मारुतीची बेंबी अन् चंद्रकांतदादा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 04:03 AM2018-06-25T04:03:08+5:302018-06-25T04:03:37+5:30
मारुतीच्या बेंबीतील अंगुली प्रवेशाने काहींना गारवा अनुभवायला मिळाला तर काहींना गारव्याच्याऐवजी चक्क विंचवाचाच डंख झाला. पिढ्यान्पिढ्या ऐकलेली ही कहाणी आपल्या इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेला माहीत होती
मारुतीच्या बेंबीतील अंगुली प्रवेशाने काहींना गारवा अनुभवायला मिळाला तर काहींना गारव्याच्याऐवजी चक्क विंचवाचाच डंख झाला. पिढ्यान्पिढ्या ऐकलेली ही कहाणी आपल्या इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेला माहीत होती. महागुरू नारदांनी या आठवड्यात त्याच बेंबी आणि विंचवाची असाईनमेंट दिल्याने तो बुचकळ्यात पडला होता. नारदांनी असाईनमेंटची लिंक चंद्रकांतदादांशी जोडली होती. त्यामुळे आता थेट दादांना भेटायचे. सवयीप्रमाणे शिवसेना नेत्यांना गोडगोड बोलून कटवतात तसे आपल्यालाही कटवले तर मात्र महागुरूंना गळ घालून दादांना इंद्रदरबारातच खेचायचे, असे यमकेने ठरवले. यमकेने फोन लावून डांगऱ्यांच्या मोहनकरवी भेट मिळविण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर की मुंबई या तळ्यात-मळ्यातल्या खेळात भेट काही मिळेना ! अखेर यमकेने महागुरूंनाच संपर्क साधला व बोलू लागला...
यमके- गुरुदेव, एकतर मारुतीची बेंबी आणि दादांचा गारवा हे समीकरण माझ्या काही लक्षात येईना ! दादांची पण भेट होईना. आता तुम्ही त्यांना इंद्रदरबारात जाब विचारायला बोलवा.
नारद- शिष्या यमके, गिरणी कामगाराचा मुलगा आणि त्यात संघ संस्कारात पूर्णवेळ आयुष्य वेचलेल्या दादासारख्या माणसाची भेट मिळवू शकत नाहीस?
यमके- मी प्रयत्न केला. पण अनेकांची मनधरणी करण्याच्या मोहिमेवर असल्याचे मला सांगण्यात आले. नाथाभाऊ शेतीऐवजी महसूलवरच डोळा ठेवून असल्याचीही चिंता दादांना असल्याने आधी घर मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला आहे...
नारद- (यमकेचे बोलणे तोडत) अरे काहीही असले तरी मोटाभाई अमितशेठ त्यांच्या बाजूला असताना कसली ती चिंता.
यमके- ते खरे आहे. पण ‘संकटमोचक’ म्हणून त्यांनी राबविलेल्या मोहिमा आता थंड होऊ पाहताहेत.
नारद- त्यासाठीच तर तुला ही असाईनमेंट दिली. मराठी भूमीतील अनेक जिल्ह्यातील मासे गळाला लावण्याचे काम दादांनी केले. सेनेने कितीही शिव्या-शाप दिले तरी ‘आम्ही एकत्रच राहणार’ हा सूर त्यांनी कायम ठेवला.
यमके- पण मारुतीची बेंबी आणि चंद्रकांतदादा यांचा काय संबंध?
नारद- आपण जिल्ह्या-जिल्ह्यात दादांनी गळाला लावलेल्या माशांविषयी बोलत होतो. थेट मोदींच्याच गळाला लागलेले राजू शेट्टी मारुतीच्या बेंबीतील त्यांनी केलेल्या अंगुली स्पर्शाला विंचवाचा डंख लागल्याने गळ तोडून मुक्त झाले म्हणे ! दादांच्याही गळाला विंचवाचा डंख असल्याची दवंडी शेट्टी आता पिटत आहेत...
यमके- होऽहोऽहो... आले ध्यानात. दादांनी पद्मश्री डॉ. डी.वाय.दादांचा नातू ऋतुराजलाच गळ लावण्याचा प्रयत्न केला होता ना...
नारद- अरे तो बंटी पाटलांनी शेट्टींच्या अनुभवाच्या आधारावरच हाणून पाडला. राज्यात असे अनेक गळाला लागलेले मोहरे सत्तेची फळे चाखत आहेत, पण भाजपमध्ये मात्र यायला तयार नाहीत. मग तूच सांग दादांचे बेंबी, गारवा अन् विंचवाशी नाते आहे की नाही?
यमके- पण दादा भला माणूस अन् हाडाचा कार्यकर्ता आहे. सोलापूर जिल्ह्यातही दादांना अर्धा जिल्हा गळाला लागला, पण शिंद्यांपासून परिचारकांपर्यंत एकालाही भाजप प्रवेशाचा मुहूर्त सापडत नाही. मग बिच्चाºया दादांना कशाला दोष देता?
- राजा माने