नोकरीशी लग्न?- नको! ‘लिव्ह इन’च उत्तम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 07:48 AM2024-01-25T07:48:01+5:302024-01-25T07:48:07+5:30
कामातलं सातत्य, तीच कंपनी, असं लग्नासारखं नातं न ठेवता, वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे अनुभव असं ‘लिव्ह-इन रिलेशन’ हे तरुणांना मान्य आहे!
- डॉ. भूषण केळकर
‘लिन्क्डइन’चा ताजा अहवाल सांगतो, की सध्या भारतामधील दहापैकी नऊ कर्मचारी सध्या असलेली नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत. विशेषतः रशिया-युक्रेन युद्ध, मध्यपूर्वेतील चिघळलेली स्थिती आणि आयटीमध्ये कोविडच्या काळात झालेली अधिक भरती या पार्श्वभूमीवर हे निरीक्षण थोडं आश्चर्यजनक आहे खरं!!
परंतु एक नक्की : आताचा मध्यमवर्ग ‘वर्क लाइफ बॅलन्स’ला पगारापेक्षा जास्त महत्त्व देतो. ३७% लोक हे पगारवाढ या मुद्द्याने, तर ४२ टक्के लोक वर्क लाइफ बॅलन्स/कामाचं ठिकाण आणि एकूण तासांमधली लवचीकता या कारणाने नोकरी बदलू पाहत आहेत!! अगदी आता-आतापर्यंत, केवळ दहा-वीस टक्के जास्त पगारासाठी अनेक वेळा नोकरी बदलली जात होती, पण गेल्या काही वर्षांत मध्यम वर्ग विस्तारला आहे. IT मधीलच नव्हे तर ITeS आणि अन्य क्षेत्रातही वृद्धी झाल्याने लोकांच्या हातात खर्चण्यासाठी अधिक पैसा उपलब्ध आहे आणि त्यामुळे पगार किंवा मोबदला ही गोष्ट महत्त्वाची असली तरी ‘सर्वांत महत्त्वाची’ उरली नाही आणि मध्यमवर्ग विस्तारून ‘उच्चमध्यम वर्ग’ नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढला आहे, हे वास्तव आहे!
मासलो (Maslow) या तज्ञाने गरजांची उतरंड मांडली त्यामध्ये अन्न-वस्त्र-निवारा या भौतिक गरजा प्राथमिक होत्या (आता त्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी पण आली आहे, हा गमतीचा मुद्दा सोडा!). त्या उतरंडीत एकूण पाच पायऱ्या आहेत, त्यातील दुसरी गरज आहे सुरक्षितता. उच्च मध्यमवर्गीयांच्या या दोन्ही पातळ्या सहज पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी पातळी म्हणजे कौटुंबिक-सामाजिक गरजा आणि चौथी पातळी म्हणजे सेल्फ एस्टीम किंवा स्वतःचा हुंकार, यांचा विचार आता उच्च मध्यमवर्गीय अधिक करतो आहे. उत्पन्नाबरोबर आनंद आणि समाधान हे नक्कीच वाढत जातं, परंतु एका बिंदूपर्यंतच! त्या बिंदूच्या पुढे उत्पन्न वाढलं तरी समाधानामध्ये फारसा फरक पडत नाही! हीच स्थिती उच्च मध्यमवर्गीयांची आलेली आहे! आयुष्यातील सुख आणि समाधान हे पैशापलीकडे असतं, याची वाढती जाणीव ही या बदलाच्या गाभ्याशी असलेली महत्त्वाची गोष्ट!
