गौप्यस्फोटामागील अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:43 PM2018-06-20T12:43:59+5:302018-06-20T12:43:59+5:30

The meaning behind cattle explosion | गौप्यस्फोटामागील अर्थ

गौप्यस्फोटामागील अर्थ

Next

- रमाकांत पाटील
राजकारणातील डावपेच हे सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरचे असतात. अनेकवेळा कथनी आणि करणी सारखी असतेच याची शाश्वती नाही. हे सर्व यासाठी की नंदुरबार पालिकेत विकासकामांमध्ये २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप भाजपने पत्रकार परिषदेत केला आहे. नंदुरबार पालिका ही काँग्रेसच्या ताब्यात आहे. गेल्या पाच वर्षात शहरात पालिकेतर्फे मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबविण्यात आल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. रस्ते विकास प्रकल्प, भूमिगत गटार, वाढीव पाणीपुरवठा, घनकचरा प्रकल्प व्यवस्थापन अशी अनेक सुमारे २०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांचा त्यात समावेश आहे. अर्थातच गेल्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत हाच मुद्दा केंद्रस्थानी होता. सत्ताधारी काँग्रेसने विकासकामे केल्याचा दावा करीत त्या आधारावर मते मागितली तर भाजपने विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आले होते. त्यांनीही आपल्या भाषणात जाहीरपणे सत्ता आल्यास सर्वप्रथम नंदुरबार पालिकेतील भ्रष्टाचार उघड करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. अर्थात निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. मात्र निवडणुकीनंतर पालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होऊन कारवाई होईल का? हा प्रश्न मात्र भाजप समर्थकांमध्ये कायम होता. दरम्यानच्या काळात पालिकेचे सत्तास्थानी केंद्रित असलेल्या आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मुलाचे लग्न इंदूरला झाले. मुख्यमंत्री विशेष विमानाने खास विवाह सोहळ्याला आले होते. या उपस्थितीने नंदुरबारकरांच्या भुवया उंचावल्या. राजकारणापलिकडे मैत्री जपण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कृतीचे अर्थ मात्र वेगवेगळे लावले गेले. रघुवंशींविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन आता पाळले जाईल काय, असा स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न होता तर दुसरीकडे आमदार रघुवंशी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने मुख्यमंत्री लग्नाला आल्याची चर्चा सुरू झाली. या सर्व चर्चांना विराम मिळाला असताना सोमवारी भाजपचे गटनेते रवींद्र चौधरी व जिल्हाध्यक्षा खासदार डॉ.हीना गावीत यांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेत २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप केला. या अपहाराच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आल्याचेही सांगितले. त्याबाबतचे पत्रही देण्यात आले. हे पत्र एप्रिल महिन्यातील असून त्याचा गौप्यस्फोट दोन महिन्यानंतर का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. येत्या चार महिन्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा धुराळा उडणार असल्याने ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने पालिकेला अर्थात आमदार रघुवंशींना लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली. अर्थात चर्चा काहीही असल्या तरी अपहाराच्या आरोपांच्या चौकशीत काय निष्पन्न होते याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The meaning behind cattle explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.