गणित, भौतिकशास्त्र... आणि उद्याचे इंजिनिअर्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 04:41 AM2021-03-23T04:41:11+5:302021-03-23T04:41:39+5:30
सारेगमच्या पूर्व ज्ञानाशिवाय जसा संगीताचा अभ्यास अशक्य आहे, तसेच गणित व भौतिकशास्त्राच्या पूर्व ज्ञानाशिवाय अभियांत्रिकीचा अभ्यास अशक्य आहे.
डॉ. सुनील कुटे, अधिष्ठाता, क. का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक
व्यावसायिक महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या तरुण अभियंत्यांना रोजच्या जीवनात लागणाऱ्या साध्या साध्या व्यावहारिक कौशल्यांची जाण नसते. त्यांचे सामान्य ज्ञान सुमार असते. ही अवस्था बदलण्यासाठी अभ्यासक्रमात संवाद कौशल्ये, ताणतणाव व्यवस्थापन, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र इ. विषयांचा अंतर्भाव केला तर ते पढीक पंडित न बनता बहुश्रूत अभियंते बनतील या हेतूने अभियांत्रिकी अभ्यासक्रमात ‘लिबरल आर्टस्’ या नावाने वरील विविध विषय समाविष्ट करण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे हे स्वागतार्ह ! याचाच पुढचा भाग म्हणजे या विद्यार्थ्यांना आंतरशाखीय ज्ञान मिळावे, त्यांचे अंतिम वर्षाचे प्रकल्पसुद्धा आंतरशाखीय असावेत, याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. आपल्या ज्ञानाचा इतर शाखांचा वापर करून समाजाला उपयोग व्हावा हे स्तुत्यच आहे. विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असावे हा यामागचा मूळ हेतू आणि तो योग्यच आहे. बदलत्या काळात, नवनवीन विषय समोर येत असताना असे विषय निवडीचे स्वातंत्र्य आवश्यक आहे.
मात्र, हे करताना मूलभूत विषयांकडे दुर्लक्ष होण्याचा धोका संभवतो. अभियांत्रिकी हा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. यातील संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उतरतात. धरणे, इमारती, मोठमोठे पूल यांचे संकल्पन हे गणिती समीकरणांवर आधारित असते. ज्या संकल्पना डोळ्यांना दिसू शकत नाहीत, त्या गणितीय प्रमेय व संकल्पचित्रांच्या माध्यमातून व्यक्त करता येतात. संगणक अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी तसेच स्थापत्य, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यासारख्या मूलभूत अभियांत्रिकी शाखांचा पाया हाच मुळी गणित व भौतिकशास्त्र यावर उभा आहे. केमिकल, पॉलीमर, पेट्रोकेमिकल या शाखा रसायनशास्त्रच्या पायावर उभ्या आहेत. या विषयात प्रवेश घ्यावयाचा असेल तर अकरावी व बारावीत त्यांच्यासाठी लागणाऱ्या गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या पायाभूत विषयांचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. म्हणूनच आजही आय.आय.टी.ला प्रवेश घेताना असो वा देशातील कोणत्याही अभियांत्रिकी ज्ञानशाखेत प्रवेश घेताना या पायाभूत विषयांचे मूलभूत ज्ञान बारावीच्या पातळीवर जोखले जाते. हे विषय काढून टाकणे योग्य ठरणार नाही. आय.आय.टी.ला प्रवेश घेताना बारावीला जर पायाभूत विषयांचे ज्ञान प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असेल, तर तोच न्याय देशातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश परीक्षांना लागू करणे दर्जा टिकविण्यासाठी आवश्यक ठरेल.
देशातील व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा व हल्ली उत्तीर्ण होणाऱ्या अभियंत्यांचा दर्जा खालावण्याची अनेक कारणे आहेत. प्रवेश परीक्षांसाठी शून्यपेक्षा जास्त म्हणजे केवळ एक गुण जरी मिळाला तरी प्रवेश देणे, बारावीला ४०-४५ टक्के गुण मिळाले तरी अभियांत्रिकी प्रवेशाला पात्र ठरणे, ‘स्कॉलर’ नसलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्कॉलरशिप’ जाहीर करणे यासारख्या अनेक कारणांनी अभियांत्रिकी शिक्षणाच्या गुणवत्तेचे व दर्जाचे बुरुज ढासळायला वेळ लागणार नाही.
प्रत्येक अभ्यासक्रमासाठी पूर्व तयारीच्या विषयांचे ज्ञान आवश्यक असते. सा-रे-ग-म-च्या पूर्व ज्ञानाशिवाय जसा रागदारी व संगीताचा अभ्यास अशक्य आहे, तसेच गणित व भौतिकशास्त्राच्या पूर्व ज्ञानाशिवाय अभियांत्रिकीचा अभ्यास अशक्य आहे. एक तर आधीच शालेय शिक्षणात या विषयांचा पाया अनेक ठिकाणी ठिसूळ असतो. बारावीनंतरच्या पूर्वपरीक्षांमधूनही हे विषय वगळल्याने तो कच्चा राहिला तर निर्माण होणारे अभियंते कागदावरचे अभियंते राहतील. प्रत्यक्षात उद्योगधंदे व नोकरीत ते काहीच कामाचे असणार नाहीत.त्यापेक्षा त्या त्या वेळेलाच आवश्यक गोष्टी करणे म्हणजे खरी सुलभता. यातून पुन्हा खासगी क्लासेसवाल्यांचा धंदा उभारी घेईल हे वेगळेच. सुमार दर्जाच्या अशक्त अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या जागा भरण्यासाठी मदत होईल अशा निर्णयांपेक्षा चांगली महाविद्यालये अधिक सशक्त करायची असतील तर पाया भक्कम करणारे मूलभूत ज्ञान आणि दर्जा व गुणवत्ता यांच्याशी तडजोड होणार नाही असे निर्णय घेणेच उपयुक्त ठरेल.