Marathi: ‘मराठी संशोधन मंडळा’ची पंचाहत्तरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 05:26 AM2022-02-01T05:26:57+5:302022-02-01T05:27:40+5:30
Marathi Shitya Mandal : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे ‘मराठी संशोधन मंडळ’ आज अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने मंडळाच्या कार्याची माहिती...
- चंद्रकांत भोंजाळ
(ख्यातनाम साहित्यिक)
कै. प्रा. अ.का. प्रियोळकर यांनी ‘मराठी संशोधन मंडळ’ या संस्थेची सुरुवात केली. १९४८ मध्ये या संस्थेची स्थापना मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे करण्यात आली. त्याची प्रेरणा दिली श्री. चिंतामणराव देशमुख यांनी. १९४५ मध्ये गुंजीकर व्याख्यानमाला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे आयोजित करण्यात आली होती. त्यात विविध वक्त्यांची भाषणे झाली.
त्यातील एक व्याख्यान प्रा. अ.का. प्रियोळकर यांचे होते. त्यांचा विषय होता, ‘जुन्या ग्रंथांचे संपादन व संरक्षण.’ या व्याख्यानाचे अध्यक्ष होते सी.डी. देशमुख. प्रा. प्रियोळकर यांच्या व्याख्यानाने ते प्रभावित झाले. त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात अशी सूचना केली की, मराठी भाषा, वाङ्मय यात संशोधन व्हायला हवे आणि तसे संशोधन करणारी एक स्वतंत्र संस्थाच निर्माण करायला हवी. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने त्यांच्या या सूचनेचा आदर केला. प्रा. प्रियोळकरांनी पाठपुरावा केला. श्री. बाळासाहेब खेर यांनी पाठिंबा दिला आणि ‘मराठी संशोधन मंडळ’ १९४८ मध्ये सुरू झाले.
प्रा. प्रियोळकर यांनी मंडळाची आखणी अतिशय सुंदर व नियोजनबद्ध केली. मध्ययुगीन साहित्याचे संशोधन, त्या साहित्याची हस्तलिखिते जमा करणे, त्याचे संपादन - संशोधन, संरक्षण - जतन करणे यावर त्यांनी भर दिला. मराठी संतसाहित्याच्या संशोधनाला, त्याच्या पाठभेदचिकित्सेला प्राधान्य दिले. प्रा. प्रियोळकर यांनी ठिकठिकाणी हिंडून अशी असंख्य हस्तलिखिते जमा केली. संशोधन मंडळाच्या संग्रही अशी ६५० - ७०० हस्तलिखिते आजही आहेत.
संशोधन मंडळाने प्रा. प्रियोळकर यांच्या मुक्तेश्वरांचे महाभारत-आदिपर्वचे चार भाग प्रकाशित केले. पाठभेदचिकित्सा पद्धती मराठीमध्ये प्रा. प्रियोळकरांनी रूढ केली. पुढे त्याचा अनेकांनी विस्तार केला. याव्यतिरिक्त बोली, व्याकरण, लिपी या विषयांसाठीही त्यांनी खूप संशोधन केले. मराठी व्याकरण, प्राकृत व्याकरण, इतर बोली यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. प्रियोळकर यांनी सूचीनिर्मिती, कोशनिर्मितीलाही चालना दिली. रा.ना. वेलिंगकर यांनी तयार केलेला ‘ज्ञानेश्वरीचे शब्दभांडार’ हा कोश त्यांनीच संशोधन मंडळातर्फे प्रकाशित केला होता. संशोधनात अशा साधनांना कमालीची महत्त्व असते.
डॉ. स.ग. मालशे हे प्रियोळकर यांचे विद्यार्थी. प्रियोळकर यांच्या तालमीत तयार झालेले उत्तम संशोधक. १८-१९ व्या शतकातील सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन चळवळींचा त्यांचा मोठा अभ्यास होता. विष्णुबुवा ब्रह्मचारी, महादेव गोविंद रानडे, गोपाल गणेश आगरकर, महात्मा फुले अशा अनेक दुर्मीळ बाबींचा त्यांनी घेतलेला शोध मराठी वाङ्मयात भर टाकणारा आहे. विष्णुबुवांचे ‘राजनीतीविषयक निबंध’ आणि त्याचा कार्ल मार्क्सशी असणारा नातेसंबंध मालशे सरांनीच मंडळातर्फे पुढे आणला. सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता त्यांनी मिळवल्या. केशवसुतांच्या कवितांची वही मिळवली. ताराबाई शिंदे यांची ‘स्त्री-पुरुष तुलना’ ही पुस्तिका डॉ. मालशे यांच्यामुळेच अभ्यासकांना उपलब्ध झाली.
