विद्रोहाचा महाप्रवाह व्हावा

By admin | Published: May 12, 2016 02:42 AM2016-05-12T02:42:27+5:302016-05-12T02:42:27+5:30

महात्मा जोतिबा फुले यांनी ग्रंथकार सभेला लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देऊन धारावीच्या झोपडपट्टीत ‘‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, कोशिश है की सूरत बदलनी चाहिए

May be a rebel of rebellion | विद्रोहाचा महाप्रवाह व्हावा

विद्रोहाचा महाप्रवाह व्हावा

Next

महात्मा जोतिबा फुले यांनी ग्रंथकार सभेला लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देऊन धारावीच्या झोपडपट्टीत ‘‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, कोशिश है की सूरत बदलनी चाहिए...’’ असं म्हणून विद्रोहाचा हुंकार जन्माला आला आणि प्रस्थापितांना एक धक्का यानिमित्ताने देण्यात आला. तेव्हापासून अभिजन साहित्य संस्कृतीला बहुजन, विद्रोही साहित्य संस्कृतीचा पर्याय मिळाला. महाराष्ट्रात विद्रोहाची लाट तयार झाली. कला आणि संस्कृती यांच्या माध्यमांतून समाजाच्या वेदना मांडता येतात. माध्यम हे त्यासाठी एक साधन आहे. बहुजन, दलित समाजाने साहित्य, कला निर्माण कराव्यात, जपाव्यात, विषमतेला छेद देऊन समतावादी समाजासाठी योगदान द्यावे, म्हणून विद्रोही प्रवाह तयार झाला. मात्र, त्यातही गट-तट निर्माण झाल्याने महाप्रवाह कधी होणार, असा सवाल तरुणाईकडून विचारला जात आहे.
साहित्य, कला आणि समाज यांचा परस्पर संबंध आहे. समाजाचे प्रतिनिधित्व कला व साहित्याच्या माध्यमातून प्रतिबिंबित होत असते. कोणत्याही समाजाचा माणूस हा व्यक्त होण्यासाठी आपल्या विचार आणि भूमिकेशी सुसंगत विचारपीठाचा शोध घेत असतो. समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचा विचार घेऊन काही तरुण कार्यकर्त्यांनी साहित्य, कला, वेदना यांना वाट करून देण्यासाठी एक विचारपीठ असावे, या हेतूने १९९९ मध्ये विद्रोही साहित्य संमेलनाची सुरुवात केली. बहुजन, दलित, कष्टकरी समाजातील तरुण-तरुणींना प्रोत्साहन मिळावे, म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळ जन्माला आली. नामांतर चळवळीनंतर दिशाहीन झालेला तरुणांचा मोठा वर्ग या चळवळीकडे आकर्षित झाल्याने विद्रोहीची ताकद वाढली. धारावी, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सावंतवाडी, धुळे, सोलापूर, इंदापूर, कणकवली, बीड, बुलडाणा अशा अनेक ठिकाणी विद्रोहींनी मोठ्या दिमाखात संमेलने यशस्वी केली. ‘एक मूठ धान्य आणि एक रुपया’ या पद्धतीने कष्टकरी जनतेच्या योगदानातून ही संमेलने झाली. छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा फुले, शाहूमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन तळागाळात जगणारा आणि श्रमसंस्कृतीशी नाळ जोडून असणारा समाजवर्ग मोठ्या प्रमाणात विद्रोही संमेलनाकडे आकृष्ट झाला. साहित्य हीच परिवर्तनाची पहिली शिडी आहे; पण राजकारणाला परिवर्तन नको असते. कारण ते सत्तेसाठी तडजोड करतात. त्यामुळे राजकारण्यांकडून परिवर्तनाची अपेक्षा नाही. ती साहित्य, संस्कृतीचीच जबाबदारी आहे, असे म्हणून विद्रोही चळवळ वाढली आणि रुजली. विद्रोही साहित्य संमेलन केवळ अखिल भारतीय मराठी संमेलनाला पर्याय किंवा समांतर नको, तर ते दलित आदिवासी, ग्रामीण आणि स्त्रियांचे प्रश्न मांडणारे संमेलन ठरावे, अशी अपेक्षा होती आणि आहे. मात्र, औरंगाबाद येथे झालेल्या संमेलनापासून विद्रोहीमध्ये गट-तट पडले. त्यानंतर धुळ्याच्या साहित्य संमेलनात विद्रोहीचा महाप्रवाह करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यानुसार सोलापूर येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनात विद्रोहीच्या सर्व गटांनी एकत्र येऊन पुन्हा महाप्रवाहाची हाक दिली. प्रा. डॉ. एन. डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. आ. ह. साळुंखे यांनी पुढाकार घेऊन एकीकरणाचा प्रयत्न केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना काही नेत्यांनी आडमुठी भूमिका घेतल्याने अजूनही एकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे दोन-दोन संमेलनं होत आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळ वाढविण्यासाठी नेत्यांनी गट-तट सोडून एका मंचावर यावे, असे आवाहन तरुणांनी केले होते. मात्र, विद्रोहीलादेखील पर्याय देण्यासाठी काही नेत्यांनी वेगळ्या बॅनरखाली साहित्य-संस्कृती संमेलने घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. तरुणाईला भिडणारी, भावणारी ही चळवळ असल्याने पुरोगामी म्हणविणाऱ्या नेत्यांनी अहंभाव सोडून महाप्रवाह होण्यासाठी एकीकरणाचा प्रयत्न करणे काळाची गरज आहे.
- विजय बाविस्कर

Web Title: May be a rebel of rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.