‘मी आणि माझा बाप’
By Admin | Published: June 3, 2016 02:16 AM2016-06-03T02:16:24+5:302016-06-03T02:16:24+5:30
तसंही मुलींना आईपेक्षा बापाविषयी ओढ किंवा आकर्षण अंमळ जास्तीच वाटत असतं. तोच त्यांचा हिरोदेखील असतो. ‘माय डॅड ईज दि स्ट्रॉन्गेस्ट’! त्यातून बाप जर गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा बलदंड राजकीय नेता असेल
तसंही मुलींना आईपेक्षा बापाविषयी ओढ किंवा आकर्षण अंमळ जास्तीच वाटत असतं. तोच त्यांचा हिरोदेखील असतो. ‘माय डॅड ईज दि स्ट्रॉन्गेस्ट’! त्यातून बाप जर गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा बलदंड राजकीय नेता असेल तर मग त्यांच्या मुलीला वा मुलींना बापाच्या कर्तृत्वाविषयी रास्त-अरास्त जो काही असेल तो अभिमान वगैरे वाटणे ओघानेच येते. त्यामुळे ‘माझा बाप असता तर राज्यातील धनगरांना आरक्षणच काय पण सगळंच मिळालं असतं’ असं विधान फडणवीस सरकारमधील एक मंत्री आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, पंकजा मुंडे यांनी करणं हे त्या बाप-लेकीमधील नात्याला शोभूनच दिसतं. अर्थात जे एरवी शोभून दिसत असतं ते वास्तवाला धरुन असतंच असं मात्र नाही. हे खरं आहे की महाजन-मुंडे (की वसंतराव भागवत?) यांनी महाराष्ट्रातील सत्तेचं गणित जमवून आणण्यासाठी ‘माधवं’ म्हणजे माळी-धनगर-वंजारी यांचा त्रिवेणी संगम घडवून आणण्याची मंत्रणा केली होती. अर्थात मंत्रणा तात्त्विक असली तरी आजकालचे राजकारण तत्त्वावर नव्हे तर माणसांवर चालत असल्याने जेव्हां धनगर समाजाचे नेते अण्णा डांगे यांची उपयुक्तता संपल्याचे पक्षाच्या लक्षात आले (पक्ष म्हणजे महाजन-मुंडे असे मधू देवळेकरांनी आधीच म्हणून ठेवले होते हे येथे लक्षात घ्यायचे) आणि दरम्यान प्रमोद महाजन जग सोडून गेले तेव्हां एकट्या मुंडे यांच्यावर अधिकची जबाबदारी येऊन पडली. तिचे वहन करताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अण्णांची जागा भरुन काढण्यासाठी महादेव जानकर यांना आपल्याकडे वळवून घेतले. आपले स्वतंत्र अस्तित्व अबाधित राखण्याच्या अटीवर त्यांनीही मग भाजपाबरोबर राहाण्याचा शब्द दिला. मुंडे यांनी पक्षाच्या वतीने जानकरांना दिलेल्या कोणत्या शब्दांच्या बदल्यात जानकरांनी मुंडेंना शब्द दिला हे गुलदस्त्यात. पण बहुधा मंत्रिपदाचा शब्द असावा. तो आणखीही अनेकाना दिला असावा असे गेल्या काही महिन्यांमधील राजकीय हालचालींवरुन लक्षात येते. पण त्याशिवाय आणखीही एक शब्द दिला हे आता पंकजा मुंडे यांच्या विधानावरुन स्पष्ट होते. राज्यातील धनगर समाज विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या संवर्गात मोडतो व त्याच्यासाठीचे आरक्षण साडेतीन टक्क््यांचे आहे. हा संवर्ग बदलून मिळावा आणि आपल्याला अनुसूचित जमात म्हणून ओळखले जावे अशी धनगर समाजाची मागणी आहे. कारण अनुसूचित जमातींसाठीचे आरक्षण सात टक्क््यांचे आहे व या संवर्गात तुलनेने म्हणा वा शिक्षणाच्या अजूनही अल्प असलेल्या प्रमाणामुळे म्हणा स्पर्धा कमी आहे. याच मागणीसाठी याच महादेव जानकरांच्या नेतृत्वाखाली राज्यात आघाडीचे सरकार असताना मोठे आंदोलन झाले होते व कदाचित तेव्हांच मुंडे यांची जानकरांवर बाहुली बसली असावी. स्वाभाविकच काँग्रेसवाले काय तुमची मागणी पूर्ण करणार, आमच्यात या आम्ही ती पुरी करु असा शब्द गोपीनाथ मुंडे यांनी जानकरांना दिला असावा किंवा दिला होता हे पंकजा मुंडे यांच्या विधानावरुन दिसते. आणि म्हणूनच माझा बाप असता तर आरक्षणच काय पण सगळंच (येथे मंत्रिपद असे वाचावे) मिळालं असतं हे विधान. गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या सत्तेत असताना एन्रॉनला अरबी समुद्रात बुडवून दाखवलं होतं आणि दाऊदला मुसक्या बांधून फराफरा ओढतही आणलं होतं. त्यामुळे ते असते तर जानकरांचीच काय पण राजू शेट्टींची आणि रामदास आठवलेंचीदेखील इच्छापूर्ती होऊन गेली असती. पण ते झाले नाही. तरीही पंकजा मुंडे यांच्या विधानाची सखोल मीमांसा करायची झाली तर आता आरक्षण बदल कधीच होणार नाही असा श्लेष काढावा लागेल किंवा तो तसाच निघतो. हा श्लेष सांप्रतची देशातील स्थिती लक्षात घेता मग निराधारही ठरत नाही. मुंडे ज्या पक्षाचे नेते होते किंवा पंकजा ज्या पक्षाच्या मंत्री आहेत त्याच पक्षाचे मनोहरलाल खट्टर नावाचे नेते सध्या हरयाणाचे मुख्यमंत्री आहेत. जानकर काय आंदोलन करतील त्याच्यापेक्षा अधिक उग्र आणि हिंसक आंदोलन त्यांच्या राज्यातील जाट समाजाने छेडल्यानंतर खट्टर यांनी विधानसभेत एक ठराव मंजूर करुन जाटांना आरक्षण बहाल करण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयाने तो आता स्थगित करुन ठेवला असून स्थगनादेश देताना न्यायालयाने जे वक्तव्य केले आहे ते लक्षात घेता खट्टरांनी दिलेले आरक्षण रद्द होण्याची शक्यताच अधिक आहे. (ते ठाऊक असल्यानेच त्यांनी ठराव संमत केला असावा) जे खट्टर यांनी केले ते फडणवीस यांनी करावे असा पंकजा मुंडे यांचा एकूण नूर दिसतो. पण धनगरांना जो आरक्षण बदल अभिप्रेत आहे त्यात अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासींना राज्यघटनेनुसार देय असलेल्या आरक्षणाला धक्का लावावा लागणार आहे. तसे करणे म्हणजे एका मुळातल्याच पीडित वर्गाला आणखी पीडा देण्यासारखे आहे व ते मुंडेदेखील करु धजावले असते का याची शंका आहे. यात न्यायालय देईल तो फटका वेगळाच.