वैद्यकीय उपचार : दवा, दुवा की बुवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:35 AM2018-03-15T00:35:26+5:302018-03-15T00:35:26+5:30

‘जब दवा काम नही करती तब दुवा काम आती है...’ असं म्हटलं जातं. पण ही दवा-दुवा सोडून डॉक्टरने गंभीर महिला रुग्णावर ‘उपचारां’साठी चक्क एका मांत्रिक बुवाला बोलावले.

Medical Treatment: Medicine, Link to Buva? | वैद्यकीय उपचार : दवा, दुवा की बुवा?

वैद्यकीय उपचार : दवा, दुवा की बुवा?

googlenewsNext

- विजय बाविस्कर
‘जब दवा काम नही करती तब दुवा काम आती है...’ असं म्हटलं जातं. पण ही दवा-दुवा सोडून डॉक्टरने गंभीर महिला रुग्णावर ‘उपचारां’साठी चक्क एका मांत्रिक बुवाला बोलावले. हा धक्कादायक प्रकार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात घडला. मात्र, अत्यवस्थ रुग्ण संध्या सोनवणे यांचा मृत्यू झाला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जादूटोणा-बुवाबाजीविरुद्ध आपलं आयुष्य वेचून अखेर ज्या पुण्यात बलिदानही दिलं, त्याच पुण्यात असं घडावं, हे अत्यंत दुर्दैवी आहे. डॉ. दाभोलकरांनी ज्याची मागणी लावून धरली होती, तो जादूटोणाविरोधी कायदा त्यांच्या हत्येनंतर अस्तित्वात आला. त्याच कायद्यान्वये संबंधित मांत्रिक आणि त्याच्याकरवी उपचार करवून घेणारा डॉ. सतीश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दीनानाथ रुग्णालयाने हा प्रकार परवानगीशिवाय चोरून झाल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हे काहीही असले तरी त्या महिलेचे प्राण मात्र परत येणार नाहीत, हे दुर्दैवी सत्य आहे.
वैद्यकशास्त्र प्रगत झाले आहे. त्यामुळे माणसाचे सरासरी आयुष्य वाढले आहे. हे जरी सत्य असले तरी या शास्त्रालाही काही मर्यादा आहेतच. अशा वेळी ईश्वरी शक्तीवर विश्वास असणारे त्याची प्रार्थना-उपासना करतात. हा ज्याच्या-त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यासाठीच मोठमोठ्या रुग्णालयांमध्येही देव-देवता अन् गुरुदेवांची मंदिरे, प्रार्थनास्थळे उभारली जातात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा धूसर आहे, हेही खरे आहे. मात्र, रुग्ण आणि त्याच्या नातलगांऐवजी एका डॉक्टरनेच आपले वैद्यकीय ज्ञान-कौशल्य बाजूला ठेवून मांत्रिकाला बोलावून त्याच्याकरवी हळद-कुंकू, बुक्का-फुले वाहत मंत्रोच्चार करवून ‘उपचार’ करणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. वैद्यकीय क्षेत्रही विज्ञानाचे अंग आहे. हे क्षेत्रही आपल्या चुका, मर्यादा मान्य करून त्यावर मात करण्यासाठी अथक प्रयत्न करत असते. त्यामुळे नवनवीन संशोधन केले जाते. रामबाण ठरणारी औषधे, अत्याधुनिक अचूक शल्यचिकित्सा तंत्रे विकसित होत असतात. मात्र, मांत्रिक, तांत्रिक, तथाकथित ईश्वरी अंश असलेले बाबा-महाराज अशा दुर्घटना घडल्यास त्याचे अपश्रेय सदैव टाळतच असतात. संबंधितांचे पाप-पुण्य, ईश्वरी इच्छा असल्या सबबी सांगत ते आपली जबाबदारी झटकत असतात. तरीही अशा तांत्रिक-मांत्रिकांकडे जाणाऱ्या अंध भक्तांची संख्या लक्षणीय आहे. हा प्रभाव फक्त ग्रामीण, आदिवासी भागापुरता मर्यादित नाही तर मुंबई-पुण्यासारख्या विकसित शहरांतही हे लोण पसरलेले आहे. बंगाली बाबा, काळी जादू, गुप्तधनाच्या शोधासाठी नरबळी, अल्पवयीनांवर अत्याचार हे सर्व प्रकार पुरोगामी म्हणवल्या जाणाºया आपल्या राज्यात अद्यापही सुरू आहेत.
दुर्दैवाने अशिक्षितांसह काही फक्त सुशिक्षित नव्हे तर उच्चशिक्षितही अशा अंधश्रद्धांना खतपाणी घालतात, हे या घटनेवरून दिसून येते. मृत रुग्णाच्या नातलगांनी केलेल्या आरोपानुसार डॉ. चव्हाण महाशय पंचांग पाहून मुहूर्तावर शस्त्रक्रिया करत असतात. या मुहूर्ताच्या नादात त्यांनी संध्या यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास विलंब केल्याने अतिरक्तस्राव झाल्याने त्यांना ‘दीनानाथ’मध्ये हलवावे लागले, असाही आरोप आहे. या प्रकाराला श्रद्धा कसे म्हणावे? ही नक्कीच अंधश्रद्धा आहे. लौकिक जगापेक्षा पारलौकिक जगावर विश्वास असणारा डॉक्टर रुग्णांवर अशा पद्धतीने उपचार करतो, तेव्हा हा प्रकार धक्कादायक असतो. अशा प्रवृत्तींविरुद्ध गंभीर कारवाई करावीच लागेल.

Web Title: Medical Treatment: Medicine, Link to Buva?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.