मेरीचा ख्रिस्तमाता ते देवमाता प्रवास, वाचा येशू जन्माची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 03:56 AM2019-12-25T03:56:18+5:302019-12-25T03:56:45+5:30

इतिहास सांगतो की, पहिल्या शतकाच्या काळात ज्यू स्त्रियांना समाजात फारसे महत्त्व दिले जात नव्हते

Mary's journey from Christianity to God, read the story of Jesus' birth | मेरीचा ख्रिस्तमाता ते देवमाता प्रवास, वाचा येशू जन्माची कथा

मेरीचा ख्रिस्तमाता ते देवमाता प्रवास, वाचा येशू जन्माची कथा

Next

जोसेफ तुस्कानो

दोन हजार वर्षांपूर्वी मेरी नाझरेथकर या सामान्य स्त्रीने बेथलेम नगरीत येशूबाळाला जन्म दिला होता. या पृथ्वीतलावर घडलेली ती एक अद्भुत घटना होती हे कालांतराने सिद्ध झाले. मेरी ही जोसेफ सुताराची वाग्दत्त वधू होती. त्यांचा शरीरसंबंध आला नव्हता, तरी परमेश्वरी कृपेने मेरीचे दिवस भरले होते आणि देवदूताकडून पोहोचलेल्या निरोपाचा मेरीने धाडसाने तर जोसेफने मोठ्या मनाने स्वीकार केला होता. देवपुत्राला जन्माला घालणे ही एक जबाबदारी होती व ती त्या दोघांनी स्वीकारली होती. विज्ञानाच्या कक्षेत न बसणारी ती घटना चमत्कार गणली गेली. मात्र, आधुनिक संशोधन तत्संबंधी वेगळी मते मांडत आहे.

इतिहास सांगतो की, पहिल्या शतकाच्या काळात ज्यू स्त्रियांना समाजात फारसे महत्त्व दिले जात नव्हते व पुरुषप्रधान संस्कृतीचे प्राबल्य होते. परंतु, मरियेने देवाचा शब्द शिरसावंद्य मानल्याने नव्या करारात तिला स्थान मिळाले आणि तिला देवाची माता म्हणून गणले जाऊ लागले. गालिली प्रांताच्या ज्युडिया विभागात तिचे वास्तव्य होते व पवित्र आत्म्याद्वारे ती गर्भवती झाली हा बायबलच्या नव्या करारातील मॅथ्यू आणि ल्युक यातील उल्लेख सोडला तर तिच्या अस्तित्वाचा कुठेच पुरावा नाही, याकडे अभ्यासक बोट ठेवत आहेत. मेरी आणि जोसेफ गरीब घराण्यातील होते आणि त्यामुळे त्यांच्या घराणेशाहीची धनाढ्य लोकांप्रमाणे नोंद ठेवली गेली नसावी. तरीही संशोधकांना वाटते की ल्युकने कथन केलेली त्यांच्या पूर्वजाची माहिती ही धर्मभोळेपणातून आली असावी कारण त्या माहितीची मॅथ्यूच्या हकीगतीशी सांगड बसत नाही. ज्यू परंपरेनुसार काही धनवान नि गुणवान स्त्रियांची नीटनेटकी नोंद बायबलमध्ये आढळते, पण ग्रामीण भागात वाढलेल्या मेरीची दखल कोण घेणार? ज्यूंना ताब्यात घेतल्यावर रोमन प्रशासकांनी सामान्य लोकांच्या अस्तित्वाच्या नोंदी ठेवल्या नव्हत्या. त्यामुळे मेरीचा इतिहास अज्ञात राहिला. तत्कालीन ज्यू कायद्यानुसार, स्त्रिया समाजातील पुरुषांच्या अधिपत्याखाली जीवन जगत. प्रारंभी बापाची आणि नंतर नवऱ्याची त्यांच्यावर अधिसत्ता चाले. नागरिकत्वापासून त्यांना वंचित ठेवले जाई. केवळ काही कायदेशीर सवलती तेवढ्या देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली जात. लग्नासंबंधीची अशीच एक सवलत होती ती म्हणजे पुरुषाने दुसºया बाईशी घटनेनुसार विवाह केला तर पहिल्या बायकोला घटस्फोट देताना बिदागी द्यावी लागे.