पुढे येणाऱ्या प्रत्येक संचालकाने मंडळाच्या कार्याचा विस्तार केला; पण गाभा मात्र तोच ठेवला असे दिसते. प्रा. म.वा. धोंड यांनी संहिता - चिकित्साशास्त्रासह संगीताच्या क्षेत्रालाही संशोधनाच्या कक्षेत आणले. त्यांची ‘प्रबंध, धृपद, ख्याल’ ही पुस्तिका किंवा ‘अढळ ध्रुवाचा ढळला तारा’ हा लेख संगीताच्या क्षेत्रातील मानबिंदू ठरू शकतो. त्यानंतर डॉ. सु.रा. चुनेकरांनी विद्यापीठात चालणाऱ्या मराठीतील संशोधनासह विविध सूची वाङ्मयाला विशेष महत्त्व दिले. प्रा. तेंडुलकर यांनी लोकसाहित्य, वा.ल.ची डायरी, डॉ. र.बा. मंचरकरांचे मुक्तेश्वरांवरील संशोधन, रा.चिं. ढेरे यांचे विठ्ठलविषयक लेखन, डॉ. के.वा. आपटे यांचे प्राकृत व्याकरण, र.कृ. परांजपे यांचे लिपी संशोधन, विश्वनाथ खैरे यांचे ‘मराठी भाषेचे मूळ’ आणि त्यांचा ‘संमत’ विचार अमृतानुभवाचा पादकोश अशा अनेक विषयांना चालना दिली; पुस्तके, लेख, पुस्तिका प्रकाशित केल्या. त्यानंतर प्रा. दावतर यांच्या काळात प्रा. प्रियोळकर यांची जन्मशताब्दी आली होती. त्यांनी त्यानिमित्ताने प्रियोळकरांचे संशोधनात्मक लेख प्रकाशित केले. प्राचार्य डॉ. दत्ता पवार यांनी मंडळाला आलेली उदासीनता झटकून मंडळाची घडी बसवली.
या मंडळाला मुंबई विद्यापीठाचे पीएच.डी.चे संशोधन केंद्र म्हणून कायमची मान्यता आहे. २०१३ पासून डॉ. प्रदीप कर्णिक हे संचालक झाल्यावर त्यांनी ‘संशोधन पत्रिकेचे’ स्वरूपच बदलून टाकले. संशोधनाचा दर्जा कुठेही खालावणार नाही आणि संस्थेच्या उद्दिष्टांना धक्का लागणार नाही याची काळजी घेत मजकूर वाचनीय केला. पुढे डमी आकारातील अंक ‘ललित’ या नियतकालिकाच्या आकारात काढायला सुरुवात केली. त्यांनी कितीतरी दुर्मीळ मजकूर मराठीत आणला आहे. अलीकडच्या सात-आठ वर्षांत मंडळाने अनेक महत्त्वाची पुस्तकेदेखील प्रकाशित केली आहेत.
डॉ. कर्णिक यांनी काही विशेषांकही प्रकाशित केले आहेत. आता मंडळाची वेबसाईटही तयार होते आहे. येणाऱ्या काळात लोकहितवादी यांच्या गुजराती लेखांचे मराठी अनुवाद दोन खंडात काढायचे काम सुरू आहे. डॉ. यु.म. पठाण यांचे ५० लेखांचे पुस्तक मंडळ प्रकाशित करणार आहे. डॉ. द.दि. पुंडे यांचा लेखसंग्रह, प्राचार्य पंडितराव पवार यांचे लोकसाहित्याच्या अभ्यासकांचा आढावा घेणाऱ्या लेखांचे पुस्तक अशा काही योजना आहेत. अर्थात या कार्याला शासनाचे अनुदान नाही ही बाब खटकणारी आहे. त्यासाठी खूप प्रयत्न करूनही दाद लागत नाही. त्यामुळे मनुष्यबळ नसतानाही हे मंडळ पुढील वाटचालीकरीता सज्ज झालेले आहे. मराठी साठी कळवळा असणा-या प्रत्येकाने या कार्याला हातभार लावला पाहिजे तरच हे कार्य टिकून राहील. मंडळाच्या कार्याला शुभेच्छा.