मराठी भाषकांनो, सावध राहा... आणि पुढल्या हाका ऐका !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 09:05 AM2023-02-27T09:05:23+5:302023-02-27T09:05:39+5:30
आपण बुद्धिमान ‘एआय’च्या काळात राहतो. यापुढे ज्ञानाला आणि माहितीला प्रचंड महत्त्व असेल. ते ज्या भाषेत सहज उपलब्ध असेल, ती भाषा आणखी विकास पावेल.
- प्रणव सखदेव, लेखक
मराठी भाषा खरंच वाहती आहे का? या प्रश्नाचं उत्तर देणं तसं गुंतागुंतीचं आहे. ते ‘हो’ किंवा ‘नाही’ असं ‘बायनरी’ नाही; पण मराठी भाषेच्या संदर्भात मी काम करत असलेल्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही महत्त्वाच्या मुद्यांचा ऊहापोह आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने येथे करावासा वाटतो -
१. आज आणि त्याआधीही मराठीमध्ये ललित साहित्याला (फिक्शन) अतोनात महत्त्व देण्यात आलं. (मी स्वतः फिक्शन लिहीत असूनही हे म्हणतो!) आजही मराठी भाषा संवर्धनाबाबतचे किंवा मराठी भाषेबद्दलचे कार्यक्रम पाहिले तर त्यात लेखकांच्या मुलाखती किंवा अभिवाचनं अशा स्वरूपाचे उपक्रम असतात. अर्थात असे कार्यक्रम होणं चांगलंच, पण प्रत्यक्ष भाषेबद्दल चिंतन करणारे, काम करणारे भाषातज्ज्ञ, भाषा संशोधक यांना मात्र परिघाबाहेर ठेवलं जातं. त्यांच्याकडे काहीशा तुच्छतेने पाहिलं जातं किंवा ‘कॉपी-पेस्ट लेखक’ म्हणून हेटाळणी केली जाते. असं का? कारण ज्ञान, माहिती आपल्याला कमी महत्त्वाची वाटते; पण आजच्या युगात या दोन्ही गोष्टी कळीच्या आहेत आणि ज्यांच्याकडे त्या असतील तो समाज पुढे जाणार आहे, हे नीट ध्यानात घेऊन कथा-कादंबरी लिहिणाऱ्या लेखकांइतकंच महत्त्व या लेखक-संशोधक-तज्ज्ञांना दिलं पाहिजे. त्यांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. उदाहरणार्थ, साहित्य अकादमीसारखा एखादा प्रतिष्ठेचा पुरस्कार मराठीत नॉनफिक्शन लिहिणाऱ्या लेखकाला मिळालाय, असं या ‘पुरोगामी’ महाराष्ट्रात का घडू नये?
२. आज मराठी प्रकाशन क्षेत्रात विज्ञान-तंत्रज्ञान, इतिहास, वैद्यकशास्त्र, व्यवसाय मार्गदर्शन, अर्थशास्त्र, व्यवस्थापन यांसारख्या अनेकानेक विषयांची उत्तमोत्तम पुस्तकं भाषांतरित होत आहेत; पण असं असूनही या भाषांतरांना आणि भाषांतरकारांनाही प्रतिष्ठा मिळत नाही. उदा. सेपियन्स आणि होमो देअस ही अत्यंत महत्त्वाची पुस्तकं मराठीत भाषांतरित झाली; पण या पुस्तकांची आणि त्यांच्या भाषांतरकारांची योग्य अशी दखल घेतली गेली का? त्यांना प्रतिष्ठित पारितोषिकं का मिळाली नाहीत? की कथा-कादंबरीचं भाषांतर हेच तितकं महत्त्वाचं असतं असा इथेही समज आहे? दुसरं, आज मराठीत व्यावसायिक भाषांतरकार म्हणून अनेक जण काम करत आहेत. म्हणजे जर ही एक छोटी अर्थव्यवस्था निर्माण होत असेल, तर मराठी अर्थार्जनाची भाषा होऊ शकते, हे सिद्ध होत नाही का? अगदी साधं उदाहरण, इंग्रजी भाषा एवढी समृद्ध होण्याचं कारण काय? तर या भाषेत जगभरातल्या भाषांमधलं साहित्य भाषांतरित केलं गेलं!
३. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा- बालसाहित्याला असलेलं सर्वस्तरीय गौण स्थान. खरंतर बाल किंवा कुमार साहित्याकडे आपण अत्यंत गांभीर्याने पाहिलं पाहिजे. कारण हे साहित्य वाचणारी मुलं पुढे मराठी वाचणार आहेत, बोलणार आहेत आणि पुढे इतर क्षेत्रांत व्यवसाय-नोकरीधंदा करणार आहे. आज एका टचवर मुलांना एवढी अद्ययावत माहिती उपलब्ध असताना मराठीत काय प्रकारचं बाल-कुमार साहित्य निर्माण होतं आहे? फिक्शन आणि नॉनफिक्शन दोन्ही? चिकित्सा केली की हतबल व्हायला होतं. असं का? कारण बालसाहित्य म्हणजे काहीतरी कमी दर्जाचं, उरलं-सुरलं लेखन असा समज. बरं, मराठीतून निघणारी लहान मुलांसाठीची मासिकं किती? दोन किंवा तीन. बालसाहित्याकडे गंभीरपणे पाहणारे लेखक? दोन-अडीच फारतर आणि असेच गंभीर प्रकाशक? एक किंवा ताणायचंच तर दोन! साहित्यिक कार्यक्रमांत, उपक्रमांत मुलांसाठी लिहिणाऱ्यांना किती जागा मिळते? जवळजवळ शून्य!
शेवटी एवढंच की, आज आपण बुद्धिमान ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)च्या काळात राहतो आहोत. इथून पुढे ज्ञानाला आणि माहितीला प्रचंड महत्त्व असेल आणि ते ज्या भाषेत सहज उपलब्ध असेल, ती भाषा आणखी विकास पावेल. तेव्हा सावध ऐका, पुढल्या हाका...
sakhadeopranav@gmail.com