महाराष्ट्रातील ‘मथुरा’!

By admin | Published: June 6, 2016 01:48 AM2016-06-06T01:48:05+5:302016-06-06T01:48:05+5:30

मथुरेत जे काही घडले, त्याला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार आहेच, पण केंद्रातील राज्यकर्ते आणि एकूणच देशातील सर्व पक्षांचे राजकारणी अशा घटना घडण्यास कारणीभूत आहेत.

'Mathura' in Maharashtra! | महाराष्ट्रातील ‘मथुरा’!

महाराष्ट्रातील ‘मथुरा’!

Next

मथुरेत जे काही घडले, त्याला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार आहेच, पण केंद्रातील राज्यकर्ते आणि एकूणच देशातील सर्व पक्षांचे राजकारणी अशा घटना घडण्यास कारणीभूत आहेत. हा जो काही ‘नेताजी’च्या नावाचा पंथ किंवा संघटना मथुरेसारख्या मोठ्या शहरात तीन वर्षे एक मोठा भूखंड बळकावून बसते, शेकडो लोक तेथे तंबू ठोकून राहतात, त्यांच्याकडे प्राणघातक शस्त्रे व दारूगोळा असतो, ही गोष्ट स्थानिक प्रशासन, राजकीय नेते यांना माहीतच नव्हती आणि न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस कारवाई करायला गेल्यावर जणू काही अचानकच सर्व काही घडले, असे जे चित्र उभे केले जात आहे, ते बनावट आहे. अशा रीतीने हे चित्र उभे करण्याचा उद्देशच जी काही चौकशी होईल, तिच्यातून सुटण्याची पार्श्वभूमी तयार करण्याचा आहे. तसाच तो इतर अनेक प्रसंगांत व घटनांतही असतो. स्थानिक, राज्य व केंद्र स्तरांवरील राजकारणी असे पंथ, गट वा संघटना यांच्याकडे दुर्लक्ष करतात, वेळ पडल्यास त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभारही लावतात; कारण त्यांच्यामागं ‘लोक’ असतात. हे ‘लोक’ उद्या-परवा जेव्हा निवडणुका होतात, तेव्हा ‘मतदार’ असतात. या पंथ, गट वा संघटना यांच्या म्होरक्यांच्या आदेशामुळे ही मते आपल्या पारड्यात पडतील, असा हिशेब केला जात आला आहे. ताजा प्रसंग मथुरेत घडला. मथुरा उत्तर प्रदेशात आहे. तेथे अखिलेश यादव यांचे समाजवादी पक्षाचे सरकार आहे. म्हणून सरकारवर ठपका ठेवणे सहज शक्य आहे. मात्र मथुरेच्या मतदारसंघातील खासदार प्रख्यात अभिनेत्री हेमामालिनी आहेत आणि तसे बघायला गेल्यास २०१४ च्या निवडणुकीत या राज्यातील ७२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. मथुरा हे जसे धार्मिक स्थळ आहे, तसेच ते सुप्रसिद्ध पर्यटन केंद्रही आहे. अशा या शहरात इतका असा शस्त्रे व दारूगोळा साठवून एक संघटना राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी राजीनामा द्यावा, देशाचे चलन रद्द करून ‘आझाद हिंद फौजे’च्या काळातील चलन वापरात आणावे इतक्या केवळ कल्पनारंजन वाटाव्या अशा मागण्या करीत शहरातील एक मोठा भूखंड बळकावून शेकडो लोकांना तेथे राहायला आणून ठेवत होती, ही गोष्ट हेमामालिनीसह उत्तर प्रदेशातील भाजपाच्या एकाही खासदाराला माहीत नव्हती, यावर कोणी व का विश्वास ठेवावा? हे सगळे चालवून घेतले जात होते, ते ‘नेताजी’ हा मुद्दा सध्याच्या राजकारणातील काँगे्रसविरोधाचे हत्त्यार म्हणून वापरण्यात येत असल्यानेच. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत. त्यावेळी ‘नेताजी’चे नाव घेणारी ही संघटना उपयोगी पडू शकते, याच हेतूने तिच्याकडे काणाडोळा केला गेला. पंजाबात काँगे्रसने अकाली दलाला नामोहरम करण्यासाठी हेच असे राजकारण केले आणि भिन्द्रनवाले यांचे भूत उभे केले. त्यातूनच जो हिंसाचार झाला, दहशतवाद माजला त्याने देशच हादरून गेला. शीख पंथाला मान्य नसलेल्या निरंकारींंच्या प्रमुखांची भिन्द्रनवाले यांच्या समर्थकांनी हत्त्या केली होती. भिन्द्रनवाले नावाच्या या भुताला पाकने हाताशी धरून भारतात खलिस्तानच्या मागणीवरून दहशतवाद माजवला. या तीन दशकांपूर्वीच्या घटना अजूनही विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या नसतानाच, पंजाबात पुन्हा एकदा हाच आगीशी खेळ पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने खेळला जात आहे. गुरू ग्रंथसाहेबाची पाने फाडून फेकलेली काही खेड्यात आढळून आल्याने तणाव वाढत जाऊन काही महिन्यांपूर्वी मोठी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. ती निवळली आणि या परिस्थितीचा फायदा कोणाला उठवता आला नाही, हे आपले सुदैव. पंजाब व हरयाणा या दोन राज्यांत लाखो भक्तगण असलेल्या ‘डेरा सच्चा सौदा’ या पंथाला शिखांचा प्रखर विरोध आहे. या पंथाचा प्रमुख गुरुमीत राम रहीम सिंह हा शीख गुरू गोविंदसिंह यांच्यासारखा वेष करीत असे. त्यामुळे शीख समाजात मोठा गदारोळ माजला होता. अशा या माणसाला हरयाणातील निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने हाताशी धरले होते, ते केवळ त्याच्या पाठीराख्यांची मते मिळावीत म्हणूनच. अर्थात हे केवळ दूरच्या उत्तर भारतात होते, असा गोड गैरसमज आपण महाराष्ट्रीयांनीही करून घेता कामा नये. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या तीन राज्यांना लागून असलेल्या आदिवासी भागांत आजही ‘ए.सी.भारत सरकार’ अशा नावाची संघटना आपले ‘राज्य’ चालवत आहे. सर्व प्रचलित प्रशासकीय नियम ही संघटना धुडकावून लावत आली आहे. मतदार नोंदणी करू न देणे, वाहनावर सरकारी क्र मांक लावू न देणे, रेशनकार्ड काढू न देणे असे या संघटनेचे ‘नियम’ आहेत. केशरसिंह कुँवर याने हे ‘सरकार ’ स्थापन केले. त्याच्या मृत्यूनंतर आता त्याचा मुलगा हे ‘सरकार’ चालवतो. तेही गुजरातेतील व्यारा येथे बसून. मथुरेतील आझाद भारत विधिक वैचारिक क्रांती सत्याग्रही नावाची संघटना केन्द्र सरकारकडे मागणी करते म्हणजे त्या सरकारचे अस्तित्व मान्य करते. केशरसिंहाचे अनुयायी तेही मान्य करीत नाहीत. आज अखिलेश सरकारवर ठपका ठेवणाऱ्या काँगे्रस व भाजपा यांची महाराष्ट्रात गेली दोन दशके सत्ता उपभोगून झाली आहे. त्यांनी हे ‘सरकार’ बरखास्त करण्याची कारवाई का केली नाही? महाराष्ट्रात ‘मथुरा’ होण्याची वाट आपण पाहणार आहोत काय, या प्रश्नाचे उत्तर देवेंद्र फडणवीस देतील काय?

Web Title: 'Mathura' in Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.