भाजपच्या गुजरात यशामागचे ‘मराठी’ रहस्य; महाराष्ट्रातून आलेल्याला मोदींनी प्रदेशाध्यक्षपदी कसे बसवले?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 08:18 AM2022-12-15T08:18:34+5:302022-12-15T08:19:16+5:30

गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठी बारीक नियोजन करणाऱ्या मराठी गृहस्थाला मोदींनी पूर्ण स्वातंत्र्य दिले होते! त्यांचे नाव : सी. आर. पाटील!

'Marathi' Secret Behind BJP's Gujarat Success; How did Modi select a person who came from Maharashtra C R Patil as the state president? | भाजपच्या गुजरात यशामागचे ‘मराठी’ रहस्य; महाराष्ट्रातून आलेल्याला मोदींनी प्रदेशाध्यक्षपदी कसे बसवले?

भाजपच्या गुजरात यशामागचे ‘मराठी’ रहस्य; महाराष्ट्रातून आलेल्याला मोदींनी प्रदेशाध्यक्षपदी कसे बसवले?

googlenewsNext

-हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या एका नव्या ताऱ्याचा उदय होताना दिसला. राज्यात भाजप विजयी होणार यात काही शंका नव्हती. मोदी-शहा यांची टीम १८२ सदस्यांच्या सभागृहात १३० पेक्षा जास्त जागा घेईल, असे मानले जात होते; परंतु निकालाने निवडणूक पंडितांना धक्का दिला. पक्षाने १५६ अशा विक्रमी जागांवर विजय मिळविला. भाजपच्या या ऐतिहासिक विजयाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तीकडे गुजरातबाहेरच्या लोकांचे फारसे लक्ष गेलेले नाही. २०२० च्या जुलै महिन्यात सी. आर. पाटील यांना गुजरात प्रदेश भाजपचे अध्यक्षपद देण्यात आले. महाराष्ट्रातून आलेल्या माणसाला मोदी यांनी गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी बसवल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या; परंतु पाटील हे शांतपणे लढा देणारे आहेत याची मोदींच्या निकटवर्तीयांना कल्पना होती.   

२०१४, तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या वाराणसी मतदारसंघाचे पाटील प्रभारी होते. पाटील यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली तेव्हा तर त्यांनी सर्व १८२ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचा मानस व्यक्त केला होता.  भाजप लोकसभेच्या राज्यातल्या सर्व २६ जागा  जिंकू शकतो, तर विधानसभेच्या १८२ जागा का जिंकू शकणार नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता; परंतु चर्चाविनिमयानंतर ही आकर्षक वाटणारी घोषणा मागे टाकली गेली. माधवसिंह सोलंकी यांचा १४९ जागांचा विक्रम होता. भाजपने तो मोडावा, असे ठरले. नवे धोरण आखणे, तसेच उमेदवारांची निवड करणे या बाबतीत मोदी यांनी पाटील यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते, अशी माहिती मिळते. सप्टेंबर २०२१ मध्ये मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याचा प्रस्ताव पाटील यांचाच होता. प्रत्येक खेड्यात अगदी रस्ता पातळीवर आणि मतदान केंद्रानुसार त्यांनी नवे धोरण अवलंबिले. २०२३ मध्ये इतर राज्यांत होत असलेल्या निवडणुका, तसेच गुजरातमध्ये यानंतर होणाऱ्या निवडणुकांत पाटील यांच्या प्रारूपाच्या धर्तीवरच आखणी केली जाईल. निवडणूक प्रचाराच्या वेळी त्यांनी आणलेल्या नव्या भगव्या टोप्या नेत्यांच्या डोक्यावर दिसल्या. गुजरातमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर पाटील हे माध्यमांना सामोरे जातील याची काळजी मोदींनी घेतली. राज्याचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल असतील हे पाटील यांनीच जाहीर केले. लोकसभेत ४०० जागांचा आकडा ओलांडण्याची मनीषा मोदी बाळगून असल्याने पाटील यांना पक्षसंघटनेतच मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आता दिल्लीत सुरू झाली आहे.

