हौतात्म्याला धर्माचा रंग नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:11 AM2018-02-16T04:11:56+5:302018-02-16T04:12:12+5:30

जम्मू आणि काश्मिरातील सुंजवा येथे जैश-ए-मोहम्मद या अतिरेक्यांच्या संघटनेने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाचजण मुस्लीम होते ही बाब मुसलमान समाजावर सातत्याने ते पाकिस्तानवाले आहेत असे म्हणणा-यांच्या डोळ्यात अंजन घालणारी असली तरी अशा शहादतीला धर्माचा रंग देणे योग्य नव्हे.

 Martyr is not a religion of religion | हौतात्म्याला धर्माचा रंग नको

हौतात्म्याला धर्माचा रंग नको

googlenewsNext

जम्मू आणि काश्मिरातील सुंजवा येथे जैश-ए-मोहम्मद या अतिरेक्यांच्या संघटनेने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाचजण मुस्लीम होते ही बाब मुसलमान समाजावर सातत्याने ते पाकिस्तानवाले आहेत असे म्हणणा-यांच्या डोळ्यात अंजन घालणारी असली तरी अशा शहादतीला धर्माचा रंग देणे योग्य नव्हे. मोहम्मद अश्रफ मीर, हबिबुल्लाह कुरेशी, मनझूर अहमद देवा, मोहम्मद इकबाल आणि जुलम-मोईउद्दीन शेख अशी या हुतात्म्यांची नावे असून ते देशासाठी शहीद झाले आहेत. सैन्यास वा सैनिकांना धर्म नसतो, जात-पात-पंथ वा प्रांत नसतो. ते साºया देशाचे संरक्षक असतात. एका अर्थाने ते खरे भारतीय असतात असे म्हणूनच त्यांचा गौरव केला पाहिजे. लष्कराने तो तसा केलाही. परंतु जाती-धर्माचे राजकारण करणाºया पुढाºयांची व राजकारण्यांची वेगळी व सामान्यपणे आपापल्या जाती-धर्माचे समर्थन व संघटन करण्याची वृत्ती असते. त्यातून ज्या देशाच्या राजकारणास धर्माचे रंग चढविण्याची स्पर्धा सुरू झाली असते, त्यात तर अशा संधीची वाट सारेच पुढारी पहात असतात. ‘काश्मिरात शहादत पत्करणारे हे पाचही सैनिक मुसलमान होते ही गोष्ट मुसलमानांना पाकिस्तानी ठरविणाºयांनी लक्षात घेतली पाहिजे.’ इत्तेहादूल मुसलमीन या पक्षाचे अध्यक्ष व खासदार बॅ. असरुद्दीन औवेसी यांचे विधान त्याचमुळे आक्षेपार्ह आहे. भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख जनरल देवराज अम्बू यांनी नेमका हाच आक्षेप औवेसी यांच्यावर घेतला आहे. ‘लष्करात आम्ही सारे एक आहोत. आमच्यात धर्म-पंथाची दुही नाही.’ असे सुचवत तशी दुही पसरवण्याचे प्रयत्न दुसºयाही कुणी करू नयेत असेही त्यांनी यातून सुचविले आहे. वास्तविक जनरल अम्बू यांचे हे आवाहन लष्कराने वा पुढाºयांनीच नव्हे तर साºया देशानेच गंभीरपणे घ्यावे व त्यानुसार वागावे हेच अपेक्षित व योग्य आहे. मात्र जाती-धर्मातील वेगळेपणावर उठून राष्ट्रीय होण्यासाठी लागणारे मन ना राजकारण्यांकडे आहे ना पक्षांजवळ. पुढारी धर्मनिरपेक्षतेचा वा राष्ट्रीयतेचा उल्लेख जाहीर भाषणातच तेवढा करतात. प्रत्यक्षात त्यांचे वर्तन या दुहीला वाढ मिळवून देणारेच असते. जनरल अम्बू यांचा हा उपदेश त्याचमुळे एकट्या असरुद्दीन औवेसीनीच नाही, तर तो साºयाच पुढाºयांनी व नागरिकांनीही ध्यानात घ्यावा असा आहे. देशासाठी प्राणपणाने लढणारा सैनिक हिंदू वा मुसलान नसतो. तो शीख वा पारशीही नसतो. तो एक भारतीय असतो. आणि खºया भारतीयाचे लक्षणही तेच आहे. त्यामुळे देशासाठी हौतात्म्य पत्करणाºया जवानांची वा स्वातंत्र्यासाठी प्राण देणाºया देशभक्तांची धर्मवार गणती करणे हा त्यांचा अपमानच नव्हे तर तो देशाशी केलेला द्रोहही आहे. ज्या पाच भारतीय जवानांनी देशासाठी बलिदान केले ते साºया देशासाठीच अभिवादनाचे व अभिमानाचे विषय झालेले वीर आहेत. त्यांना धर्म वा जातीचा रंग चढविण्याचा प्रयत्न कमालीचा निंद्य व हीन आहे. आपल्या समाजातून जात व धर्म यांच्या वृथा अभिमानाचे मूळ जेव्हा नष्ट व्हायचे तेव्हा ते होईलच. मात्र त्याची सुरुवात जनरल अम्बू यांनी दाखविलेल्या राष्ट्रीय वृत्तीच्या स्वीकारातूनच व्हावी लागेल. आम्ही येथे देशासाठी लढत आहोत आणि तुम्ही तिकडे आम्हाला जाती-धर्माचे रंग लावून आमच्या कुटुंबीयांना असुरक्षित करीत आहात ही भावना उद्या लष्करातील जवानांमध्ये शिरली तर त्यामुळे देशाचे व समाजाचे अकल्याणच होईल. देशासाठी केवळ सैनिकांनीच लढायचे नसते. त्यांच्या पराक्रमामागे साºया देशानेच एकजूट होऊन उभे व्हायचे असते. तसे होण्यासाठी त्याला त्यांचे खासगी स्वार्थ जसे सोडावे लागतात तसेच जाती-धर्म-पंथ या विषयीच्या खासगी श्रद्धाही बाजूस साराव्या लागतात. माणूस म्हणून साºयांनी एकत्र येणे हाच राष्ट्रनिर्मितीचा खरा मार्ग आहे. जम्मू आणि काश्मिरात देशासाठी हौतात्म्य पत्करणाºया जवानांनी हा मार्ग दाखविला आहे आणि त्यावरून पुढे जाणे हे पुढारी, राजकारणी, समाजकारणी व आपल्या साºयांचेही कर्तव्य आहे.

Web Title:  Martyr is not a religion of religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.