मुख्यमंत्री होता होता राहीलेले वित्तमंत्री !
By अतुल कुलकर्णी | Published: July 30, 2017 02:29 PM2017-07-30T14:29:52+5:302017-07-30T14:30:00+5:30
आश्चर्य वाटेल खरे, पण सुधीर मुनगंटीवार हे नाव राज्याच्या मुख्यमंत्री पदावर जाता जाता राहीलेले नाव आहे. कसे ते या लेखात सांगेन...
आश्चर्य वाटेल खरे, पण सुधीर मुनगंटीवार हे नाव राज्याच्या मुख्यमंत्री पदावर जाता जाता राहीलेले नाव आहे. कसे ते या लेखात सांगेन...
आज सुधार मुनगंटीवार यांचा वाढदिवस. त्यांना त्यासाठी शुभेच्छा. माझ्या पत्रकारितेला ३० वर्षे झाली. त्यातली गेली १५ वर्षे मी अनेक मंत्र्यांचा कारभार खूप जवळून पाहण्याची संधी मला लोकमतमुळे मिळाली. मंत्र्यांच्या कामाची पध्दती, निर्णय घेण्याची वेळ व काळ यांचे मांडले जाणारे गणितही पाहता आले. मात्र या सगळ्यांमध्ये आपण घेतलेले निर्णय अंमलात आणणारे, त्यासाठी स्वत: अत्यंत चिवटपणे पाठपुरावा करणारे आणि निर्णय झाल्यानंतर ज्याच्याशी संबंधीत तो निर्णय आहे त्याला स्वत: कळवणारे मंत्री एकमेव आहेत, ते म्हणजे सुधीर मुनंगटीवार..!
हे गृहस्थ त्यांच्या मोबाईलवर आलेल्या एसएमएसचे देखील प्रिंटआऊट काढतात आणि त्यात मांडलेल्या मुद्यांचे काय झाले याचाही फॉलोअप घेतात. त्यासाठी त्यांनी फॉलोअप शिट तयार केलेले आहे आणि ते स्वत:च त्यावर माहिती लिहून काढतात. काही घटनांचा तर मी साक्षीदार आहे. औरंगाबादच्या एका कार्यक्रमात त्यांनी ५ कोटी देण्याची घोषणा केली होती. काही दिवस झाले, औरंगाबादचे राम भोगले यांनी त्या पैशांचे काय झाले अशी विचारणा केली. तेव्हा वित्तमंत्र्यांनी त्यांच्या खात्याचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव यांना बोलावून त्या कामाचे काय झाले असे विचारले. श्रीवास्तव म्हणाले, माहिती घेतो आणि सांगतो. त्यावर तात्काळ सुधीरभाऊंनी त्यांचे फॉलोअप वही काढली. मी अमूक तारखेला, या वेळेला तुम्हाला हे काम सांगितले होते, ही घोषणा मी औरंगाबादेत या तारखेला, या वेळेला केली होती आणि तुम्ही हे काम या तारखेपर्यंत होईल असे सांगितले होते. त्याला आता दोन दिवस उलटून गेले आहेत... श्रीवास्तव यांनी दुसºया दिवशी औरंगाबादच्या लोकांना चेक देऊन टाकला..!
पाठांतर हा यांचा सगळ्यात मोठा गुण. कोणतीही आकडेवारी विचारा, तोंडपाठ. फेकाफेकी नाही. रुपये, पैशांमध्ये सगळा हिशोब क्षणात सांगण्याची सवय. झाडे किती, पाणी किती, आॅक्सीजन किती, बजेट किती, कर्ज किती, व्याज किती आणि किती झाडे लावली की किती जगतील आणि कोणत्या वर्षी त्यातून किती आॅक्सीजन मिळेल हे सगळं खाडखाड सांगण्याची त्यांची सवय. सोबतच्या आयपॅडवर अख्खा वित्त विभाग आणि वन विभाग. स्वत: अभ्यास केल्याशिवाय, माहिती घेतल्याशिवाय बोलायचे नाही हा त्यांचा गूण आज त्यांना अन्य सगळ्या मंत्र्यापेक्षा अत्यंत वेगळी प्रतिमा देऊन जात आहे.
सचिन तेंडूलकरने ग्रीन आर्मीचे ब्रँड अॅम्बेसेडर व्हावे यासाठी ते सचिनच्या घरी गेले, तर अमिताभने वृक्ष लागवड मोहीमेत सहभागी व्हावे म्हणून त्यांनी अमिताभलाही गळ घातली. राज्याच्या कामासाठी जर कोणाची मदत होते आहे हे कळाले की ते कोणाचीही वाट न पहाता त्या व्यक्तीच्या घरी पोहोचतात. वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा असे सांगण्यासाठी स्वत:चे पक्षीय, राजकीय अभिनिवेश बाजूला सारुन मुनगंटीवार सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे जाऊन आले. सीएसआर फंडातून विविध कंपन्यांनी मदत करावी म्हणून त्यांनी राज्यपालांकडे राज्यातल्या तमाम बड्या उद्योगपतींना जेवायला बोलावले. त्यात टाटा, अंबानी, बिर्ला, गोदरेज पासून सगळे हजर राहीले. राज्यात तुम्ही कसे योगदान देऊ शकता, आम्हाला थेट पैसे देऊ नका, पण ही ही कामे आहेत जी तुम्ही करु शकता असे सांगत त्यांनी पैसे नको पण कामे करुन द्या अशी गळ घातली. पैसे न मागणारे हे कदाचित पहिले वित्तमंत्री ठरले असतील...!
गेल्या ५० वर्षात जे कुणाला जमले नाही ते त्यांनी करुन दाखवले. मंत्र्यांच्या कार्यालयात खेटे मारल्याशिवाय काम होत नाही हा समज दूर करुन त्यांनी स्वत:च्या कार्यालयाला आयएसओ प्रमाणपत्र मिळवून दिले. मंत्री कार्यालयाला असे प्रमाणपत्र मिळवणारे ते देशातले पहिले मंत्री ठरले आहेत. आता मुनगंटीवार यांनी चंद्रपूर, गडचिरोलीच्या बाहेर पडून महाराष्टÑभर फिरले पाहिजे. भाजपात हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच मंत्री असे आहेत की ज्यांनी आपल्या कामातून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
आता मुद्दा मुख्यमंत्री होता होता राहीलेले वित्तमंत्री ! याचीही एक राजकीय कथा आहे. ती अशी - विधानसभेचे निकाल लागले आणि राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होणार अशी चिन्हे दिसू लागली आणि गडकरी वाड्यावर सुधीर मुनंगटीवार यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातले आमदार एकत्र आले आणि त्यांनी नितीन गडकरींच्या मुख्यमंत्रीपदासाठी घोषणाबाजी केली. तेथेच गणित बदलले. मोदींची सत्ता येऊन काही महिनेच झाले होते. त्यांना असे बंड पक्षात नको होते. परिणामी गडकरींची इच्छा असूनही ते दिल्लीत राहीले व मुनगंटीवार वित्त नियोजन आणि वन मंत्री झाले. मात्र स्वत:च्या कामातून मुनगंटीवार यांनी स्वत:ची वेगळी प्रतिमा उभी केली. उद्या देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीचे निमंत्रण आलेच तर राज्यात मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणू पहिले नाव मुनगंटीवार यांचे असेल. व त्यांना मिळता मिळता राहीली संधी त्यांच्याकडे सहजपणे येईल... वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा..!
(वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत, मुंबई)