मसाला चाय; तो पहिलाच..! दुसरा कसा असेल ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 07:31 AM2024-01-20T07:31:31+5:302024-01-20T07:32:04+5:30
‘टेस्ट ॲटलस’ या जगप्रसिद्ध फूड गाइडने सर्वोत्कृष्ट ‘नॉन अल्कोहोलिक’ पेयांच्या यादीत भारताच्या ‘मसाला चाय’ला दुसरा क्रमांक दिला आहे, त्यानिमित्ताने...
- भक्ती चपळगावकर
(खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक)
भारतीय उपखंडातील बहुतेक भागातील सकाळ चहाच्या दरवळानेच सुरू होते. दक्षिण भारतात कॉफीचा सुगंध दरवळतो; पण भारतात इतरत्र आणि आपल्या शेजारी देशांतही सकाळी चहा हवाच. तोही वाफाळता. खरं तर चहा ही भारतीयांना ब्रिटिश राज्यकर्त्यांनी लावलेली सवय. चहा उत्पादनातल्या चीनच्या एकाधिकारशाहीला संपवण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची व्यावसायिक लागवड सुरू केली. भारतात चहाची विक्री सुरू केली. त्यापूर्वीही भारतात चहा होताच म्हणा पण तो काढ्यापुरता. आता लोकांनी चहा प्यावा म्हणून गोऱ्या साहेबाने प्रयत्नपूर्वक चहा बाजारात आणला. इंग्लंड पूर्णपणे चहामय झाला होताच, पण तो चहा वेगळा!
भारतीयांनी मात्र चहाला अगदी आपलंसं केलं. काढे उकळणं आपल्याला फार आवडतं आणि मसाला चहा हे काढ्याचंच एक स्वरूप आहे. चहा विशेषतः मसाला चहा इतका चर्चेत येण्याचं कारण म्हणजे ‘टेस्ट ॲटलस’ या जगप्रसिद्ध ऑनलाईन फूड गाइडने २०२३ मधली जगातल्या सगळ्यात लोकप्रिय पेयांची (मद्य नसलेली) यादी प्रसिद्ध केली आणि त्यात मसाला चहाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या क्रमांकावर अगुआस फ्रेकास नावाचं मेक्सिकन सरबत आहे. या सरबताबद्दल आणि मेक्सिकन खाद्यसंस्कृतीबद्दल पूर्ण आदर बाळगून असं (अभिमानानं) म्हणावंसं वाटतं की आमच्या मसाला चहाची बरोबरी तुम्ही करूच शकणार नाही. आमचा मसाला चहा, प्रांताप्रमाणे बदलतो.
आलं, वेलची, दालचिनी, लवंग, केशर, मीरे, बडिशेप वगैरे मसाले कुटून उकळत्या दुधात ते मिसळून त्यात चहाची पत्ती टाकून अजून दूध खळखळ उकळून केलेलं हे स्वर्गीय पेय. यातले मसाले कमी जास्त होतील पण दूध म्हशीचंच हवं. साखर भरपूर असली पाहिजे, पण ती कमी घालून मसाल्याचा स्वाद वाढवणारेही आहेत. आता पाणी आधी उकळायचं की दूध उकळायचं हा प्रश्न घरोघरी आहेच. बहुतेक मसाला चहाचे आस्वादक दुधातच मसाले उकळले की हवी ती चव येते असं हिरिरीने सांगतात. इतकंच काय, पाणी उकळून चहा पत्ती टाकणारे आणि दुधात पत्ती उकळणारे अशा गटात वाद हे कायम ठरलेलेच.
साग्रसंगीत मसाला चहा प्यायचा असेल तर तो टपरीवरच प्यायला पाहिजे. चहावाल्याकडचं कळकट भांडं, त्यात ताजं म्हशीचं दूध आणि मसाले घालून केलेला चहा वेगळ्याच चवीचा होतो. त्यातही मसाला चहा दुधाळ हवा, गोड हवा; पण त्यात मसाले आणि चहा यांचं प्रमाण कमी असेल तर ते गोड दूध बनतं आणि यातच अनेक चहावाल्यांचा चहा फसतो!
चहाची लोकप्रियता काबीज करायला अनेक उद्योजक पुढे आले आहेत आणि आता अगदी छोट्या गावांपासून महानगरांपर्यंत चहाच्या फ्रांचायजी निघाल्या आहेत. चहाच्या टपरीचं हे मोठं रूप. एमबीए चायवाला, टी व्हिला कॅफे असो की येवले किंवा अमृततुल्य; चहाला डिमांड आहेच. यातील बहुतेक उत्पादकांचा स्वतःचा चहाचा मसाला असतो. त्यातही श्रमिकांना स्वस्तातला चहा विकणारे वेगळे आणि चहा एन्जॉय करण्यासाठी जमणारे वेगळे. एकूण काय भारतीय उपखंड आणि चहा यांची ताटातूट कुणीही करु शकत नाही आणि कुणीही मसाला चहाला दुसरा नंबर दिला तरी आमच्यासाठी तो नंबर वनच आहे.
गंमत म्हणजे ही यादी घोषित करताना ‘टेस्ट ॲटलस’ ने आपल्या इन्स्टाहँडलवर मसाला चाय असं न लिहिता ‘चाय मसाला’ असं लिहिल्याने चहाप्रेमी संतापलेच. तुम्ही स्वतःला जागतिक स्तरावरचं फूड गाइड म्हणवून घेत असताना करोडो लोक जे पेय पितात त्याचा उल्लेख चुकीचा, वेगळा अर्थ लागणारा करणं म्हणजे पाश्चिमात्य जग पूर्वेकडच्या जगाच्या खाद्य संस्कृतीबद्दल अजूनही किती बेफिकीर आहे याचंच लक्षण नव्हे का?