मराठी कधीही मरणार नाहीच, ती किरटी होऊ नये, हे महत्त्वाचे!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 12:20 PM2024-02-03T12:20:54+5:302024-02-03T12:21:25+5:30
Marathi Sahitya Sammelan : अमळनेर येथे सुरू असलेल्या सत्त्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम कादंबरीकार रवींद्र शोभणे यांच्याशी संवाद !
- रवींद्र शोभणे
( मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष)
मराठी साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष आहात. या संमेलन परंपरेविषयीच्या आपल्या भावना काय आहेत? मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेला दीडशे वर्षे होत आली आहेत. संमेलनही शतकाकडे वाटचाल करू लागले आहे. अशी परंपरा इतर कुठल्याही भाषेत वा प्रांतात नाही. मी परंपरेतून नवता शोधणारा लेखक आहे. आपण आपले विचार आणि कृतिशीलतेने परंपरा नवतेत बदलवू शकतो. संत काव्य, पंडिती काव्य, शाहिरी काव्य हे आपले वैभव आहे. या वैभवसंपन्न काळाबद्दल काय सांगाल?
आमच्या पिढ्या याच साहित्यावर पोसल्या गेल्या आहेत. संत साहित्याने विठ्ठलभक्तीसोबतच आध्यात्मिक लोकशाहीचा मोठा इतिहास घडविला. जीवनातील अनुभव कशा रीतीने काव्याच्या कोंदणात बसवायचे असतात, याचा मोठा आदर्श आम्हाला याच परंपरेने दिला. संत नामदेवांनी अभंग, कीर्तन, भागवत धर्माचा प्रसार, चरित्र आत्मचरित्र इत्यादी लेखनाच्या वाटा दाखविल्या. पुढे तीच परंपरा चालवीत संत तुकारामांनी उत्तुंग कार्य केले.
व्यावहारिक, सांसारिक अनुभवांना काव्यात शब्दबद्ध करण्याचा एक मोठा आदर्श म्हणून आपण तुकारामांकडे पाहतो. शाहिरी काव्याने एकाच वेळी वीररस आणि श्रृंगार रस काव्याच्या मुशीत कसा ओतायचा आणि लौकिक अनुभवांना असे साकारायचे हा कित्ता पुढील कित्येक पिढ्यांना दिला. मराठी साहित्याची परंपरा अतिशय मोठी आहे. आपल्याला परंपरेतूनच नवता शोधायची असते.
महाराष्ट्रात पुरोगामी साहित्यासह राष्ट्रवादी विचारधारेचीही एक परंपरा आहे. आपणाला कोणते विचार अधिक महत्त्वाचे वाटतात? डावे की उजवे? डावं-उजवं जे काही आपण मानतो, ते एवढ्या कडवेपणाने मानायचे का, हा मला प्रश्न पडतो. कुठलाही विचार असो, तो जर सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी पूरक असेल, तर तो विचार मी महत्त्वाचा मानतो. कारण मला आपल्या सामाजिक परिप्रेक्ष्यात सामान्य माणूस महत्त्वाचा वाटतो. दुर्दैवाने अलीकडे डावे-उजवे करण्यात आपण आपली क्षमता वाया घालवतो आहे. राष्ट्रवादी विचार कुणाला नको आहेत? पण त्यातसुद्धा सामान्य माणूस केंद्रस्थानी असावा, आपल्या नजीकच्या इतिहासातसुद्धा डावे-उजवे मवाळ आणि जहाल म्हणूनच आपण अभ्यासतो. मी सर्वसामान्य दलित-पीडित, अन्यायग्रस्त माणसाच्या बाजूने माझ्या साहित्यातून उभा राहतो. तेव्हा हा असला वावदूकपणा मला फार महत्त्वाचा वाटत नाही. मराठी भाषेच्या अनुषंगाने अनेक मुद्दे उपस्थित केले जातात. संमेलन जवळ आले की चर्चा अधिक प्रखर होऊ लागते.. मी मराठी भाषक असल्यामुळे या चर्चेत मलाही नक्कीच रस आहे. पहिला मुद्दा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, हा आहे. कारण मराठी ही जगाच्या पाठीवर आठव्या आणि भारतात तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. शिवाय ती प्राचीन, वाङ्गयीनदृष्ट्या समृद्ध आहे. यात राजकीय नेतृत्वाने लक्ष घालणे गरजेचे आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ सुरू केले. आता या विद्यापीठातून मराठी भाषेचा उत्कर्ष कसा होईल याचा विचार होणे गरजेचे आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत, हे चित्र चांगले नाही. मराठी वाचवायला शासनाने भूमिका घेणे जसे गरजेचे आहे तसेच मराठीविषयीचा न्यूनगंड नाहीसा होणेसुद्धा गरजेचे आहे. मराठी भाषा कधीही मारणार नाही; पण ती अशा परिस्थितीत किरटी होऊ नये, हे महत्त्वाचे! संमेलनाध्यक्ष हा केवळ उत्सवमूर्ती असतो की, त्याला काही भूमिका बजावता येतात?हे ज्याच्या-त्याच्या प्रकृतीवर अवलंबून मराठी साहित्य संमेलनाचे येईल ते मी निष्ठेने करीनच.
असते. मी कार्यकर्ता लेखक आहे. सामाजिक प्रश्न, भाषाविषयक प्रश्न हे माझे जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्याअनुषंगाने समाजातील प्रश्न घेऊन सरकारदरबारी जाऊन जे-जे सकारात्मक कार्य करता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा साडेतेरा कोटी जनतेचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे त्याच्याकडून जनतेच्या काही अपेक्षा असतात. त्यांची परिपूर्ती करणे हेच संमेलनाध्यक्षांचे काम असते, असे मला वाटते.
(मुलाखत : डॉ. अजय कुलकर्णी)