फारसे स्वातंत्र्य नसले तरीही त्या काळच्या बायांना कुटुंबातील खुपश्या जबाबदाºया पेलाव्या लागत. धार्मिक नियमांनुसार जेवणखान बनविणे, साब्बाथ सणाची साग्रसंगीत तयारी करणे, ज्यू श्रद्धेनुसार मुलाबाळावर संस्कार करणे इ. कामे त्या नित्यनियमाने करत.
‘नॅशनल जिओग्राफी’ या ख्यातकीर्त नियतकालिकातील ‘बायबलिकल वर्ल्ड’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या शास्त्रोक्त शोधनिबंधानुसार त्या काळी मुली चौदाव्या वर्षी वयात येत अन् त्याच काळात त्यांची लग्ने ठरवीत. त्या काळात लग्नाच्या पहिल्या रात्री समागमाच्या वेळी वधूच्या योनीतून रक्तस्राव झाला नाही तर तिला बदफैली ठरवीत, ही घृणास्पद पद्धतदेखील होती. प्रसंगी, त्या तरुण मुलीला दगडांनी ठेचून मारीत. अशा या प्रतिकूल बिकट काळात, जोसेफशी वाङ्निश्चय झालेल्या मरियेने येशूला जन्म देण्याचे खूप मोठे धाडस दाखविले होते. अर्थात, जोसेफची दयाळू वृत्ती इथे कामी आली होती कारण त्याने ते मूल आपले असल्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे मेरी त्या अग्निपरीक्षेतून वाचली होती. जगाचे तारण करणारा देवपुत्र जगती आला होता. जीवाचा आटापिटा करत त्या सुतार दापत्याने त्याला मोठे केले होते. गुराच्या गोठ्यात जन्मलेल्या येशू बाळाला मोठ्या शिताफीने हेरोद सम्राटाच्या कत्तलीतून वाचविले होते. ख्रिस्त आपल्या पित्याच्या सुवार्ता प्रसारासाठी घराबाहेर पडला तेव्हा तिने देवाची योजना आठवून मोठ्या मनाने त्याला बाहेर जाऊ दिले. क्रुसावर त्याला हाल हाल करून मारण्यात आले तेव्हा तिची अवस्था काय झाली असेल?

इ.स. ४३१ साली तुर्की येथे भरलेल्या तिसºया धर्मपरिषदेत मरिया येशूची माता म्हणून अधिकृत घोषणा झाली होती. तिथेही ‘देवमाता’ की ‘ख्रिस्तमाता’ हा वाद गाजला, कारण ती मानवरूपी ख्रिस्ताची आई होती व ख्रिस्ताच्या दैवी अंशाचा तिथे संबंध नव्हता हा विचार पुढे आला होता. परंतु कॉनस्टिटीनोपलचे बिशप नेस्टोरीयस यांनी मांडलेल्या प्रस्तावाला अन्य धर्मगुरूंनी विरोध केला आणि देवमाता हे संबोधन रूढ केले. आजतागायत मेरीला देवमाता म्हणून गौरविले गेले आहे आणि भाविक मनोभावे तिची याचना करत आहेत.
नॅशनल जिओग्राफिक मासिकाने डिसेंबर २0१५ च्या अंकात मरियेचा ‘द मोस्ट पावरफुल वूमन इन द वर्ल्ड’ असा गौरव केला त्याचे हेच तर कारण आहे. कॅथलिक भाविकासाठी ही मोठी पर्वणी आहे. केवळ ख्रिस्तीच नव्हे तर अन्य धर्मीय मंडळीदेखील मरियामातेच्या दर्शनार्थ जगभरातील तीर्थस्थानांकडे झुंडीने लोटतात. कुराणात तर मेरीचा (मरियम) खूप मोठ्या आदराने उल्लेख आढळतो. मेरीने भाविकांना वेळोवेळी नि जगभरातल्या विविध ठिकाणी दिलेली दर्शने ख्रिस्त सभेने अधिकृत ठरविली आहेत. मेरीचा लीनपणा तिची अमानत होती. तिची आज्ञाधारकता विलक्षण होती. परमेश्वराने केलेली तिची निवड तिने सार्थ ठरवली होती. म्हणूनच तर भाविक मध्यस्थी करण्यास तिची आराधना करतात.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत )
 

Web Title: Mary's journey from Christianity to God, read the story of Jesus' birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Christmasनाताळ