली. शेतकरी, बागायतदारांचा व त्यापेक्षाही राष्ट्रवादीच्या राजकारणाचा गड असलेल्या भागातील लोकांचा हा प्रश्न लोकसभेत मांडल्याचा आनंद साहजिकच नाशिकपट्ट्यात झाला. त्यांचे भाषण संपले आणि सोशल साइटवर भाषणाच्या क्लिप्स व त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. कोणता विषय कशा पद्धतीने ‘कॅश’करावा ही मोदीनीती सुप्रियांनी चांगलीच अंगिकारली आहे. शरद पवारांंनी अलिबागच्या कार्यकर्ता कार्यशाळेत पराभवाच्या कारणांचा शोध घेतला, तेव्हा ‘आपण आता सोशल माध्यमांचा वापर केला पाहिजे, तेव्हाच पक्ष व आपण तग धरू’ असे मोठे पवार म्हणाले होते, त्यांच्या या सूचनेचे पालन सुप्रियांनी तत्काळ केले.
शिवसेनेच्या भावना गवळी यांनी कापसाचा भाव, चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादचे ‘आयआयएम’, काँग्रेसचे राजीव सातव यांनी हिंगोलीच्या दुर्दशा झालेल्या राष्ट्रीय महामार्गाचा विषय, भाजपाचे नाना पटोले यांनी ओबीसीच्या जागांचा, सुनील गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या कृषिमाफीचा विषय हिंदीतून जोरात मांडला. राज्यसभेत खा. संजय राऊत अनेक वर्षे ‘हिंदीतून’च शिवसेनेची भूमिका मांडतात. त्यामुळे त्यांचा जगभर आवाज घुमतो; पण लोकसभेत सारेच इंग्रजाळलेले ! शिवसेना सदस्य आता अभ्यास करून सभागृहात येतात, अनेक उत्तम विषय सभागृहात मांडतात, पण त्याची चर्चाही कुठे होत नाही. पंतप्रधान
अमेरिकेपासून भुतानपर्यंत हिंदी भाषेतूनच भाषण करतात, मत व विचार मांडतात. त्यावर टीकाही होत ते पण
त्यांच्या मोदीमय लोकप्रियतेचे वलय त्यांच्या भाषाप्रेमात दडलेले आहे, हे लपून नाहीच. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सभागृहात कैकदा हिंदीतूनच उत्तरे देतात. काँ्रग्रेसचे पुढारी इंग्रजीतून बोलतात, त्यामुळे पक्षाचे विचार, यूपीए सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत नीट पोहोचल्या नाहीत, असा एक निष्कर्ष निवडणुकीच्या पराभवाची
मीमांसा करताना काढण्यात आला. त्यानंतर काँग्रेसजन
‘हिंदी अपनी राष्ट्रभाषा है.’असे म्हणू लागले. गुजरातचे खासदार एकतर हिंदी किंवा गुजरातीतून, तमिळनाडूचे खासदार अखंड ‘अम्मा’चे नामस्मरण करून, तमिळमधूनच बोलतात. त्यांच्या अम्मा या शब्दावर अनेकजण
छद्मी हसतात; पण ते काहीही झाले तरी भाषा व नेत्यांबद्दलचा आदर व्यक्त करतातच. बंगाली मोशाय तर ‘दीदी’असा घोषा लावून बंगालीचा बिनदिक्कत
वापर करतात; पण महाराष्ट्राचे सदस्य पीठासीन असले, की असे चित्र दिसतेच असे नाही. दोनच आठवड्यांपूर्वी भाषा, बोली, लिपी व ग्रंथ संवर्धनाचा विषय सभागृहात गाजला. बाके वाजली, कौतुक झाले. असे असले तरी दिसणारे मराठीचित्र धूसर आहे.

Web Title: Marathi picture gray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.