मीडियाने धूसर केले निवडणुकीचे चित्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 04:59 AM2019-05-15T04:59:51+5:302019-05-15T05:00:19+5:30

मुख्य प्रवाहातील मीडियात प्रसिद्ध झालेल्या निवडणुकीच्या बातम्यांच्या आधारे जर कुणी निवडणुकीचा अंदाज वर्तवील तर या निवडणुकीत स्पर्धाच राहिलेली नाही असे तो म्हणेल.

 Media blurred election picture? | मीडियाने धूसर केले निवडणुकीचे चित्र?

मीडियाने धूसर केले निवडणुकीचे चित्र?

Next

- संतोष देसाई
(अर्थ- उद्योगाचे अभ्यासक)

मुख्य प्रवाहातील मीडियात प्रसिद्ध झालेल्या निवडणुकीच्या बातम्यांच्या आधारे जर कुणी निवडणुकीचा अंदाज वर्तवील तर या निवडणुकीत स्पर्धाच राहिलेली नाही असे तो म्हणेल. काही महिन्यांपूर्वी मात्र निवडणुकीचे चित्र धूसर दिसत होते. पण गेल्या काही आठवड्यात परिस्थितीत कमालीचा बदल घडून आला असून पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या देशातील टी.व्ही. स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरत्या ओवाळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या मुलाखती राष्ट्रीय वृत्तपत्रातून एकामागोमाग एक प्रकाशित झाल्या. वाराणसी येथे मोदींनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यालादेखील वृत्तपत्रांनी आणि टी.व्ही. चॅनेल्सनी वारेमाप प्रसिद्धी दिली. त्यातून मोदींची लाट निर्माण झाली आहे की काय असे वाटू लागले. मोदींच्या समर्थनार्थ छुपी लाट निर्माण झाली आहे असे चित्र निर्माण करण्यात आले.

याप्रकारे मीडियाने वास्तव दर्शन घडवून आणण्याऐवजी अतिशयोक्तीपूर्ण चित्र निर्माण करण्याची प्रथाच जणू सुरू केली. आजच्या मीडियाला तुकड्यातुकड्यांच्या राजकारणाच्या चित्राऐवजी एखाद्या करिष्मा असलेल्या नेत्याचे चित्र दाखवणे अधिक योग्य वाटत असते का? याविषयी एका बाजूने किंवा त्याविरोधात युक्तिवाद केला जाऊ शकतो. सध्याचे चित्र पाहता मोदींच्या समर्थनाची छुपी लाट अस्तित्वात असून ती त्यांना सहज सत्तारूढ करू शकते, असे म्हणता येईल किंवा वरकरणी हा जो गदारोळ सुरू आहे त्यामुळे खरे चित्र झाकले जात असून ते चित्र २३ मेनंतरच स्पष्ट होईल, असेही म्हणता येईल.

एकूण निवडणुकीचे भाकीत करणे तसेही सोपे नाही. दहा वर्षांपूर्वी मतदारांमध्ये दोन प्रवाह स्पष्ट दिसत होते. टी.व्ही. हा काही मर्यादित लोकांचाच आवाज होता. वृत्तपत्रे ही इतस्तत: विखुरलेल्या साक्षर लोकांपुरती मर्यादित होती तर बाकीचा भारत हा मीडियाच्या प्रवाहापासून दूर अंधारात चाचपडत होता. टी.व्ही.वरील चर्चांचा निवडणुकांवर फारसा परिणाम होत नाही असे राजकीय पक्षांना वाटत होते.
पण २०१४ च्या निवडणुकांनी मीडियाच्या सामर्थ्याविषयी वाटणाऱ्या दृष्टिकोनात बदल झाला. भाजपचा निवडणुकीचा प्रचार हा त्यावेळी मोदी केंद्रित होता आणि त्याने मीडियाचा उपयोग अत्यंत कौशल्याने केला. तोपर्यंत टी.व्ही.च्या स्वरूपातही बदल झाला होता.

