देशातील बेरोजगारीवर उपाय स्वयंरोजगाराचा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:23 AM2019-05-08T06:23:51+5:302019-05-08T06:26:24+5:30
काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू हे एक दबंग नेते आहेत. निवडणुकीच्या एका प्रचारसभेत भाषण करताना त्यांनी श्रोत्यांना इशारा दिला की, त्यांच्या एका चुकीच्या मतदानामुळे त्यांच्या मुलांवर चायवाला, पकोडेवाला किंवा चौकीदार बनण्याची वेळ येऊ शकते, तेव्हा पुढे पश्चात्तापाची पाळी येण्याऐवजी आताच खबरदारी घ्या!
- पवन के. वर्मा
राजकीय विश्लेषक
काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू हे एक दबंग नेते आहेत. निवडणुकीच्या एका प्रचारसभेत भाषण करताना त्यांनी श्रोत्यांना इशारा दिला की, त्यांच्या एका चुकीच्या मतदानामुळे त्यांच्या मुलांवर चायवाला, पकोडेवाला किंवा चौकीदार बनण्याची वेळ येऊ शकते, तेव्हा पुढे पश्चात्तापाची पाळी येण्याऐवजी आताच खबरदारी घ्या! वरकरणी सिद्धूचे हे विधान अहंमन्य आणि निम्न दर्जाच्या पदांविषयी तुच्छता भाव दर्शविणारे होते. कोणताही व्यवसाय मग तो कितीही कनिष्ठ दर्जाचा असेना का, त्याचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे. व्यक्तीच्या उदरनिर्वाहाच्या साधनांचा कोणत्याही स्थितीत अवमान केला जाता कामा नये. मनुष्य कोणतेही काम करीत असो, तो जर ते प्रामाणिकपणे करीत असेल तर त्याचे मोल वेगळेच असते. त्या कामाविषयी तुच्छता बाळगणे योग्य नाही.
पण नवज्योतसिंग सिद्धू यांच्या शेरेबाजीमुळे काही सामाजिक दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न समाजासमोर आरसा धरणारे आहेत. सुरुवातीला राजेशाही आणि त्यानंतर इंग्रजांच्या सत्तेमुळे आपल्या समाजात गुलामी प्रवृत्ती बोकाळली आहे. त्यामुळे आपण सामाजिक विषमता मान्य करतो. वर्षानुवर्षे आपण कर्मानुसार जातीव्यवस्थेची जोपासना केली आहे. त्यामुळे अपघाताने एखाद्या कुळात किंवा जातीत जन्म झाल्याचे चांगले वा वाईट परिणाम आपल्या समाजाला भोगावे लागतात. ही समाजव्यवस्था कायदेशीर असून तिला धर्माची मान्यता आहे, असा समज आपण करून घेतला होता. या रचनेत काही व्यवसाय किंवा उद्योग हे विशिष्ट जातीची मिरासदारी बनले होते आणि ते व्यवसाय करणाऱ्यांना समाजाने वाळीत टाकले होते.
आज आपण जातव्यवस्था अधिकृतपणे मोडून टाकली आहे आणि लोकशाहीने दिलेल्या अधिकारांमुळे जातीजातीतील बंधने सैल झाली आहेत. पण सामाजिक विषमतेची मानसिकता लोकांच्या डोक्यात घट्ट रुजल्याचे आजही पाहावयास मिळते. या उच्च-नीच भावनेचे स्वरूप जरी बदलले असले तरी श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना मनात अजूनही कायम वास्तव्य करून आहे. या भावनेचा स्वीकार केल्यामुळे लोकशाही आणि समानता यांच्या अर्थांनाही आपण विषमतेचा रंग दिला आहे!
