मंगळ मोहीम फत्ते!

By admin | Published: September 25, 2014 06:04 AM2014-09-25T06:04:32+5:302014-09-25T09:49:26+5:30

भारतीय अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशी अलौकिक घटना घडली.

Mars campaign! | मंगळ मोहीम फत्ते!

मंगळ मोहीम फत्ते!

Next

जाहिद खान (जेष्ठ पत्रकार) -

भारतीय अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशी अलौकिक घटना घडली. भारताची मंगळ मोहीम या दिवशी पूर्णत्वास गेली. एम.ओ.एम. मॉम म्हणजे मार्स आर्बिटर मिशन या नावाने हा कार्यक्रम ओळखला जात होता. हे अंतरिक्ष यान २४ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ८.२७ वा. मंगळाच्या कक्षेत पोचविण्यात मिशन यशस्वी ठरले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतातील कोट्यवधी जनतेने टीव्हीच्या माध्यमातून या योजनेची सफलता आपल्या डोळ्यांनी बघितली आणि सर्वांनी हर्षभराने टाळ्या वाजवून या यशाचे स्वागत केले. केवळ भारतच नव्हे, तर जगातील विज्ञानप्रेमी लोक भारताच्या या प्रक्षेपण कार्यक्रमाच्या यशस्वितेची वाट पाहत होते. यापूर्वी ज्या ज्या राष्ट्रांनी मंगळाच्या मोहिमा राबविल्या, त्यांना पहिल्याच मोहिमेत क्वचितच यश मिळाले. ती गोष्ट भारताच्या वैज्ञानिकांनी साध्य केली, ही भारताची सर्वांत मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.
भारतीय वैज्ञानिकांनी हे जे यश संपादन केले, त्यामुळे सगळ्या भारतीयांची मान अभिमानाने ताठ झाली असेल यात संशय नाही. मंगळ मोहिमेच्या यशामुळे ज्यांनी यापूर्वी मंगळ मोहीम यशस्वीपणे राबविली, त्यांच्या रांगेत भारताने स्थान मिळविले आहे. भारतापूर्वी अमेरिका, रशिया आणि युरोपियन युनियन यांनाच हे यश मिळाले आहे. आशियातील कोणत्याही राष्ट्राला मिळाले नव्हते, असे यश भारताने मिळविले आहे. हे यश स्वत:च्या प्रयत्नांनी आणि स्वबळावर मिळविले आहे, हे या मोहिमेचे वेगळेपण म्हणता येईल. अमेरिकेने मंगळ मोहीम यशस्वी करण्यापूर्वी त्यांना सहा वेळा अपयश आले होते. आतापर्यंत मंगळावर एकूण ४२ मोहिमा नेण्यात आल्या; त्यांपैकी फक्त निम्म्या मोहिमांनाच यश मिळाले आहे. २०१२ साली चीनने आपली पहिली मंगळ मोहीम यिंगह्यो-एफ या नावाने राबविली होती; पण ती असफल ठरली होती.
भारताची ही मंगळावरील स्वारी अत्यंत कमी खर्चाची ठरली आहे. रु. ४५० कोटी खर्चाच्या या योजनेला २०१२ साली सं.पु.आ. सरकारने मंजुरी दिली होती. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे सगळे ज्येष्ठ वैज्ञानिक ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत होते. प्राथमिक तपासणीनंतर ५ नोव्हेंबर २०१३ रोजी पीएसएलव्ही-सी २५ या उपग्रह प्रक्षेपण यानाच्या मदतीने मंगळयान प्रक्षेपित करण्यात आले. प्रक्षेपणानंतर मंगळ मोहिमेने आपले दोन टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले. तिसरा टप्पा या वर्षी सुरू झाला. त्या वेळी २१५ कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या यानातील इंजिनाला कमांड देऊन ते सुरू करण्यात आले. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी अंतरिक्ष यानाने योजनेनुसार मंगळ ग्रहाच्या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रवेश केल्यावर अंतरिक्ष यानाचा वेग कमी करण्यात आला. प्रतिसेकंद ४३ किमी या वेगाने यानाला मंगळाच्या कक्षेत स्थापन करण्याची कमांड देण्यात आली. मंगळयानात बसवलेले कॅमेरे आता मंगळ ग्रहाची छायाचित्रे पाठविण्यास सुरुवात करतील. मंगळ मोहिमेच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे तसेच देशवासीयांचे अभिनंदन केले आहे.
मंगळ-मोहीम यशस्वी करण्यापूर्वी आपल्या देशाने २००८ साली चंद्रयान-१ ही मोहीम यशस्वी केली होती. त्या मोहिमेत चंद्रावर मानवविरहित यान उतरविण्यात वैज्ञानिकांना यश लाभले होते. चंद्रावरील यशस्वी मोहिमेनंतर इस्रोने मंगळावर स्वारी करण्याची योजना आखली होती. या योजनेसाठी लागणारी वैज्ञानिक उपकरणे तयार करण्याचे काम आपल्या वैज्ञानिकांनी कमालीच्या तडफेने पूर्ण केले होते. मंगळ मोहिमेसाठी अंतरिक्ष यानाच्या निर्मितीवर रु. १५० कोटी खर्च करण्यात आला. प्रक्षेपण क्षेपणास्त्रासाठी रु. ११० कोटी आणि ही मोहीम पूर्णत्वास नेण्यासाठी रु. १९० कोटी असे एकूण रु. ४५० कोटी या मोहिमेसाठी खर्च करण्यात आले. मंगळ मोहिमेसाठी लागलेला हा सर्वांत कमी खर्च म्हणता येईल. अमेरिका, रशिया आणि जपान या राष्ट्रांनी मंगळ मोहिमेसाठी आतापर्यंत रु. ४१,६६९ कोटी खर्च केले आहेत. हे लक्षात घेतले तर भारताची ही मोहीम किती कमी खर्चात पूर्णत्वास गेली याचा अंदाज करता येतो.
