कारगिल कटाचे सूत्रधार...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 09:57 AM2023-02-07T09:57:58+5:302023-02-07T09:58:34+5:30

१९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर होते तेव्हा परवेझ मुशर्रफ लष्करप्रमुख आणि नवाझ शरीफ पंतप्रधान होते. लाहोर शांतता कराराद्वारे भारत-पाक संबंध सुधारत होते. वाजपेयी आणि नवाझ शरीफ यासाठी अनुकूल होते.

Mastermind of the Kargil Conspiracy pervez musharraf | कारगिल कटाचे सूत्रधार...

कारगिल कटाचे सूत्रधार...

googlenewsNext

पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांचे निर्वासित अवस्थेत प्रदीर्घ आजाराने दुबईमध्ये निधन झाले. भारताची राजधानी दिल्लीत १९४३ मध्ये त्यांचा जन्म झाला.  वयाच्या चौथ्या वर्षी त्यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले. घरची परंपरागत परिस्थिती चांगली असल्याने उच्चशिक्षण घेऊन लष्करात दाखल झाले. भारताविरुद्ध पाकिस्तानने १९६५ चे युद्ध छेडले त्यात ते सहभागी झाले. बांगलादेश मुक्तीसाठी भारताने आक्रमण केले तेव्हाही परवेझ मुशर्रफ पाकिस्तानच्या बाजूने भारताविरोधात लढले. ‘एक लढवय्या सैनिक अधिकारी’ अशी प्रतिमा असलेले मुशर्रफ मनातून भारतविरोधी कारवायांसाठी वारंवार दु:साहसी वृत्तीने वागत राहिले. लष्करात त्यांचा दबदबा तयार झाला; पण भारताच्या विरोधात त्यांच्यात द्वेष ठासून भरला होता.

१९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर होते तेव्हा परवेझ मुशर्रफ लष्करप्रमुख आणि नवाझ शरीफ पंतप्रधान होते. लाहोर शांतता कराराद्वारे भारत-पाक संबंध सुधारत होते. वाजपेयी आणि नवाझ शरीफ यासाठी अनुकूल होते. मात्र, लष्करप्रमुख म्हणून मुशर्रफ यांच्या मनात वेगळेच काही तरी शिजत होते. त्याचा सुगावा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही लागला नव्हता. हाच तो कारगिल युद्धाचा कट होता आणि त्याचे सूत्रधार मुशर्रफ होते. भारताच्या ताब्यातील कारगिल खोऱ्यात साध्या वेशातील पाक सैनिकांना घुसखोरी करायला लावून कारगिल ताब्यात घेण्याचा तो प्रयत्न होता. या घुसखोरीने लाहोर शांतता कराराचे तुकडे तुकडे झाले. भारताने हा कट उधळून लावत कारगिल युद्ध जिंकले. पाकिस्तानच्या घुसखोर सैनिकांचा पाडाव केला. त्यातून पाकिस्तानात राजकीय भूकंप झाला. नवाझ शरीफ यांचे सरकार पदच्युत करून लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी देश ताब्यात घेतला. लष्करशहा पुन्हा एकदा पाकिस्तानचा हुकूमशहा बनला. त्याचा खूप मोठा परिणाम भारत-पाकिस्तान संबंधांवर झाला.

नवाझ शरीफ यांना देश सोडून जावे लागले. १९९९ ते २००८ पर्यंत परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख म्हणून हुकूमत ठेवली. दहशतीचा वापर करून ते सत्ताधीश झाले होते. त्यांना कारगिल जिंकता आलेच नाही, शिवाय पाकिस्तानातील दहशतवादालाही संपविता आले नाही. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी चारवेळा हल्ला करून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्यानंतर दहशतवादविरोधी भूमिका घेतल्याचे दाखवून देण्यासाठी त्यांनी अनेक संघटनांवर कारवाई केली. मात्र, त्यांनी काश्मीरमधील दहशतवादी कारवाया रोखल्या नाहीत. वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याशी चर्चेचा हात पुढे केला. त्यातून आग्रा येथे बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघेल असे वाटत होते. मनाने दहशतवादीच असणारे परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानात लपलेल्या भारतीय गुन्हेगारांना ताब्यात देण्यावरून चर्चेतून काढता पाय घेतला. दाऊद इब्राहिम याला ताब्यात देण्यास नकार दिला. तेथेच चर्चा फिसकटली.

या भेटीदरम्यान त्यांनी जुन्या दिल्लीतील आपल्या ‌‘नहरवाली हवेली’ जन्मस्थळालाही भेट दिली होती. मुशर्रफ यांच्या आजोबांनी ती विकत घेतली होती. त्यांचे कुटुंब पाकिस्तानला स्थलांतरित झाल्यापासून ती मोकळी पडली आहे. मुशर्रफ यांचे वागणे आणि बोलणे वेगळे होते. प्रत्यक्षातील कृती नेहमीच भारताच्या द्वेषाने भरलेली होती.  मुशर्रफ यांच्या नेतृत्वावर त्यांच्या लष्कराचाही विश्वास राहिला नाही तेव्हा त्यांना लोकशाहीची आठवण होऊ लागली आणि २००८ मध्ये निवडणुका जाहीर कराव्या लागल्या. त्या निवडणुकीनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या काळ्या कर्तृत्वाचा पाढा नव्या सरकारने वाचायला सुरुवात केली तेव्हा ते देश सोडून परागंदा झाले.

दुबईमध्ये निर्वासित म्हणून आश्रय घेतला. त्यांना पुन्हा मायदेशात पाय ठेवता आला नाही. मनाने काळेकुट्ट असणारे परवेझ मुशर्रफ यांना सत्ता लाभली नाही. कोणत्याही आघाडीवर पाकिस्तानचे प्रश्न हाताळता आले नाहीत. अमेरिकेचे मांडलिकत्वसुद्धा भारत द्वेषासाठी त्यांनी स्वीकारले होते. त्यांचा वेश, राहणीमान आणि व्यक्त होण्याची कला प्रभावी असली, आधुनिक वाटत असली तरी ते मूलतत्त्ववादीच होते. दहशतवादाचा निवडणूक वापर आणि निवडणूक विरोध अशा दोन्हीही बाजूने ते विचार करत होते. लाहोरनंतर आग्रा करार यशस्वी करून भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करून नवा इतिहास घडविण्याची संधीही त्यांच्या या ‘गुणा’ने गमाविली.

Web Title: Mastermind of the Kargil Conspiracy pervez musharraf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.