समाजाचे स्वरूप विषमतेवर भर देणारे आहे, हे आपल्याला स्टेटससंबंधीच्या खुळ्या कल्पनांमधून पाहावयास मिळते. या श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या भावनेमुळे माणसाचे मोल हे त्यांच्या दर्जावरून ठरविले जाते आणि इतरांनी तो दर्जा मान्य करावा ही भावना त्या व्यक्तीच्या मनात बसवते. त्यामुळे आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्यांना आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवून देण्याची स्पर्धा निर्माण होते, त्याला मग अंत राहत नाही. पूर्वीच्या काळी जातीवरून माणसाचा दर्जा ठरविला जात होता. तो कर्मठपणा हळूहळू कमी झाला आहे. पण श्रेष्ठ-कनिष्ठतेची भावना समाजमनात अजूनही कायम असल्याचे दिसून येते. लोकांना नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे समाजात कुणी कोणत्या टप्प्यावर उभे राहावे, हेही ठरविले जाऊ लागले आहे. त्यामुळे व्यक्तीचे स्टेटस अधिक महत्त्वाचे ठरू लागले!
सिद्धूने आपल्या भाषणात जी शेरेबाजी केली ती यासंदर्भात बघायला हवी. एखाद्याने चायवाला, पकोडेवाला किंवा चौकीदार होण्यात गैर काहीच नाही. पण आपण समाजात श्रेष्ठ-कनिष्ठ दर्जा असल्याची स्थिती मान्य करून त्याला महत्त्व दिल्याने काही व्यवसाय हे उच्च दर्जाचे तर काही कनिष्ठ दर्जाचे असा समज मनात रूढ झाला आहे. त्यामुळे आपण सिद्धूच्या वक्तव्याबद्दल नाराजी जरी व्यक्त केली तरी त्याने ज्या व्यवसायांचा उल्लेख केला आहे ते कमी दर्जाचे म्हणून अस्वीकार्य ठरले आहेत हे मान्य करायलाच हवे!
सामाजिक विषमतेचा बोजा आपली समाजव्यवस्था बाळगत असते. त्यामुळे स्वयंरोजगार सुरू करण्याची किंवा रस्त्यावरील विक्रेता होण्याची कुणाचीच तयारी नसते. सध्या कृषी क्षेत्रात बेरोजगारांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळे पैसे कमावण्याची कोणतीही संधी साधण्याची त्यांची तयारी असते. पण जे चांगल्या स्थानी असतात त्यांना अशी संधी मिळणे म्हणजे एक पायरी खाली उतरण्यासारखे वाटते. सिद्धूंच्या वक्तव्याकडे प्रामाणिकपणे आणि सूक्ष्मपणे बघितले तर त्यातून त्यांची उच्चभ्रू मानसिकता नक्कीच दिसून येते. पण व्यापक भूमिकेतून त्याकडे बघितले तर तो समाजाच्या भावनाच व्यक्त करतो आहे असे वाटते. विचारवंतांकडून सिद्धूंच्या वक्तव्याची निर्भर्त्सनाच केली जाईल.
रोजगारात वाढ झाली आहे हे सांगताना सरकारनेच या व्यवसायाचा उल्लेख केला होता व रोजगार वाढले आहेत, असे सांगितले होेते. त्याचे मूल्यांकन अर्थशास्त्रींनी करायला हवे. आपल्या एकूण लोकसंख्येतील ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ किंवा त्याहून कमी वयाच्या तरुणांची असणे ही आपली जमेची बाजू आहे. दरवर्षी शिकलेल्या तरुणांच्या फौजा रोजगाराच्या बाजारात उतरत असतात. उपलब्ध नोकऱ्यांपेक्षा बेरोजगार तरुणांची संख्या जास्त आहे. त्याला उत्तर म्हणून अनेकांनी स्वयंरोजगाराची कास धरायला हवी, म्हणजेच स्वत:चे उद्योग सुरू करायला हवेत. हाच योग्य मार्ग ठरेल. पण म्हणून ते चायवाला, पकोडेवाला किंवा चौकीदार होतील का, हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर प्रामाणिकपणे दिले गेले पाहिजे!