मास्टर कृष्णराव : संगीतक्षेत्रातील एक अनमोल रत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:26 AM2018-01-19T03:26:46+5:302018-01-19T03:26:52+5:30
संगीतक्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेले संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त उद्या (दि.२०) पुण्यात भारत गायन समाज आणि फुलंब्रीकर कुटुंबीयांतर्फे मास्टर
संगीतक्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेले संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त उद्या (दि.२०) पुण्यात भारत गायन समाज आणि फुलंब्रीकर कुटुंबीयांतर्फे मास्टर कृष्णरावांनी राष्ट्रगीत या विषयावर दिलेल्या सांगीतिक लढ्यावर आधारित ‘वंदे मातरम्’ हा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त...
‘वंदे मातरम्’ या देशभक्तिपर गीताला एवढी सोपी अन् सुंदर चाल कुणी लावलीय, हे बहुुसंख्य जणांना माहितीच नसेल. ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ हे ‘शेजारी’ चित्रपटातलं गाजलेलं गीत दिवाळी आली, की आजही आपल्या कानी पडतं. या गीताला कुणी संगीतबद्ध केलंय, हेही बहुतेकांना ठाऊक नसेल. या आणि अशा अनेक अजरामर गीतांच्या संगीतकाराचं नाव आहे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर! शास्त्रीय संगीत, संगीत नाटक, चित्रपट संगीत दिग्दर्शन आणि अभिनय अशा क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी केलेले पद्मभूषण मास्टर कृष्णराव हे भारतीय संगीताच्या खजिन्यातील एक अनमोल रत्नच होतं. आळंदीसारख्या तीर्थक्षेत्री २० जानेवारी १८९८ रोजी जन्मलेल्या मास्टर कृष्णरावांचं मूळ आडनाव पाठक. मात्र, औरंगाबादजवळील फुलंब्री या मूळ गावावरून त्यांचं आडनाव फुलंब्रीकर असं बदललं. मास्टर कृष्णराव सात-आठ वर्षांचे असताना त्यांचे वडील पुण्यात वास्तव्यासाठी आले. गाण्याची ओढ असलेले कृष्णराव शालेय शिक्षणात रमले नाहीत. मात्र, गाण्यातील त्यांची प्रगती पाहून त्यांच्या वडील बंधूंनी नाट्यकला प्रवर्तक मंडळीत भरती केलं. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी कृष्णरावांचा नाटकाशी आलेला संबंध अखेरपर्यंत टिकून होता. गाण्याचं कोणतंही शिक्षण घेतलेलं नसताना ते तडफेनं आणि आकर्षक रीतीनं गात. या काळात त्यांना सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) यांच्याकडे संगीताची प्राथमिक तालीम मिळाली. पुढे पं. भास्करबुवा बखले यांनी त्यांचं गाणं ऐकून कृष्णरावांना आपला शिष्य म्हणून आनंदानं स्वीकारलं. कृष्णरावांची गुणवत्ता, व्यासंग आणि चिकाटी पाहून भास्करबुवांनी दोन्ही हातांनी भरभरून आपली गानविद्या त्यांना दिली. भास्करबुवांसमवेत कृष्णरावांना मैफलीनिमित्त देशभर फिरायला मिळाल्यानं विविध गायकांच्या मैफली ऐकायला मिळाल्या. त्यांच्यावर चांगले सांगीतिक संस्कार झाले. लोकगीतं, लावण्या, पोवाडे, पंजाबी भांगडा, फकिरांची कवनं, गुजराथी गरबा, बंगाली रवींद्रगीतं, कर्नाटकी साज, असे अनेक ढंग त्यांच्या ग्रहणशील अंत:करणात सामावले गेले. मराठी वेदाध्यायी घराण्यात जन्म झाल्यामुळे श्लोक, ओव्या, आर्या, भजनं, स्त्रीगीतं, साक्या-दिंड्या, हरदासी संगीत प्रवचनं, भारुडं या साºयांचाच त्यांच्या गुणग्राहक वृत्तीवर प्रभाव पडला. संगीत नाटकातल्या पदांना पं. भास्करबुवांच्या प्रोत्साहनानं चाली देता-देता कृष्णरावांमधला चतुरस्र संगीतकार घडला. शास्त्रीय संगीताच्या बैठकीतले लोकप्रिय गायक म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होतीच. शास्त्रीय संगीत सुगम संगीताइतकंच समाजाच्या सर्व स्तरांत सोपं व आकर्षक करून पोहोचवण्याचं श्रेय त्यांना जातं. बालगंधर्व अन् कृष्णरावांनीच महाराष्ट्राला सुगम व सुबद्ध संगीताचा ‘कानमंत्र’ दिला. संगीत नाटकांबरोबरच कृष्णरावांनी ‘भक्तीचा मळा’ या चित्रपटातही संत सावता माळी यांची भूमिका केली अन् त्यात ‘आम्ही दुनियेचे राजे...’सारख्या स्वत:च संगीतबद्ध केलेल्या रचना गाऊन अजरामर केल्या. तसंच ‘कशाला उद्याची बात’, ‘बोला अमृत बोला’, ‘अगा वैकुंठीच्या राया’ अशा अनेक अजरामर रचना कृष्णरावांच्या नावावर आहेत. नाटक-चित्रपटांच्या मोहमयी दुनियेत राहूनही कृष्णराव निर्व्यसनी राहिले. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत करण्यासाठी त्यांनी घटना समितीसमोर प्रात्यक्षिकं सादर केली. अशा या महान कलाकाराच्या योगदानाला त्रिवार वंदन करताना पु. ल. देशपांडेंच्या शब्दात एवढंच म्हणता येईल - ‘वंदे मास्तरम्!’
- विजय बाविस्कर
vijay.baviskar@lokmat.com