पराभव हिमाचल प्रदेशात, काळजी मध्य प्रदेशात!
गुजरातमध्ये दणदणीत यश मिळाले असले तरी हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महानगरपालिकेत झालेल्या पराभवाने भाजप नेतृत्व चिंतेत पडले आहे. पराभवाचे धनी शोधले जात आहेत. केवळ उत्साह निर्माण करून भागत नाही असा बोध दोन राज्यांतील या पराभवातून भाजपने घेतला आहे. २०२३ साली या पक्षाला नऊ राज्यांत निवडणुकांना सामोरे जायचे आहे. हिमाचल प्रदेशमधील पराभवामुळे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान काहीसे अडचणीत सापडले आहेत. पक्षाने जयराम ठाकूर यांना काही मंत्र्यांसह आधीच काढून टाकले असते, तर निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता, अशी कुजबुज भाजपच्या मुख्यालयात कानी पडते. अशा प्रकारच्या प्रयोगाला गुजरातसह इतरत्र चांगली फळे आली आहेत. भाजप नेतृत्व चौहान यांना बदलण्याच्या विचारात आहे. त्यांच्याविरुद्ध असलेल्या अँटी इन्कम्बन्सीचा सामना करण्यासाठी कदाचित नवा चेहरा आणला जाईल.

वसुंधराराजे हिमाचलमुळे खुश? 
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांना हिमाचल प्रदेशातील निवडणूक निकालाने आनंद झाला असणार. राज्यात भाजपने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर बंडखोरी अनुभवली आणि त्यामुळेच पक्षाचा पराभव झाला. विजय मिळाला असता तर राजस्थानात जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांना मुख्यमंत्री करण्याची भाजप नेतृत्वाची इच्छा होती असे कळते; परंतु हिमाचल प्रदेशात पराभव झाल्याने या वाळवंटी राज्यातल्या बंडखोरीबद्दल पक्षनेतृत्व काळजीत पडले. हिमाचल प्रदेशात खुद्द पंतप्रधानांनी एका बंडखोराला स्वतः फोन करून माघारीची विनंती केली; पण त्याने ऐकले तर नाहीच, उलट दोघांमधले संभाषण उघड केले.

खरगे यांनी उगारली काठी 
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कोणीही गृहीत धरता कामा नये. त्यांची निवड गांधी कुटुंबीयांनी केलेली असली तरी ते हळूहळू आपला अधिकार प्रस्थापित करू लागले आहेत. राजस्थानचे प्रभारी अजय माकन यांनी राजीनामा देऊ केला, तेव्हा खरगे यांच्या अधिकारांची चुणूक दिसली. एका क्षणाचाही विलंब न लावता खरगे यांनी त्यांना जबाबदारीतून मुक्त केले. आपण राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला वेळ देणार आहोत, असे माकन यांनी म्हटले होते. मात्र, खरगे यावर एक शब्दही बोलले नाहीत. माकन आता विश्रांती घेत आहेत. त्यांना नव्या जबाबदारीची प्रतीक्षा आहे. 

आपल्या कोअर टीममध्ये खरगेंनी चार सल्लागारांची निवड केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे जनसंपर्क प्रमुख जयराम रमेश यांनाही त्यांनी ‘सरळ केले’ असे समजते. ४७ सदस्यांच्या सुकाणू समितीमध्ये खरगे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा सुरू असताना जयराम सतत बडबड करून व्यत्यय आणत होते. ते सहन न होऊन खरगे यांनी त्यांची जाहीर कानउघाडणी केली. सोनिया गांधी यांनीही रमेश यांच्याकडे नाराजीचा कटाक्ष टाकला. योगायोगाची गोष्ट अशी की खरगे आणि जयराम रमेश दोघेही कर्नाटकातलेच; पण आपापसात त्यांचा तसा काही संबंध नाही.

Web Title: 'Marathi' Secret Behind BJP's Gujarat Success; How did Modi select a person who came from Maharashtra C R Patil as the state president?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.