टी.व्ही. व्यक्तिकेंद्रित, जीवनाचे अतिशयोक्त चित्रण करणारा झाला होता. त्या वेळी मोदींंना मीडियाकडून जी अमाप प्रसिद्धी मिळाली त्यामुळे एका प्रादेशिक नेत्याचे राष्ट्रीय नेत्यांत रूपांतर व्हायला वेळ लागला नाही. त्यांनी लोकांना भावनात्मक आवाहन करण्यास सुरुवात केली होती. याशिवाय सोशल मीडियानेही या वेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे भाजपच्या समर्थकांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम होऊ शकले. त्यानंतरच्या पाच वर्षांत मीडियात कमालीचा बदल घडून आला. अनेक नवीन खेळाडू या क्षेत्रात उतरले. सोशल मीडियासुद्धा अधिक शक्तिमान झाला. टिष्ट्वटरवरून जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या गोष्टी पाहावयास मिळू लागल्या. सोशल मीडियाचा वापर करण्यात भाजपचा वरचष्मा जरी दिसून येत असला तरी या क्षेत्राने विश्वसनीयता मात्र गमावल्याचे दिसून आले आहे!

महत्त्वाचा बदल झाला तो असंघटित मीडियाच्या प्रवेशामुळे. त्यामुळे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे झाले. बहुतांश न्यूज चॅनेल्स हे भाजपच्या बाजूचे झाले आहेत, हे जरी खरे असले तरी या क्षेत्रात नवे प्रभावी स्वर उमटू लागले आहेत. कॉमेडियन कुमार कामरा, ब्लागर्स ध्रृव राठी आणि आकाश बॅनर्जी, डेमोक्रसीची ऐसीतैसी यासारखी प्रहसने ही संगीत आणि विनोद घेऊन आल्याने ती मुख्य प्रवाहातील मीडियासाठी आव्हानात्मक ठरली आहेत. याशिवाय काही डिजिटल न्यूज चॅनेल्सही निर्माण झाली असून तीदेखील महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत. बातम्या सादर करण्यासाठी नवे तंत्र योजिले जात असून तेही प्रभावी ठरत आहेत. इंग्रजी न्यूज चॅनेल्सचे अँकर टी.व्ही.वरून लाखो दर्शकांना प्रभावित करीत असले तरी धृव राठींचा प्रभावदेखील दुर्लक्षिण्याजोगा नाही. या व्यासपीठांनी अन्य माध्यमांच्या क्षमतेवर निश्चित परिणाम केला आहे. तसेच स्वतंत्र भूमिका निर्माण करण्याचे काम केले आहे. पूर्वी तज्ज्ञांच्या मार्फत विचारांची जडणघडण केली जात होती. आता व्यक्तीकडून स्वत:ची मते बनविली जात असून अशा मतांची वेगळी शृंखला तयार होत आहे.

मुख्य प्रवाहातील मीडिया हा विशिष्ट विचारांनी प्रेरित असला तरी वास्तवाचे दर्शन घडविण्यात त्याला फारशी रुची राहिलेली नाही. उलट तो विशिष्ट अजेंडा दृष्टीसमोर ठेवून काम करताना दिसत आहे. मुख्य प्रवाहातील मीडियाद्वारे आपल्याला खरे काय चित्र राहील याचा अंदाज मिळू शकतो. पण हे चित्रदेखील त्यांच्याकडून हेतूपुरस्सर तयार केलेले असू शकते. परिणामी जमिनीवरील वास्तव जोखण्यास तो असफल ठरू शकतो. त्यामुळे आजतरी आपल्याला कोणताच अंदाज वर्तवता येणार नाही. त्यादृष्टीने आपण सर्वच म्हटले तर तज्ज्ञ आहोत आणि म्हटले तर अज्ञ आहोत, असाच निष्कर्ष काढता येईल!

Web Title:  Media blurred election picture?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.