पदकाचा अवमान

By admin | Published: May 10, 2016 02:33 AM2016-05-10T02:33:12+5:302016-05-10T02:33:12+5:30

प्रतिष्ठा, पद आणि सन्मान लाभल्यानंतर तो स्वीकारताना जो तो आता आमची जबाबदारी वाढली असे भाषण झोडून मोकळा होतो.

Medal contempt | पदकाचा अवमान

पदकाचा अवमान

Next

प्रतिष्ठा, पद आणि सन्मान लाभल्यानंतर तो स्वीकारताना जो तो आता आमची जबाबदारी वाढली असे भाषण झोडून मोकळा होतो. त्यातील काही जण या शब्दांशी प्रामाणिक राहून वागण्या-जगण्यात जाणीवपूर्वक बदल करण्याचा प्रयत्न करतातही; पण काहींच्या लेखी केवळ पैसा हाच सर्वश्रेष्ठ असल्याने अन्य गोष्टींना ते दुय्यम मानतात. या गोष्टी त्यांच्या दृष्टीने दुय्यम असल्या तरी त्यांचा हव्यास त्यांना असतोच. त्यासाठी कोठे, कधी आणि कोणाकडे ‘फिल्डिंग’ लावावी यात ते माहीर असतात. गल्ली-बोळातील सन्मान, पुरस्कार ठीक आहेत; पण राष्ट्रपतींसारख्या देशाच्या प्रथम नागरिकाच्या हस्ते गौरविला गेलेला अधिकारीच लाच घेण्याच्या भानगडीत अडकत असेल तर यास काय म्हणावे? वाईचे पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे यांना ड्रग्ज तस्करी खटल्याप्रकरणी हस्तकाकरवी पाच लाखांची लाच स्वीकारल्यामुळे ताब्यात घेण्यात आले. याच अधिकाऱ्याला पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी चार वर्षांपूर्वी राष्ट्रपतिपदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. या लाचखोरीमुळे राष्ट्रपतींनी दिलेल्या पदकाचाच जणू अवमान झाला आहे. वास्तविक ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य ज्या पोलीस दलाचे आहे, त्यांनी जनतेचे मित्र बनून समाजातील वाईट प्रवृत्ती ठेचून काढायला हवी. परंतु अपवाद वगळता गुन्हेगारांचा तपास करता-करता पोलिसांमध्येच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला लागली आहे. फिर्याद द्यायला येणाऱ्यांवरच प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असल्याने सर्वसामान्य लोक अनेक घटना ठाऊक असतानाही ‘नको ही डोकेदुखी’ म्हणत पोलीस ठाण्याकडे पाठ फिरवू लागले आहेत. पूर्वी खाकी वर्दीविषयी समाजात धाक, दरारा आणि आदरयुक्त भीती होती. आता ती उरलेली नाही, यास पोलीस दलातील कुप्रवृत्तीच कारणीभूत असल्याच्या घटनांनीच हे अधोरेखित केले आहे. कोणत्याही प्रकरणात उघडपणे पैशांची मागणी होऊ लागली आहे. कुंपणानेच शेत कुरतडायला सुरुवात केली तर न्याय मागावा कोणाकडे, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

Web Title: Medal contempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.