पुलवामातील शहीद जवानांच्या हौतात्म्याची दलाली नको
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:22 AM2019-03-05T04:22:59+5:302019-03-05T04:23:13+5:30
सैनिकांच्या हौतात्म्याचे राजकारण करायला प्रत्यक्ष मोदींनीच सुरुवात केली.
सैनिकांच्या हौतात्म्याचे राजकारण करायला प्रत्यक्ष मोदींनीच सुरुवात केली. नंतर झालेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या अर्धवट व निराधार बातम्याही त्यांनीच व त्यांच्या प्रवक्त्यांनीच प्रसृत केल्या. पाकची माहिती खोटी मानली तरी ३०० चा आकडा खरा कसा ठरवायचा?
पुलवामामधील पाकिस्तानच्या क्रौर्याला भारतीय हवाई दलाने जे चोख उत्तर दिले त्यामुळे सारा देश आनंद व अभिमानाने भारावला. सरकारात उत्साह संचारला आणि विरोधी पक्ष विरोध विसरले. युद्ध व युद्ध प्रयत्न यांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या तयारीने सारे पक्ष सैन्याच्या व सरकारच्या पाठीशी एकवटले. याच काळात या युद्धाच्या व सैन्याच्या पराक्रमाचा कोणी राजकीय वापर करू नये, असे सर्व पक्षांतले सर्वच शहाणे एकमेकांना बजावताना दिसले. ते संपून आता पंधरवडा लोटला तरी नरेंद्र मोदी पुन: तोच तो उपदेश सगळ्या समजूतदारांना कर्नाटकात करताना परवा दिसले. खरे तर अशा चांगल्या प्रयत्नांचा आरंभ नेतृत्वाने स्वत:पासूनच करावयाचा असतो. येथे मात्र असे झाले नाही. पुलवामावरील हल्ल्यात शहादत प्राप्त झालेल्या देशभक्तांचे अंत्यसंस्कार पूर्ण होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भातील पांढरकवडा या गावी जाहीर सभेसाठी आले. प्रचारासाठी गाड्या पाठवून माणसे जमा केली जातात तसे या वेळीही झाले. जमलेल्या लोकांसमोर मोदींनी त्यांच्या नेहमीच्याच राणाभीमदेवी थाटात भाषण केले. हे सारे विसंगत वाटत होते, पण तितक्यावरच ते थांबले नाहीत. ‘आजवरच्या सरकारांनी जे केले नाही वा त्यांना जे जमले नाही ते आम्ही केले’ हे जोरदार हातवारे करून सांगताना विरोधी पक्ष कसे निकम्मे आहेत आणि या देशाचे रक्षण आम्हीच फक्त कसे करू शकतो हे त्यांनी तेथील जनतेला सांगितले. हौतात्म्याचे राजकारण करायला प्रत्यक्ष मोदींनीच सुरुवात केली. नंतर झालेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या अर्धवट व निराधार बातम्याही त्यांनीच व त्यांच्या प्रवक्त्यांनीच प्रसृत केल्या. आमच्या स्ट्राइकने ३०० वर दहशतवाद्यांचा बळी घेतला हे सांगितले गेले. त्याला कोणता ठोस आधार होता, हे त्यांचे त्यांना ठाऊक. आपली विमाने जेमतेम आठ मिनिटे पाकिस्तानच्या प्रदेशात होती. त्या काळात त्यांच्यावर पाकी विमानांचे प्रतिहल्ले सुरू झाले. परतताना त्यांनी आपल्याजवळचा दारूगोळा जमिनीवर टाकला, तो एका जंगलात पडला, असे पाकचे म्हणणे आहे. त्यात किती माणसे मेली हे आपल्याला वा आपल्या वैमानिकांना कसे कळले? भारताचे एअर चिफ मार्शल बी.एस. धानोआ त्याचमुळे म्हणाले, ‘आम्ही कारवाई करतो. माणसे किती मेली हे मोजणे व सांगणे हे राजकारणी माणसांचे काम आहे.’ पाकिस्तानच्या सरकारने त्यांचा एकही माणूस मृत्यू न पावल्याची ग्वाही दिली. ती खोटी मानली तरी ३००चा आकडा खरा कसा ठरवायचा आहे. असो. या काळात विरोधी पक्ष गप्प राहिले. त्यांचे राजकारणही त्यांनी थांबविले. देशासाठी विरोधी पक्षांनी सरकारला या मुद्द्यावर साथ देण्याचे जाहीर केले. पण मोदी, जेटली, सीतारामन यांनी मात्र भरते आल्यासारखा या हल्ल्याचा प्रचार आपल्या राजकारणासाठी व येत्या निवडणुकांसाठी केला. त्यासाठी अनेक शहरांत त्यांच्या पक्षाने मिरवणुका काढल्या व त्यांचे नित्याचे ढोल बडवले. जनतेचा उत्साह समजता येतो. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले तेव्हा तो सागरी लाटांसारखा उफाळला होता. त्याआधी शास्त्रीजींनी पाकिस्तानला धडा शिकविला तेव्हाही देशाने तो अनुभवला होता. मात्र तेव्हाचे त्याचे स्वरूप राष्टÑीय होते. कुणा राजकीय पक्षाने त्याचे भांडवल केले नव्हते. आता मोदींचा व त्यांच्या पक्षाचा उत्साह प्रचारकी व राजकीय आहे. निवडणुका समोर आहेत आणि मोदी त्यांच्या सभांमध्ये ‘आप मेरे साथ है ना’, ‘रहेंगे ना’ असे प्रश्न श्रोत्यांना विचारताना आढळले आहेत. सैन्याच्या विजयाचा फायदा सत्ताधारी पक्षाला सहजपणे मिळतो. मात्र तो असा मागून मिळवणे हे प्रगल्भ राजकारणाचे लक्षण नाही. जनतेने तो आपणहून द्यायला हवा. चर्चिल यांच्या नेतृत्वात इंग्लंडने दुसरे महायुद्ध जिंकले. मात्र नंतर झालेल्या निवडणुकीत त्यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा पराभव झाला व तेथे समाजवाद्यांचे अॅटली सरकार अधिकारारूढ झाले. युद्धकाळचा नेता व शांततेतील नेता यातला फरक इंग्लंडच्या जनतेला कळत होता हा याचा अर्थ. मात्र तेथे सांगायची बाब एवढीच की सैनिकांच्या बलिदानाचे व रक्ताचे राजकारण करू नका. जो कुणी असे करील तो या रक्ताचा व्यापारी ठरेल. तो नेता राहणार नाही. पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्री ही आदराची स्थाने आहेत. मात्र हा आदर टिकविणे ही त्यांचीही जबाबदारी आहे.