शिक्षणात मराठवाडा अव्वल
By admin | Published: June 28, 2017 12:14 AM2017-06-28T00:14:45+5:302017-06-28T00:14:45+5:30
जेईई-अॅडव्हान्स, एनईईटीच्या निकालात मराठवाड्याने उत्तुंग भरारी घेतली़ एकीकडे ज्ञानशाखांच्या संगमाचे शतक सुरु असताना मराठवाड्यातील बुद्धिमत्ता
- धर्मराज हल्लाळे
जेईई-अॅडव्हान्स, एनईईटीच्या निकालात मराठवाड्याने उत्तुंग भरारी घेतली़ एकीकडे ज्ञानशाखांच्या संगमाचे शतक सुरु असताना मराठवाड्यातील बुद्धिमत्ता मर्यादित शाखांपुरती राहू नये, यासाठी केंद्र सरकारने एम्स, आयआयटी, आयआयएम, नॅशनल लॉ स्कूलसारख्या संस्था इथे का आणू नयेत, हा सवाल आहे़
जेईई अॅडव्हान्स, एनईईटी या देशपातळीवरील अनुक्रमे अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये लातूर, नांदेड, औरंगाबादेतील विद्यार्थ्यांनी घेतलेली झेप गुणवत्तेचा टक्का वाढविणारी आहे़ लातूरच्या एकट्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील ४८२ विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल़ हा एक अद्वितीय विक्रमच आहे़ दयानंद विज्ञान महाविद्यालयातील ७४ विद्यार्थी ४०० गुणांवरील असून, त्यांना हमखास प्रवेश मिळेल. शाहू, दयानंदसोबतच त्रिपुरा कनिष्ठ विज्ञानच्या ३१, डॉ़चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाच्या २७ विद्यार्थ्यांनी ४०० पेक्षा अधिक गुण मिळविले. जेईई-अॅडव्हान्सच्या निकालातही गुणवत्तेचा आलेख उंचावला.
लातूर शहरातील देशीकेंद्र, केशवराज सारख्या शाळा व शाहू, दयानंद या महाविद्यालयांनी सुरु केलेली निकालाची परंपरा आजही कायम आहे़ त्यात अन्य संस्थाही स्वत:चा ठसा उमटवित आहेत़ खाजगी शिकवणी वर्गाचा विषय नेहमीच चर्चेचा राहतो़ परंतु, निकोप स्पर्धेमुळे, सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नाने शैक्षणिक भरभराट होताना दिसते़ नांदेडमधूनही एनईईटीमध्ये ६०० वर गुण मिळविणारे विद्यार्थी आहेत. त्यामध्ये आँचल काबरा हिने ६६३ गुण घेत अव्वल स्थान पटकाविले़ ‘शाहू’चा विवेक शामंते अनुसूचित जमाती प्रवर्गात देशात पाचवा आला़ जेईई-अॅडव्हान्समध्ये औरंगाबादचा ओंकार देशपांडे याने इतिहास घडवत देशातून ८ वा क्रमांक मिळविला़ एकूणच देशपातळीवरील स्पर्धेत मराठवाड्याचा निकाल गुणवत्तेचा अनुशेष भरून काढणारा आहे़ मागासलेपणाचा शिक्का नव्या पिढीने पुसण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यांना भक्कम साथ मिळाली तर ही गुणवत्ता राज्य अन् देशात यापुढेही चमकत राहील़ एखाद्या शहरातून हजाराच्या जवळपास विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जात असतील, आयआयटी सारख्या संस्थांमध्ये मराठवाडा ठळकपणे दिसत असेल तर केंद्र, राज्य सरकार या गुणवत्तेकडे कसे पाहते हेही महत्त्वाचे आहे़ या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश राज्यकर्त्यांच्या दृष्टीने कितपत दखलपात्र आहे, याची पडताळणी करावी लागेल़ उद्योग, शेती अन् विकासाच्या मुद्यावर मराठवाड्यात दुय्यमत्वाची भावना आहे़ निदान विद्यार्थ्यांचे लखलखीत यश पाहून इथल्या गुणवत्तेचा, बुद्धीमत्तेचा सर्वांगीण विनियोग करण्याची भूमिका घेतली जाईल का हा प्रश्न आहे़ देश अन् राज्यातील नावाजलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात पहिले दहा विद्यार्थी इथले असतील तर त्यांना इतरही राष्ट्रीय संस्थांमध्येही लौकिक मिळविण्याची संधी दिली गेली पाहिजे़ देशात नव्याने तीन एम्स उभारले जाणार आहेत़ त्यातील एक महाराष्ट्रात दिले जाईल़ गुणवत्तेच्या निकषावर ते मराठवाड्याला का मिळू नये. एखादे राष्ट्रीय विद्यापीठ, नॅशनल लॉ स्कुल, आयआयटी ही संस्था औरंगाबाद, नांदेड, लातूर येथे का स्थापित केली जावू नये़
लातूरचे देवणी, नांदेडचे लालकंधारी वाण प्रसिद्ध आहे़ त्या अनुषंगाने नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटसारख्या राष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थांमध्ये इथल्या गुणवत्तेला वाव मिळाला पाहिजे़ परभणी, नांदेड या भागांमध्ये कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते़ त्यासाठी टेक्स्टाईल इंजिनिअरिंगला वाव आहे़ मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सची एक शाखा मराठवाड्यात तुळजापूरला आहे़ तिथे देशभरातून आलेले विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत़ याच धर्तीवर ग्रामीण विकासावर आधारित शैक्षणिक प्रकल्प, संशोधन संस्था शासनाकडून उभारल्या तर इथली गुणवत्ता एक दोन शाखांपुरती मर्यादित राहणार नाही़ ज्यामुळे मराठवाड्यात ग्रामीण चेहरा असलेल्या शहरांमध्ये उभे राहणारे शैक्षणिक हब अधिक चौफेर होतील.