मारिया मॉँटेसरी : रोमच्या शाळेतले मुलांवरच्या प्रेमाचे प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 05:59 AM2020-08-31T05:59:45+5:302020-08-31T06:00:54+5:30

मारिया ंमॉंटेसरी यांच्या काळात १०० वर्षांपूर्वी, त्यांच्याच शाळेत घडलेली ही एक सत्य घटना सर्वच शिक्षण प्रेमींना अंतर्मुख करेल असं वाटतं.

Maria Montessori: Love experiments on school children in Rome | मारिया मॉँटेसरी : रोमच्या शाळेतले मुलांवरच्या प्रेमाचे प्रयोग

मारिया मॉँटेसरी : रोमच्या शाळेतले मुलांवरच्या प्रेमाचे प्रयोग

Next

- डॉ. मधुरा आफळे

आजच्या कोरोनाच्या संकटात आपली मुलं पेचात सापडली आहेत. त्यांचं नेहमीचं शाळेत जाणं, मित्रांबरोबर खेळणं, हसणं, डबा खाणं, एकत्र पाढे म्हणणं, एकत्र गाणी म्हणणं जणू काही सगळं़च थांबलं आहे. पण या काळात ही उमेद आणणारी एक आठवण आहे ती ख्यातनाम शिक्षणतज़्ज़ मारिया ंमॉंटेसरी यांची! आज त्यांची दीडशेवी जयंती आहे, हेही एक निमित्त! मारिया ंमॉंटेसरी यांच्या काळात १०० वर्षांपूर्वी, त्यांच्याच शाळेत घडलेली ही एक सत्य घटना सर्वच शिक्षण प्रेमींना अंतर्मुख करेल असं वाटतं.