मंगळ मोहिमेत इस्रोचे माजी अध्यक्ष यू. आर. राव, विद्यमान अध्यक्ष के. राधाकृष्णन, प्रसिद्ध अंतराळ संशोधक आर. नरसिंहा, एम. अण्णादुराई, एस. के. शिवकुमार, पी. कुन्नीकृष्णन, चंद्रराथन, ए. एस. किरणकुमार, एम. वाय. एस. प्रसाद, एस. अरुणन, जयाकुमार, व्ही. केशव राजू, व्ही. कोटेश्वरराव आणि इस्रोचे अनेक प्राध्यापक सहभागी झाले होते. त्या सर्वांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे. या मोहिमेचा हेतू मंगळावर मिथेन वायू उपलब्ध आहे की नाही, याचा शोध घेणे हा आहे. संपूर्ण ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवरच मिथेन वायू उपलब्ध आहे. मंगळयानाचे वजन पंधरा किलोग्रामइतके आहे. हे यान मंगळाबाबत बरीच उपयुक्त माहिती भारताकडे प्रक्षेपित करणार आहे. दहा महिने अंतराळात वाटचाल करून हे यान मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे पोचविण्यात आले आहे. आता हे यान मंगळापासून ३७५ किलोमीटर अंतरावर फिरत राहून मंगळाच्या कक्षेत सहा महिन्यांपर्यंत भ्रमण करणार आहे. ते मंगळाविषयी महत्त्वपूर्ण माहिती इस्रो केंद्राकडे प्रक्षेपित करणार आहे. मंगळ ग्रहावर वातावरण कसे आहे, तेथे कोणते खनिज पदार्थ उपलब्ध आहेत, हे त्यामुळे समजणार आहे. यानात एक मिथेन सेन्सॉरही बसविण्यात आले आहे. ते मंगळाच्या कोणत्या भागात मिथेन, हायड्रोजन आणि अन्य खनिजे आहेत याची माहिती पुरविणार आहे. त्यामुळे त्या खनिजांवर स्वामित्व हक्क प्रस्थापित करणे भारताला शक्य होणार आहे.
मंगळ मोहिमेच्या यशाबद्दल वैज्ञानिकांत उत्साहाचे वातावरण असले, तरी समाजातील एक वर्ग अशा मोहिमांच्या उपयुक्ततेवर शंका उपस्थित करीत असतो. भारतासारख्या गरीब राष्ट्राला मंगळ मोहिमेवर खर्च करण्याची गरज काय, असे त्यांचे म्हणणे असते. शासनाकडील उपलब्ध संसाधनांचा उपयोग लोकांच्या विकासासाठी अगोदर व्हायला हवा, असे या लोकांचे म्हणणे असते. पण लोकांच्या अशा टीकेकडे दुर्लक्ष करून इस्रोचे वैज्ञानिक अंतराळ संशोधनात गुंतलेले राहणार आहेत. मंगळ मोहिमेच्या यशाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी त्यांनी शक्य करून दाखविल्या आहेत. मंगळयानाला मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात स्थापित करून अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात भारताने दमदार पाऊल टाकले आहे. अंतराळात लांबवर पोचण्याची भारताची क्षमता या मोहिमेमुळे दिसून आली आहे.
भारतापाशी अंतराळ संशोधन करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ही गोष्ट या यशाने भारताने साऱ्या जगाला दाखवून दिली आहे. उपग्रहापासून प्रक्षेपण क्षेपणास्त्रांपर्यंत सर्व साधनाची निर्मिती इस्रोने केली आहे. मंगळाचे रहस्य जाणून घेण्यासाठी अमेरिकेच्या सात मंगळ मोहिमा कार्यरत आहेत. आता त्यात भारताचाही समावेश झाला आहे. भारत उपग्रहांचे निर्माण करू शकतो, असा भरवसा या मोहिमेमुळे साऱ्या जगाला जाणवणार आहे. त्यामुळे अन्य राष्ट्रांसाठी उपग्रहांची निर्मिती करून इस्रोला आपल्या उत्पन्नात भर घालणे शक्य होणार आहे.
मंगळ मोहिमेच्या यशामुळे भविष्यातील यशाचे मार्ग इस्रोसाठी खुले होणार आहेत. आता चंद्रयान-२ ही मोहीम हाती घेणे आणि अंतरिक्षात मानवी मोहीम सुरू करणे भारताला जास्त कठीण असणार नाही. चंद्रयान-२ मोहिमेचे काम प्रगतिपथावर आहे. चंद्रावर उतरविण्यासाठी तयार केलेल्या लँडर आणि रोव्हदचे परीक्षण सुरू आहे. त्यांच्या मदतीने चंद्रावर रोबोटसारखे उपकरण पाठविणे शक्य होणार आहे. सूर्याच्या परिसरात आदित्य-१ हा उपग्रह पाठविण्याची इस्रोची योजना आहे. सौरऊर्जेचे आणि सौरहवेचे परीक्षण करणे त्यामुळे शक्य होणार आहे.

Web Title: Mars campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.