मॉरिशस... 'थोरल्या' भावाकडून 'धाकट्या' भावाचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:22 IST2025-03-09T12:20:05+5:302025-03-09T12:22:01+5:30
दीडशे वर्षांपूर्वी फ्रेंचांनी ते ताब्यात घेतले व आपल्या ये-जा करणाऱ्या जहाजांच्या पडावासाठी याचा उपयोग सुरू केला

मॉरिशस... 'थोरल्या' भावाकडून 'धाकट्या' भावाचं कौतुक
योगेश्वर गंधे
ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ व मॉरिशसचे सांस्कृतिक सल्लागार
१२ मार्च १९६८ या दिवशी दीडशे वर्षे असलेल्या फ्रेंच वसाहतीची एका बेट मार्च समूहात अखेर झाली आणि क्रूर, यातनामय संघर्ष व अत्याचारातून सुटका होऊन 'मॉरिशस' (La-mores) हा अत्यंत छोटा देश स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. भारतीय लोक संक्षिप्तपणे याला 'मोरस' असं म्हणतात. घनदाट जंगल व चारही बाजूला समुद्राच्या पाण्याने वेढलेलं हे बेट पूर्णतः दुर्लक्षित होतं. दीडशे वर्षांपूर्वी फ्रेंचांनी ते ताब्यात घेतले व आपल्या ये-जा करणाऱ्या जहाजांच्या पडावासाठी याचा उपयोग सुरू केला. भयानक जंगलं, हिंस्त्र श्वापदं या पलिकडे तिथे काही नव्हतं. हे बेट साफ करून आपली छोटी वसाहत निर्माण करण्यासाठी त्यांनी भारतातून समुद्रकिनाऱ्याजवळच्या गावातून वेठबिगार म्हणून माणसे पकडून आणली. मग त्यात कुणी मराठी, कुणी गुजराथी, कुणी तेलगू तर कुणी बिहारी भय्या! या सगळ्या गरिबांना तिथे जाऊन अतोनात हाल-अपेष्टा, उपासमार, मृत्यू सारे सहन करावे लागले. पण घरासाठी, कुटुंबासाठी पैसे मिळतील, भूक भागेल या आशेवर ते सारे झगडत राहिले.
आडनावांची नोंद मुद्दामहून गाळून टाकल्याने संघटन व जात संघर्ष झाला नाही. पण, एकमेकांना धरून रहात, सांभाळत सुटकेसाठी, मानवी हक्कांच्या स्वातंत्र्याकरिता मोठा झगडा झेलावा लागला. त्यात तीन पिढ्या गेल्या. काही उपासमारीने, काही हिंस्त्र पशुंनी खाल्ल्याने तर बाकी विरोध केला म्हणून फ्रेंचांनी मारून टाकल्याने... आणि काही निर्जन बेटावर बंदी म्हणून ठेवल्याने खायला अन्न नाही म्हणून एकमेकांना खाऊन संपल्या !
मी पस्तीस वर्षापूर्वी तेथील सरकारच्या निमंत्रणावरून जेव्हा या बेटावर पहिल्यांदा पाऊल ठेवले तेव्हा हा पृथ्वीवरील अद्भूत स्वर्ग मना-डोळ्यांत बसला तो कायमचाच, पण तिथे जाण्यापूर्वी असा देश आहे हे मलाच काय पण भारतातील अनेक जाणत्या लोकांनाही माहीत नव्हते. शोधावे लागायचे. जगाच्या नकाशात अगदी 'टिंबा' एवढं त्याचं अस्तित्व. कुणी भारतीय पंतप्रधानही या बेटावर कधी फिरकला नाही. महात्मा गांधी जवळच्या आफ्रिकेत गेले, तिथे वर्णव्यवस्थेविरुद्ध लढले पण मॉरिशसच्या वेठबिगारी गरिबांसाठी लढल्याचे आढळले नाही. १९९० च्या दशकांत संपूर्ण जगात गोर्बाचेव्ह प्रणित ग्लासनोस्त व पेरिस्तोर्हकाचे लोण पसरून आर्थिक स्वातंत्र्य वाढले. त्याचा परिणाम मॉरिशस थोडाफार सक्षम व्हायला मदत झाली. तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे भारताच्या या धाकट्या भावाला अधिक बळ मिळाले पण उरलं तर देऊ या सापत्न वृत्तीने धाकट्या भावाला अवलंबित्व व अटींवर रहावं लागलं. परंतु गेल्या चौदा वर्षात नरेंद्र मोदी सरकारने मुक्त हस्ते या धाकट्या भावाला तिथला 'आपला माणूस' म्हणून सर्व स्तरावर मोठी मदत तर केली. मॉरिशस अवघ्या १३ लाख लोकसंख्येचा. त्यातील सत्तर टक्के आपलेच भाऊबंद भारतीय विविध भाषी. म्हणजे भारताच्या दृष्टीने धाकटे भाऊ-बहिणीच! एकेकाळी केवळ नवीन लग्न झालेल्यांसाठी 'मधुचंद्रा' करिताचं जवळचं, थोडं स्वस्त व स्वर्ग असलेलं हे पर्यटन स्थळ. एकेकाळी केवळ बीट, ऊस व इतर फळांपासून मोरस साखर तयार करणारा हा देश. आता वाईन उद्योग, जहाज बांधणी, माहिती तंत्रज्ञान, गुंतवणूक, हॉटेल सेवा, बँकांचे तंत्र अशा अनेक उद्योग-व्यवसायात हा देश पुढे आहे. मोठ्या भावाने (भारताने) धाकट्या भावाला (मॉरिशस) गेल्या दहा वर्षात प्रचंड मदत केली आहे. एका कुटुंबात धाकटे नेहमी दुर्लक्षित रहातात. कारण मोठ्या दादांची दादागिरी असते. पण भारत - मॉरिशसमध्ये संबंध हे प्रोत्साहित करणारे व सहभाग देणारे असेच आहेत. माजी पंतप्रधान प्रवींद जगन्नाथ व विद्यमान पंतप्रधान नवीनचंद्र रामुगुलाम हे भारत व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ सबका विकास' या सूत्रावर चालणारे आहेत. शिवाय भारताची सत्ता सध्या तरी बिहारी बाबूंच्या पाठिंब्यावर, पूर्ण सहकार्यावर अवलंबून आहे. पंतप्रधान म्हणजे मोठे भाऊ, नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्य दिनानिमित्त मॉरिशस म्हणजे धाकट्या भावाच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला, सहयोग वाढवायला आणि भारतीय भिन्न संस्कृतीचं स्थान मजबूत करायला मॉरिशसला येत आहेत. याचे दूरगामी परिणाम हे केवळ मोठा व धाकटा भाऊ असे नाहीत. तर या दोघांच्या संबंधांमुळे अनेक छोटे भारतीय वंशाचे देश मोठ्या भावाजवळ येण्याचे आहेत. मॉरिशस हा धाकटा भाऊ मोठ्याला आणखी मोठा करण्याचा महत्त्वाचा दुवा आहे. ही कौतुकाची थाप भविष्याचा पडघम आहे. यासाठी मोरसच्या भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.