‘आप’च्या यशाची मराठी कथा

By admin | Published: February 13, 2015 11:00 PM2015-02-13T23:00:00+5:302015-02-13T23:00:00+5:30

एकच दिशा दाखवणा-या देशातील राजकीय होकायंत्राला आपल्या दिशेने वळण्यासाठी बाध्य करणारे अरविंद केजरीवाल यांचे महाराष्ट्राशी असलेले नाते त्यांच्या सामाजिक, राजकीय व कौटुंबिक स्तरावर कुतूहल निर्माण

Marathi story of AAP's success | ‘आप’च्या यशाची मराठी कथा

‘आप’च्या यशाची मराठी कथा

Next

रघुनाथ पांडे -

एकच दिशा दाखवणा-या देशातील राजकीय होकायंत्राला आपल्या दिशेने वळण्यासाठी बाध्य करणारे अरविंद केजरीवाल यांचे महाराष्ट्राशी असलेले नाते त्यांच्या सामाजिक, राजकीय व कौटुंबिक स्तरावर कुतूहल निर्माण करणारे आहे. म्हणूनच दिल्लीच्या ऐतिहासिक निवडणुकीत डोळे विस्फारणाऱ्या फौजा भाजपाने उतरवल्या तरी महाराष्ट्रातून ‘झाडू’न आलेले अवघे बाराशे कार्यकर्ते फौजेला पुरून उरले ! आपच्या या नेत्रदीपक यशामागे मराठी टक्का मोठे कष्ट उपसत होता. महाराष्ट्रातील कार्यकर्ते आले, ते फिरले, खूप राबले आणि निकालाच्या जल्लोषात बेधुंद नाचून पुन्हा महाराष्ट्रात परतले. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपुरातील बडी माणसे ‘अंडरग्राउंड’ काम करत होती. बड्या खासगी वित्तीय संस्थांमधील अधिकारी सुट्ट्या टाकून टोप, फलक व पत्रके वाटून प्रचार करत होते. कार्पोरेटमधील नवतरुणांचे गट दिल्लीच्या कानाकोपऱ्यात फिरत होते आणि ‘आप’शी जुळलेले महाराष्ट्रातील मयंक गांधी, संजय परमार, अंजली दमानिया, प्रीती मेमन, मीरा संन्याल, मनीषा लाड गुप्ता, मीना कर्णिक, राजीव भिसे, सुभाष वारे, मारुती भापकर, आभा मुळे, असे सारे पडेल ते काम करत होते. आपला महाराष्ट्राने या निवडणुकीत दुहेरी साथ केली. सर्वाधिक निधी (एकूण निधीच्या १८ टक्के व दिल्लीच्या खालोखाल) महाराष्ट्राने दिला, तर सर्वाधिक कार्यकर्ते महाराष्ट्रातून दिल्लीत डेरेदाखल झाले. नावीन्याचा शोध घेऊन महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी ‘प्ले फॉर चेंज, ‘स्ट्रीट प्ले’ आणि ‘डान्स फॉर डेमॉक्रसी’ हे तीन प्रकार प्रचारात उतरविले, आणि त्यांनी दिल्लीकरांच्या मनात घर केले !! ‘प्ले फॉर चेंज’मध्ये ही मुले गर्दीच्या चौकात एका कोपऱ्यात गिटार वाजवून देशभक्तीची गाणी वाजवायची आणि शेवटी ‘पाच साल केजरवालची’ धून. ‘डान्स फॉर डेमॉक्रसी’मध्ये ४० मुलामुलींचा मोठा समूह सध्याची लोकप्रिय असणारी चार गाणी म्हणून लोकांना एकत्रित करायचा. त्यांना आप व केजरीवाल यांचे महत्त्व सांगायचा आणि समारोप ‘पाच साल केजरीवाल’ म्हणून व्हायचा. ‘स्ट्रीट प्ले’हा भन्नाट प्रकार दिल्लीकरांनी अनुभवला. दिल्लीच्या कळीच्या समस्यांवर तरूणांचा हा गट नुक्कड नाटक करायचा. परंपरागत प्रचाराच्या अगदीच दुसऱ्या टोकाचे हे तंत्र होते. गाणी, नाटके, नृत्य व फॅशनमध्ये दिल्लीकरांना कमालीचा उत्साह असतो. ही मानसिकता कॅश करण्यात आली. नागरिक आपच्या दिशेने आकर्षित होईल, त्यांना विश्वास वाटेल इतक्या सोप्या पध्दतीने प्रचार सुरू होता. केजरीवालांच्या खांद्याला खांदा लावून वर्षभरापूर्वी काम करणाऱ्या किरण बेदी यांच्या कृष्णानगर मतदारसंघात गुल पनाम, मीरा संन्याल, स्मिता बन्सल व अंजली दमानिया या टीमने ‘आप की शक्ती’ हा कार्यक्रम शेकडो महिलांसोबत केला, तेव्हा बेदींच्या मतदारसंघात जायचा तो संदेश गेला. प्रचार शिगेला पोहोचला तो, मार्केट व मॉल्समधील झगमगत्या दुकानांसमोर असलेल्या ‘मॅनक्वींज’लाही आपच्या टोप्या घालण्यात आल्या तेव्हा! ‘इमानदारी व टोप्या’ एवढेच काय ते आमच्याकडे आहे, असे जेव्हा कार्यकर्ते सांगत तेव्हा दुकानदार स्वत:सह ‘मॅनक्वींज’लाही टोप्या घालत. ७० पैकी ६७ जागा मिळण्याचे स्वप्न स्वत: केजरीवाल यांनीही पाहिले नव्हते. महाराष्ट्र, हरियानाच्या निवडणुकीत बडे पक्ष लक्ष्य एकवटत असताना आपची या राज्यातील टीम सहा महिने दिल्लीत तळ ठोकून होती. बेदींच्या आगमनानंतर ‘भाजपा विरूध्द भाजपा’ असा संघर्ष तीव्र झाल्यावर भाजपाने फौजा उतरविल्या, तोवर आपच्या प्रचाराचे दोन टप्पे पार झाले होते.
...सहा वर्षांपूर्वी केजरीवालांचा अण्णा हजारेंशी संपर्क आला व तोच त्यांच्या राजकीय उन्नतीचा संदर्भ असला तरी, केजरीवालांच्या वैवाहिक जीवनाचा प्रारंभ नागपुरातून झाल्याने महाराष्ट्र व त्यांचा ऋणानुबंध यावेळी नजरअंदाज करून कसे चालेल. अरविंद व सुनिता नागपुरात भारतीय महसूल सेवेत होत. परवा विजयानंतर त्या दोघांनीही तो क्षण आठवला... आणि महाराष्ट्राशी त्यांच्या नात्याचे बंध पुन्हा गहिरे झाले.

Web Title: Marathi story of AAP's success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.