त्याकाळी प्रत्येक देशात इतर देशांच्या वकिलाती असत. इटलीच्या रोममधेही अर्जेटिना देशाची वकिलात होती. तिथला राजदूत शिक्षण प्रेमी होता. एके दिवशी त्याने ठरवलं, कुणालाही कसलीही कल्पना न देता रोममधील ‘सॉन लॉरेझो’ या एका गलिच्छ वस्तीतील ‘त्या’ शाळेला अचानक भेट द्यायची. एकदा प्रत्यक्षच पाहुया तर खरं, मॉंटेसरी बाईंच्या शाळेत एवढं काय चालतं ते! अशा उत्सुकतेपोटी तो एके दिवशी कुणालाही न सांगता त्या शाळेत गेला. पण दुर्दैव त्याचं! त्या दिवशी शाळा बंद होती. पण त्या राजदूताला त्याच दिवशी शाळा पाहायची होती. हेतू हा की, ‘जशी आहे तशीच’ पाहावी! या शाळेविषयी त्याने बरेच वेळा ऐकलं होतं. एका अत्यंत गलिच्छ वस्तीत अगदी सुरूवातीला ती शाळा जेव्हा मारीया मॉटेसरी बाईंनी सुरू केली होती तेव्हा गरिबी, गुन्हेगारी, अस्वच्छता, बेशिस्त, कुपोषण, दुषित हवा, अनारोग्य यांचं साम्राज्य होतं तिथे. बालशिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत होतं. त्या काळी बक्षिस देणं किंवा शिक्षा करणं या मार्गांनी मुलांना शाळेत रमवण्यापेक्षा , जर मुलांना त्यांच्या जोगं, त्यांना जमणारं, आवडणारं काम दिलं, तर मुलं खेळापे़क्षाही त्या कामात खूप खूप रमतात, या विचारावर मॉंटेसरी बाईंचा दृढ विश्वास होता.
हा विचार म्हणजे स्वयंशिस्तीचा, आज्ञाधारकपणाचा, व्यवस्थितपणाचा पाया आहे , असं त्यांना वाटत असे. बालकांना देखील आत्मसन्मान असतो, हे त्यांनी जाणलं होतं. म्हणूनच ‘सान लॉरेन्झो’ या रोममधील वस्तीत त्यांनी आपल्या विचारांनुसार एक बालकमंदिर सुरू केलं. तिथे त्यांनी मुलांच्या हातांना काम दिलं. मुलं स्वत:च सहज करू शकतील, अशी छोटी छोटी कामं !- उदा. योग्य आकाराच्या खोबणीत योग्य आकाराचा ठोकळा बसवणं! साधं ‘नाक कसं साफ करावं’ हा पाठही मॉंटेसरी बाईंनी त्या मुलांची प्रतिष्ठा जपत जपत इतक्या प्रभावीपणे त्यांच्या गळी उतरविला होता की पाठ झाल्यावर त्या मुलांनी उत्सफूर्तपणे टाळ्या वाजविल्या होत्या. मुलांना समजून घेणं फार महत्त्वाचं तितकंच अवघड असतं. मॉंटेसरी बाईंनी त्या मुलांच्यात चैतन्याचे, उत्साहाचे, स्वयंशिक्षणाचे, स्वयंशिस्तीचे झरे असे काही निर्माण केले की बघता बघता त्या वस्तीतील ती बेशिस्त मुलं एकमेकांना सहकार्य करून , आनंदाने, उत्साहाने मनापासून शिकू लागली. मॉंटेसरी बाईंकडे यक्षिणीची कांडी नव्हती. होते अपार परिश्रम आणि मुलांबद्दल प्रचंड प्रेम. बघता बघता या शाळेचं नांव सर्वत्र पोहोचलं.
अर्जंेटीनाचे राजदूत मोठ्या उत्साहाने आले खरे, पण शाळाच बंद. फारच निराश झाले ते. बंद दरवाज्यापाशी ते घुटमळत होते. तेवढ्यात एक मुलगा तिथे आला. तो म्हणाला, ‘तुम्हाला शाळाच बघायची आहे ना? ठीक आहे. किल्ल्या या शिपायाकडे आहेतच. मी आत्ता सगळ्या मुलांना बोलावून आणतो. इथेच तर राहातात माझे सगळे मित्र’- म्हणत तो पळत पळत गेला आणि सगळी मुलं घेऊन आला. तेवढ्या वेळात शिपायाने शाळा उघडली होतीच. मुलं वर्गात गेली. आपापलं साहित्य आपल्या हातांनी काढून घेऊन प्रत्येकजण आपापल्या आवडीच्या कामात बुडून गेला. ना शिक्षक, ना शिपाई, ना घंटा, ना वेळापत्रक. पण शाळा सुरू.. शिस्तीत, मजेत, गडबड नाही, गोंधळ नाही, बेशिस्त नाही. चाटच पडला तो राजदूत! याचं कारण ‘स्वयंस्फूर्तता’ ( सेल्फ मोटिव्हेशन)आणि क्रियाशिलता (क्रिएटिव्हिटी) या दोन गोष्टींवर या शाळेने ठेवलेला विश्वास. मुलांना शाळा आवडते पण मोठ्या लोकांना हे समजत नाही, हे प्रथम जाणलं ते मॉंटेसरी बाईंनी! मुलांच्या छोट्या वर्गाला काळाच्या ओघात ‘मॉंटेसरी’ हेच नाव पडावं, हा खूप मोठा सन्मान वाटला असणार बाईंना! आता त्या शब्दामागचा विचार पोहोचला पाहिजे. विचारातून कृती झाली पाहिजे.
शाळेचा आनंद घोकंपट्टी करून परीक्षेत उत्तीर्ण होण्यात नसतो. तर नवीन नवीन गोष्टींचा अनुभव , नवीन संकल्पना शिकण्यात असतो... हे समजून घेण्याची संधी निदान आतातरी साधा, असंच मॉंटेसरी बाईंना सांगायचं असणार!

Web Title: Maria Montessori: Love experiments on school children in Rome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.