मसूद अजहरचे लाड चीन का पुरवतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:40 AM2019-03-18T06:40:18+5:302019-03-18T06:40:55+5:30

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत या वेळी ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहर यास ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यात चीन साथ देईल, अशी वेडी आशा भारतात काही लोकांनी बाळगली होती. खरं तर चीन असे करेल याची कल्पना करणेही मुश्कील आहे.

Masood Azhar & China? | मसूद अजहरचे लाड चीन का पुरवतो?

मसूद अजहरचे लाड चीन का पुरवतो?

Next

- विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड,
लोकमत समूह)

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत या वेळी ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहर यास ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यात चीन साथ देईल, अशी वेडी आशा भारतात काही लोकांनी बाळगली होती. खरं तर चीन असे करेल याची कल्पना करणेही मुश्कील आहे. चीनने त्याला जे करायचे होते तेच केले. मसूद अजहर हा सध्या जगातील दहशतवादाचा प्रमुख चेहरा आहे व त्याच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे, याच्याशी चीनला काहीही देणेघेणे नाही. चीनला फक्त स्वत:चे हित जपण्यात स्वारस्य आहे. म्हणूनच हा निर्णय किमान सहा महिन्यांसाठी थोपवून चीनने सलग चौथ्या वेळेला मसूदला वाचविले आहे. मसूद पाकिस्तानचा लाडका आहे, हेही चीनच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
अजहर मसूदला संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंधांपासून वाचविण्यात चीनचे हित अनेक प्रकारे गुंतलेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ हे सूत्र चीन पक्के जाणून आहे. चीन भारताशी नेहमीच शत्रूसारखा वागत आला आहे. पाकिस्तानचे भारताशी वागणेही तसेच आहे. अशा प्रकारे भारत हा दोघांचा सामायिक शत्रू असल्याने चीन व पाकिस्तान दोस्त आहेत. त्यांची ही मैत्री आजची नाही. फार पूर्वीपासून ही मैत्री आहे. पाकिस्तानशी आर्थिक व सामरिक संबंध अधिक वाढविता यावेत यासाठी सन १९५० च्या दशकात चीनने दोन्ही देशांना जोडणाऱ्या काराकोरम मार्गाचे विस्तारीकरण केले. सध्या चीन जी ‘चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर’ योजना राबवीत आहे त्यात या काराकोरम महामार्गाचे महत्त्वाचे स्थान आहे. दुसरीकडे पाकिस्तानने भारताच्या हडपलेल्या काश्मीरमधील हुंजा-गिलगिटचा प्रदेश
१९६३ मध्ये चीनला देऊन टाकला. काराकोरम पर्वतरांगांतून अलीकडे-पलीकडे जाण्यासाठी हाच प्रदेश जणू प्रवेशद्वार आहे.
भारतावर वचक ठेवण्यासाठी पाकिस्तान आपल्या कह्यात राहील, असा चीनचा नेहमीच प्रयत्न असणे उघड आहे. तिबेटचे बौद्ध धर्मगुरू व त्यांच्या विजनवासी सरकारला भारताने आश्रय द्यावा, हेही चीनला पोटशूळ होण्याचे आणखी एक कारण आहे. खरे तर चीन व पाकिस्तानची दोस्ती याहूनही घनिष्ट झाली असती, पण अमेरिकेने ते होऊ दिले नाही. त्या वेळी भारत सोव्हिएत संघाच्या जवळ होता. त्यामुळे अमेरिकेच्या दृष्टीने चीन व भारत हे दोन्ही डोकेदुखी होते. त्या वेळी अमेरिका व सोव्हिएत संघ यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. अमेरिकेने डॉलरचा वर्षाव करून पाकिस्तानला आपल्या कंपूत घेतले. आजही पाकिस्तानकडे अमेरिकेचे ६० अब्ज डॉलरचे देणे बाकी आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था या अशा परकीय मदतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. कित्येक वर्षांची त्याची सवयही झाली. अमेरिकेने हात आखडता घेताच पाकिस्तान चीनच्या मांडीवर जाऊन बसला. चीनला तेच हवे होते. भारताला अडचणीत आणणे या समान सूत्राने दोघांचे घट्ट मैत्र जुळले.
आता चीन-पाकिस्तान दोस्तीमध्ये मसूद अजहरची ‘एंट्री’ कशी काय झाली हे पाहू. या पाकिस्तानी अतिरेक्याला १९९४ मध्ये भारतात अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आलेल्या भाजपा सरकारने एअर इंडियाच्या विमानाचे अफगाणिस्तात कंदाहर येथे अपहरण झाल्यावर चाच्यांच्या धमक्यांपुढे झुकून अटकेतील मसूद अजहरला कंदाहरला नेऊन सोडले होते. त्यानंतर हा मसूद दहशतवाद्यांमध्ये तर ‘हीरो’ झालाच, पण पाकिस्तानी लष्कराचाही लाडका बनला. ‘तहरीक-ए-तालिबान’ने पाकविरोधात आघाडी उघडली तेव्हा पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेने अनेक दहशतवाद्यांना मसूद अजहरच्या ‘जैश-ए-मोहम्मद’मध्ये भरती केले. दहशतवादी कारवाया करून भारताला जेरीस आणणे एवढे एककलमी उद्दिष्ट ठेवूनच पाकिस्तानने मसूद अजहरला पोसले आहे.
मसूदची संघटना हिंस्र व खूप ताकदवान आहे, हे चीन जाणून आहे. चीनला त्यांच्या मदतीची खूप गरजही आहे. धार्मिक कट्टरवादाचे कंबरडे मोडण्याच्या कम्युनिस्ट पक्षाच्या मोहिमेचा भाग म्हणून चीनने शिनजियांग प्रांतातील उग्यीर वंशाच्या मुस्लीम समाजाचे जिणे नकोसे करून टाकले आहे. तेथे मुस्लीम पुरुषांना लांब, रुळणारी दाढी ठेवण्यास व महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सन २०१४ मध्ये तर रमझान महिन्यात रोजे ठेवण्यासही बंदी घालण्यात आली होती. इस्लामचे पालन करत असल्याचा संशय जरी आला तरी त्या व्यक्तीला चिनी सैनिक अटक करून सरळ तुरंगात टाकतात. चीन या तुरुंगांना सुधारगृहे म्हणतो. पण आश्चर्य म्हणजे जगातील कोणताही मुस्लीम देश या उग्यीर मुसलमानांची बाजू घेऊन बोलायला तयार नाही. मसूद अजहरला डिवचले तर तो आपल्या शिनजियांग प्रांतात उपद्रव करेल, अशी चीनला भीती आहे.
चीन-पाकिस्तान इकॉनॉनिक कॉरिडॉरमध्ये चीनने ४६ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. मसूद अजहरला गोंजारले नाही तर मसूद आपल्याला पाकिस्तानमध्ये काम करणे मुुश्कील करेल व एवढी मोठी गुंतवणूक धोक्यात येऊ शकेल, अशीही चीनला भीती आहे. दहशतवाद हा पाकिस्तानच्या सुरक्षा धोरणाचा अविभाज्य भाग असल्याने मसूद अजहरला आवर घालण्यात पाकचे सैन्य व गुप्तहेर संघटनाही मदत करणार नाहीत, हेही चीन जाणून आहे. चीन मसूद अजहरचे लाड पुरवीत असल्याची ही कारणे आहेत.

Web Title: Masood Azhar & China?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.