काकांचं ‘मॅच फिक्सिंग’
By सचिन जवळकोटे | Published: April 12, 2018 12:46 AM2018-04-12T00:46:40+5:302018-04-12T08:14:57+5:30
घरोघरी ‘आयपीएल’चा ‘टीआरपी’ वाढू लागला, तसे सारे नेते एकत्र आले. ‘मी थेट कमळवाल्या शमो जोडीवर टीका केली तरीही मीडियामध्ये म्हणावा तसा स्पेस मिळेनासा झालाय,’ उद्धोंनी खंत व्यक्त केली.
-सचिन जवळकोटे
घरोघरी ‘आयपीएल’चा ‘टीआरपी’ वाढू लागला, तसे सारे नेते एकत्र आले. ‘मी थेट कमळवाल्या शमो जोडीवर टीका केली तरीही मीडियामध्ये म्हणावा तसा स्पेस मिळेनासा झालाय,’ उद्धोंनी खंत व्यक्त केली. थोरले काका बारामतीकरांनीही री ओढली, ‘मी तर एकच वाक्य तब्बल पाचवेळा आलटून-पालटून वापरलं, तरीही कुठं चर्चा नाही.’
‘टेन्शन कायकू लेनेका? हम भी आयपीएल खेलेंगे. मतलब इंडियन पॉलिटिक्स लीग,’ ब्रेकिंग न्यूज क्रिएट करण्यात माहीर असलेल्या किरीटभार्इंनी सुचवलेली कल्पना सर्वांनाच आवडली. मग काय... सारे लागले कामाला. ‘बी’ टीमची कॅप्टनशिप आपसूकच देवेंद्रपंतांकडं आली. ‘बी’ म्हणजे त्यांच्या पार्टीचं आद्याक्षर. गैरसमज नसावा. ‘आर’ टीमचं नेतृत्व अजितदादांनी स्वीकारलं. ‘हात’वाले त्यांच्याच टीममध्ये सामील झाले. पंतांच्या टीममध्ये सामील व्हावं की त्यांच्या विरोधात खेळावं, याचा निर्णय काही शेवटपर्यंत ‘उद्धों’ना घेता आलाच नाही. ‘राज’ मात्र स्टेडियमच्या ‘एसी केबीन’मध्ये बसून म्हणाले, ‘मी फक्त कॉमेंट्री करणार, आपल्याला उन्हा-तान्हाची सवय नाही,’ तेव्हा आशिषभाऊंनी टोला हाणलाच, ‘कधीतरी मैदानात उतरा. किती दिवस फक्त कॉमेंटच करणार?’
पंच म्हणून थोरल्या काकांनी नाणेफेक केली. अजितदादांनी फलदांजी स्वीकारली. सुरुवातीला धनंजय दादांनी फुल्ल बॅटिंग केली. जयंतरावांनी मात्र फक्त पीचवर टिकून राहण्याची सावध खेळी केली, कारण समोरच्या टीममधल्या अनेकांशी त्यांची आतून जवळीक. कुणाला दुखवायला नको ना...
अशोकरावांनीही ‘आदर्श’ धावसंख्या रचली. शेवटच्या टप्प्यात अजितदादा अन् पृथ्वीबाबा ही जोडी उरली. बाबांनी जोरदार चौकार अन् षटकार मारले. तसं दादा अस्वस्थ झाले. ‘तुम्ही बाबांना आऊट केलं नाही तर मैदानातील माझा होल्ड कमी होईल,’ असं ते चंद्रकांतदादांच्या कानात कुजबुजले. तेव्हा काकांनी खुणावलं, ‘आपल्याच पार्टनरला खपविण्याच्या नादात अख्खी मॅच पुन्हा एकदा हातातून घालवू नका.’
चांगले रन उभारून दादांची टीम बॉलिंगला उतरली. इकडून सुभाष बापू अन् गिरीशपंत ओपनिंगला आले. झटपट रन काढण्यावरच त्यांनी भर दिला, कारण कोणतंही काम ‘शॉर्टकट’मध्ये करण्यात दोघांचाही हातखंडा. बापू जड जाऊ लागले तसं सुशीलकुमारांनी त्यांच्याच टीममधल्या देशमुख मालकांकडून ‘टीप’ घेऊन बापूंना क्लीनबोल्ड केलं. याचा सर्वाधिक आनंद उलट चंद्रकांत दादांना झाला. बारावीचा पेपर तपासावा तसं टुकूटुकू खेळण्यात विनोदभाऊंनी विनाकारण ओव्हरं घालविली.
मात्र, इतरांच्या सोबतीनं देवेंद्रपंतांनी पल्ला गाठलाच. दोन्ही टीमची धावसंख्या समान झाली. ‘मॅच टाय करण्यापेक्षा रनरेटवर कुणाला तरी एकाला विजयी घोषित करा,’ असा हट्ट दोन्ही टीमच्या मंडळींनी धरताच थोरले काका बारामतीकर कोपऱ्यात जाऊन ‘राहुल बाबा अन् नमोभार्इं’शी गुफ्तगू करू लागले. स्टेडियममधले बिच्चारे प्रेक्षकही श्वास रोखून काकांच्या निर्णयाची वाट पाहू लागले. पण बिच्चाºयांना कुठं माहीत होतं की थोरल्या काकांनी ही मॅच नेहमीप्रमाणं अगोदरच फिक्स करून ठेवली होती.