श्रमदानाचे सार्थक
By admin | Published: June 26, 2016 04:01 AM2016-06-26T04:01:34+5:302016-06-26T04:01:34+5:30
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा काळ हा ५ जूनला संपला. भाग घेणाऱ्या ११६ गावांमध्ये मोजमापाचे काम सुरू झाले. काही गावांत तर इतक्या प्रचंड प्रमाणावर काम झाले होते की, झालेल्या
- सत्यजीत भटकळ
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा काळ हा ५ जूनला संपला. भाग घेणाऱ्या ११६ गावांमध्ये मोजमापाचे काम सुरू झाले. काही गावांत तर इतक्या प्रचंड प्रमाणावर काम झाले होते की, झालेल्या कामांचे मोजमाप करण्यास रात्रंदिवस काम करावे लागले. त्यांपैकी एकाने आम्हाला सांगितले, दहा दिवस अधिक श्रमदान करायला सांगितले असते तरी आम्ही ते आनंदाने केले असते; पण, या मोजमाप प्रक्रियेने आम्हाला पार थकवून काढले.
गावांनी दिलेले मोजमाप मग वॉटर कप टीमने प्रमाणित केले व त्या आधारावर आघाडीच्या ९ गावांची यादी तयार करण्यात आली. परीक्षक मंडळाने मग या ९ गावांचा दौरा सुरू केला. त्यांचा निर्णय पुढील दिवसांत होईल, परंतु सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे ते पाण्यानी भरून गेलेल्या सर्व उपचारांवर. ज्यामुळे अनेक वर्षे कोरड्या पडलेल्या विहिरी पाण्याने भरत आहेत. हे पाणी खऱ्या अर्थाने ग्रामस्थांनी आपल्या श्रमदानातून कमावले आहे. हे दृश्य पाहून फक्त विहीर नव्हे, तर डोळेही पाण्याने भरून येतात. ‘सत्यमेव जयते - वॉटर कप’चा हा पहिला टप्पा प्रायोगिक तत्त्वावर फक्त तीन जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तालुक्यात घेण्यात आला. तो प्रयोग या कारणाने म्हणावा लागेल, कारण सामाजिक प्रश्नाला लोकचळवळीच्या माध्यमातून सोडवण्याचा तो एक प्रयत्न होता. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ‘पानी फाउंडेशन’ने, म्हणजेच वॉटर कप स्पर्धेच्या आयोजकांनी कोणत्याही गावाला फंड किंवा अनुदान दिले नाही. शासनाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मदत दिली; तसेच अनेक खाजगी संस्थांनी व व्यक्तींनी कुठे पैशांची तर कुठे मशीन उपलब्ध करून मदत दिली. सरकार आणि खासगी संस्थांनी ही मदत आपापल्या नियमानुसार त्यांनी स्वत: निवडलेल्या गावांना पोहोचवली. म्हणजे फंडिंगची कोणतीही हमी नसतानाही गावांनी प्रचंड प्रमाणात स्पर्धेत भाग घेतला, श्रमदान केले यामुळे अनेक गावे आता पाणीदार झाली आहेत. या प्रयत्नातून काही गोष्टी सिद्ध झाल्या आहेत, ज्यातून आपण काही निष्कर्ष काढू शकतो.
पहिला निष्कर्ष- ग्रामीण जनता आपल्या दोन हाताने काम करून आपले जीवन घडवायला तयार आहे. एकदा का त्यांचा निश्चय पक्का झाला की मग ते काम पूर्णत्वाकडे नेतीलच.
दुसरा निष्कर्ष- लोकांना कामासाठी तयार करण्यासाठी आपण पूर्ण भर हा फक्त कामावर देणे खूप गरजेचे आहे. ‘तोंड बंद काम चालू’ हे ब्रीदवाक्य महत्त्वाचे आहे.
तिसरा निष्कर्ष- पाण्याचे काम असो किंवा इत्तर कोणतेही रचनात्मक काम असो त्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळाल्यास, लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. लोकांतच काम करण्यासाठी एक नेतृत्व तयार होते.
चौथा निष्कर्ष- आपल्या देशात दातृत्व जिवंत आहे. स्पर्धेच्या काळात अनेक स्वयंसेवी संस्थांनी व व्यक्तींनी सढळ हस्ते स्पर्धक गावांना थेट मदत पोहोचवली. कुठे एस.टी. कर्मचाऱ्यांनी जाऊन गावात दिवसभर श्रमदान केले तर कुठे ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या पेन्शनचे थोडेथोडके पैसेही दिले.
थोडक्यात काय तर हे सर्व पाहून ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ टीमला खूप बळ मिळाले आहे. पावसानंतर पुढच्या टप्प्यात हीच स्पर्धा ३० तालुक्यांत घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. लोकांचा सहभाग असाच राहिला तर काही वर्षांतच आपण दुष्काळमुक्त आणि समृद्ध महाराष्ट्र पाहू.
(लेखक प्रसिद्ध दिग्दर्शक असून, पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)