कारगिलचे नाते दृढ करणारी मॅरेथॉन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 12:20 AM2018-09-12T00:20:31+5:302018-09-12T00:20:42+5:30

कारगिलची जगभराला सध्याची ओळख आहे ती पाकिस्तानबरोबर जिंकलेल्या युद्धामुळे.

Marathon to build Kargil relationship | कारगिलचे नाते दृढ करणारी मॅरेथॉन

कारगिलचे नाते दृढ करणारी मॅरेथॉन

- संजय नहार
कारगिलची जगभराला सध्याची ओळख आहे ती पाकिस्तानबरोबर जिंकलेल्या युद्धामुळे. कारगिलमध्ये झालेले युद्ध कोणीही भारतीय कधीच विसरू शकणार नाही. शत्रूकडून झालेला विश्वासघात आणि आक्रमण या दोन्हींवर हा जसा मिळविलेला विजय आहे तसाच त्याचा एक संदेशही आहे. याच भावनेतून सरहद संस्थेने कारगिल युद्ध प्रारंभ झाल्यानंतर लगेचच आपल्या छोट्याशा मदतकार्याला तत्परतेने प्रारंभ केला होता.
मे आणि जून १९९९ मध्ये कारगिल, द्रास, बटालिक आणि मच्छिल भागातील सैनिकांना मदत करणाऱ्या स्थानिक नागरिकांसाठी संस्थेने यथाशक्ती केलेल्या मदतीनंतर आपले सैनिक आणि तेथील स्थानिक लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही लढाई लढले. याची टायगर हिल किंवा टोलोलिंग शिखर पाहताना जाणीव झाली. पुण्यात राहून केवळ छोटीशी मदत केल्यावरही लष्करप्रमुखापासून स्थानिक अधिकाºयांपर्यंत सर्वांनी त्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या, त्यामुळे आपण केलेली मदत ही अगदीच तोकडी आहे. मात्र तेथील जनता आणि सैनिकांना दीर्घकालीन उपयोग होईल असे प्रयत्न करायला हवे याची जाणीव झाली. यासाठी सरहद संस्थेने पुढाकार घेतला.
प्रथम नो इंडिया (ओळख भारताची) या उपक्रमांतर्गत कारगिल आणि काश्मीर भागातील मुलांना भारतातील इतर भागात भेटीसाठी आणले गेले. याचा परिणाम होत आहे असे वाटतानाच २००३ साली कारगिलचे तत्कालीन ब्रिगेडियर रवी दास्ताने यांच्या पुढाकाराने कारगिल युद्धातील १७ मुले पुण्यात शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आली. ही संख्या सध्या ३९ पर्यंत गेली आहे. यामध्ये कारगिल युद्धाची प्रथम माहिती देणाºया मेंढपाळाच्या मुलापासून शहीद सौरभ कालिया याचा मृतदेह पाकिस्तानच्या हद्दीतून आणणाºया मदतनिसाच्या मुलीपर्यंत सर्वांचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून कारगिल ही युद्धभूमी तर आहेच त्याचवेळी एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व्हावे यासाठी त्या भागाचा अभ्यास करताना अनेक ठिकाणांच्या ऐतिहासिक संदर्भाची माहिती पुढे आली आणि आम्ही हरखूनच गेलो. त्यातूनच संजीव शहा एका सायकल यात्रेसाठी कारगिलला गेले होते. कारगिलच्या स्थानिक जनतेशी जोडणाºया प्रयत्नांना मॅरेथॉनसारखे क्रीडाप्रकार उपयोगी ठरू शकतात, अशा भावनेतून कारगिल आंतरराष्टÑीय मॅरेथॉनची कल्पना जन्माला आली. स्वानंद अ‍ॅडव्हेंचर, रनबडी आणि सेवक या संस्थांच्या सहकार्याने तिने मूर्त स्वरूप प्राप्त केले.
जम्मू-काश्मीरची दहशतग्रस्त अशी प्रतिमा असताना शांततेचा संदेश देणाºया दुसºया कारगिल आंतरराष्टÑीय मॅरेथॉनचे १ आणि २ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केलेल्या या मॅरेथॉनमध्ये महाराष्टÑ, गोवा, केरळ ओडिसा, सिक्कीम, कर्नाटक, बिहार, हरियाना, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर आदी राज्यांतील ४२ शहरांमधून ३०० पेक्षा अधिक तर कारगिल जिल्ह्याच्या विविध भागांतील २००० हून अधिक विद्यार्थी आणि नागरिक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. त्याचवेळी पॅराट्रूपर ब्रिगेडचे २५ अधिकारी मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी आग्रा येथून आले होते. यातील राम भगत आणि नसीब सिंग यांनी कारगिल युद्धात योगदान दिले होते. तर सर्जिकल स्ट्राइक करणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर जे स्वत:ही कारगिल युद्धात जखमी झाले होते आणि सैनिकांना मदत करणाºया गुजर बकरवाल समाजाचे नेते समशेर पूंछी या सर्वांचा कारगिल गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
पुण्यातील संवाद संस्थेच्या पुढाकाराने मराठी कलाकारांनी कारगिलच्या जनतेसमोर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. नागरिक आणि लष्कराचे जवान यांच्या एकत्रित सहकार्यातून पार पडलेल्या या आंतरराष्टÑीय मॅरेथॉनची दखल जगभर घेतली गेली. संजीव शहा, मोहमद हमजा, अरविंद बिजवे यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या वर्षाच्या आंतरराष्टÑीय मॅरेथॉनची लगेचच तयारी सुरू झाली आहे. ही मॅरेथॉन केवळ हौशी किंवा क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणारी नसून ‘जवान और अवाम एकही है मुकाम’ या घोषणेचा प्रत्यय देणारी आणि कारगिलचे नाते उर्वरित भारताशी दृढ करणारी ठरली आहे.
(संस्थापक, सरहद)

Web Title: Marathon to build Kargil relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.