भौतिकता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 11:38 PM2018-09-26T23:38:28+5:302018-09-27T00:03:34+5:30
जर एखाद्या माणसानं त्याच्या परमोच्च प्रकृतीपर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगली नाही, जर त्यानं केवळ एक हाडामांसाचा तुकडा म्हणूनच जगण्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न केला, तर हे सर्वांत निकृष्ट दर्जाचं अस्तित्व आहे.
- जग्गी वासुदेव
जर एखाद्या माणसानं त्याच्या परमोच्च प्रकृतीपर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगली नाही, जर त्यानं केवळ एक हाडामांसाचा तुकडा म्हणूनच जगण्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न केला, तर हे सर्वांत निकृष्ट दर्जाचं अस्तित्व आहे. आपण का आणि कशासाठी जगतो, याचा विचार कुणीच करताना दिसत नाही. आपल्या जगण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न कुणालाच पडल्याचं दिसत नाही. केवळ जन्माला आलो म्हणून जगायचं, अशी धारणा प्रत्येकाच्या ठायी दिसून येते. विशेष म्हणजे या प्रकारचं अस्तित्व आजकाल जगात रूढ होत चाललं आहे. आजचा आधुनिक माणूस किंवा ज्याला ‘मॉडर्न’ म्हटलं जातं, ते केवळ याबद्दलच आहे. एखाद्यामध्ये भीती, हाव, राग, चिंता, लाचारी अशा अनेक प्रकारच्या गोष्टी असतील, पण तरी जोपर्यंत तो त्याच्या भौतिक अस्तित्वापलीकडे काहीतरी शोधत असेल, तोपर्यंत त्याच्यासाठी एक मार्ग आहे. पण जर कुणी स्वत:ला केवळ स्वत:च्या भौतिक प्रकृतीलाच वाहून घेतलं, तर त्यासाठी कुठलाही मार्ग नाही. अशा मनुष्याची मती कुंठित झाल्यासारखीच असते. या जगण्याला मथितार्थ नसतो. मग जगायचं तरी का आणि नेमकं कशासाठी, हा प्रश्न उरतोच. हा प्रश्न प्रत्येकाला पडणं ही भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे जाण्याची पहिली पायरी आहे. पण येथूनच या विचारमंथनाच्या प्रवासाला सुरुवात होते. हा प्रवास मोठा आहे तो वैचारिकदृष्ट्या. म्हटलं तर ही विचारयात्रा तशी मोठी आहे. पण ही पहिली पायरी पार करून पुढील विचारयात्रा सुरू होते तेव्हा तो भौतिकतेच्या पलीकडे खऱ्या अर्थाने पाहायच्या अवस्थेसाठी पूर्णपणे तयार झालेला असतो. ही एक उल्लेखनीय अवस्था आहे. जेव्हा एखादा माणूस विचार करू लागतो की, ‘‘मीच सर्वकाही आहे; आणि माझ्याशिवाय दुसरं काही असू शकत नाही. मला सर्वकाही माहीत आहे आणि मला माहीत नाही असं काही असू शकत नाही.’’ ही मानवी अवस्थांमधली सर्वांत भयावह अवस्था आहे. जेव्हा त्याला जाणवू लागतं की स्वत:हून अधिक असं काहीतरी आहे, हे आध्यात्मिक प्रक्रियेचं पाहिलं पाऊल आहे. जेव्हा एखाद्याला जाणवू लागतं की, ‘‘मी आत्ता जसा आहे ते पुरेसं नाहीये, अजून काहीतरी आहे. माझं अस्तित्वच सर्वकाही नाहीये.’’ याचा अर्थ त्याच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात झाली.