सध्याचा जमाना हा गिग इकॉनॉमीचा आहे. म्हणजे एखादी कंपनी, त्याचा ब्रँड, त्याच्याबद्दलचं ममत्व किंवा लॉयल्टी यासाठी काम करण्याचे दिवस खरं तर केव्हाच संपले. नवे तरुण कर्मचारी आता प्रकल्प किंवा प्रोजेक्ट बेस्ड आणि अस्थायी स्वरूपाचं (टेम्पररी) काम करणार आहेत. सध्या सोशल मीडियामुळे अनेक लोकांना ते नोकरी शोधत नसले तरीसुद्धा आपणहून नोकरी बदलाबाबत विचारणा होत आहे. याला ‘करिअरप्रेन्यूअर’ अशी संज्ञा सुद्धा नव्याने प्रचलित झाली आहे.या पुढील घटक जो याच्यामध्ये महत्त्वाचा आहे तो म्हणजे नवीन शिकलेलं कौशल्य किती काळ उपयुक्त राहील याचा काळ.
‘हाफ लाइफ’ ही संज्ञा हे सांगते की, गोष्ट अर्धी होण्यासाठी किती वेळ लागेल. ‘डेलोइट’ या प्रख्यात कंपनीचा अभ्यास असा सांगतो की, आजच्या नवीन शिकलेल्या कौशल्याचं हाफ लाइफ हे पाच वर्षांपेक्षाही कमी आहे ! म्हणजे जे तुम्ही आज नव्याने म्हणून शिकाल ते अजून पंधरा वर्षांमध्येच रद्दबातल असेल आणि म्हणजेच नवनवीन शिकत राहणं हा एकमेव उपाय यापुढच्या काळामध्ये कामात टिकण्यासाठी शिल्लक राहील. या वास्तवाची उत्तम जाणीव चांगलीच विस्तारत चालल्यामुळेही वेगवेगळ्या ठिकाणी अनुभव घेणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभव घेणं याकडे कल वाढत आहे!!
आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंडस्ट्री ४.० याच्यामुळे विशेषतः ChatGPT सारख्या तंत्रज्ञानामुळे, एकजिनसी काम जे होतं ते आता यंत्र किंवा तंत्रज्ञान करत आहे. तोच तोपणाबद्दलचा कंटाळाही वाढला आहे कारण यंत्र बरीच कामं करू लागली आहेत, आणि म्हणूनही ‘कुछ हटके’ शोधण्याकडे कल वाढतोय. एकूणच काय तर ‘पैशासाठी नोकरी’ करण्यापेक्षा ‘अनुभव समृद्धीसाठी’ काम करणं याकडे लोकांचा कल वाढत आहे. कंपनी मधील ‘वर्क कल्चर’ हा भाग महत्त्वाचा होत चालला आहे हे नक्की! आपल्याला आयुष्यात नक्की काय हवं आहे, याबाबत विचार करण्याची रीत आणि या प्रश्नाच्या उत्तरांचे पर्याय, असं सारंच बदलताना दिसतं आहे. तरुण पिढीमध्ये वेगाने नोकरी बदलण्याचा ताजा ट्रेण्ड या नव्या शोधाचाच निदर्शक आहे, असं नक्कीच म्हणता येऊ शकेल.
काही प्रमाणामध्ये ‘जेन झी’ किंवा ‘जेन अल्फा’ यांचं ‘इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन’ हे मानसशास्त्रीय मुद्देसुद्धा महत्त्वाचे ठरतात. ‘आय वॉन्ट टू लिव्ह लाइफ’ या तत्त्वांनी जगणारी नवीन पिढी उदयाला आलेली आहे! कोविडच्या काळामध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ची सवलत, त्यासाठीची अत्यावश्यक लवचिकता देण्यात आली होती ती तरुण लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली. भारतात उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही आता पूर्वीइतकी दुर्मीळ गोष्ट उरलेली नाही. हेच बघा ना, भारतात एकूण टूथब्रश जेवढे विकले जातात त्यापेक्षा जास्ती मोबाइल फोन्स विकले जातात! कामातलं सातत्य, तीच कंपनी, असं लग्नासारख नातं न ठेवता, वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे अनुभव असं ‘लिव्ह-इन रिलेशन’ हे आता सहज मान्य तर झालं आहेच पण त्याचं प्रमाण वाढतं आहे. ‘न्यू नॉर्मल’ जे म्हणतात, ते हेच!