मेघदूतम् : कालिदासाच्या काव्यवाङ्मयाचे कीर्तिशिखर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 02:19 AM2020-06-22T02:19:24+5:302020-06-22T02:27:48+5:30
‘मेघदूता’तील वाङ्मयीन प्रत्ययासाठी केवळ नव्हे, तर मेघदूत हा सर्व इंद्रियांना, अंत:करणाला आवाहन करणा-या सौंदर्याचा चिरतरुण, अखंड वाहता झरा आहे म्हणून.
-जगदीश इंदलकर
आषाढातील पहिला दिवस हा कविकुलगुरू कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदासाने आपले नाव, गाव आपल्या साहित्यात लिहून ठेवले नाही. एकाहून एक सरस अशी अजरामर काव्ये, नाटके व लघुकाव्ये लिहिणाऱ्या कालिदासाने ‘मेघदूत’सारखे प्रणयकाव्य लिहिले. सौंदर्य केवळ बाहेरच्या जगात नसते. आपल्या अंतरंगात त्याचा खजिना असतो. तुम्हाला हे सौंदर्य पाहण्याची दृष्टी मिळवायची आहे? तुम्हाला कलावंत व्हायचे आहे ना? मग ‘मेघदूत’ जगायला शिका. रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनमध्ये आपल्या शिष्यांना दिलेला हा गुरूपदेश आहे आणि तोही ‘मेघदूता’तील वाङ्मयीन प्रत्ययासाठी केवळ नव्हे, तर मेघदूत हा सर्व इंद्रियांना, अंत:करणाला आवाहन करणा-या सौंदर्याचा चिरतरुण, अखंड वाहता झरा आहे म्हणून.
कोणत्याही निसर्गदृश्यात, भावस्थितीत, दु:खातही संस्कृतिसंपन्न आणि आनंदोत्फुल्ल मनाने सौंदर्य कसे आस्वादावे, हे अतिशय प्रत्यायक रीतीने शिकवणारे म्हणून मेघदूत हे साºया भारतीय-कदाचित जगभरच्याही -वाङ्मयात केवळ अजोड ठरेल. काव्य हे जीवनोपयोगी असते की नाही, हा अभिनिवेशी वाद सोडून दिला, तरी खरे काव्य हे अक्षय आनंदाची बरसात कशी करू शकते, याचे मेघदूतासारखे उदाहरण विरळा आणि म्हणूनच आजचेही चोखंदळ समीक्षक काव्यविचारात पदोपदी ‘मेघदूत’चा हवाला देत असतात. मल्लिनाथासारखा प्रकांडपंडित रसिक टीकाकारही ‘माघे मेघे गतं वय:।’ असे म्हणतो.
रामायण-महाभारत ही आर्ष महाकाव्ये म्हणजे तद्नंतरच्या काळात प्रसवलेल्या संस्कृत महाकाव्यांची गंगोत्री! या महाकाव्यातही पंचमहाकाव्ये स्वगुणांनी प्रकाशताना आढळतात. साहित्यशास्रकारांनी या महाकाव्यांची लक्षणे वर्णिलेली आहेत. त्यानंतर काळ हा प्रामुख्याने खंडकाव्यांचा/लघुकाव्याचा येतो. संस्कृत साहित्यात कविकुलगुरूपदी स्थानापन्न झालेल्या कालिदासाचे ‘मेघदूत’ हे प्रणयकाव्य म्हणून सर्वविदित आहे. या काव्याने प्रणयकाव्याचा नवीन संप्रदाय सुरू केला, तो म्हणजे दूतकाव्यांचा. विरहामुळे व्याकूळ झालेल्या पत्नीला संदेश पाठविण्याची कल्पना तशी जुनीच! रामाने हनुमंतास सीतेकडे लंकेमध्ये संदेश पाठविण्यासाठी धाडले किंवा नलदमयंती कथेत हंस संदेशवाहकाचे काम करतो. तथापि, कालिदासाने संदेशाच्या कल्पनेला जी नैसर्गिकता आणली आहे, त्याला कारण केवळ त्याची अद्वितीय, सर्वसामान्यांना भुरळ घालणारी सहज सुंदर अशी प्रतिभाशक्तीच!
‘मेघदूत’ हे एक गीतिकाव्य किंवा विरहगीत आहे. ते गेय आहे. भावमयता ही गीतिकाव्याची खासियत आहे. वाचकाच्या हृदयाला रसप्लवित करणे, हे गीतिकाव्याचे विशेष आहे. लघुकाव्याला प्रमाणबद्ध होईल असेच या काव्याचे कथानक आहे. कोण्या एका यक्षास कुबेराच्या शापाने एका वर्षापर्यंत स्वत:च्या पत्नीपासून दूर रामगिरी पर्वतावर राहावे लागले. शापाचा अवधी एकच वर्ष टिकणारा होता. तरीही पत्नीच्या विरहाने तळमळणाºया हळव्या नायकाने पावसाळ्याच्या आगमनाची ग्वाही देणाºया मेघाकरवी आपल्या पत्नीस संदेश पाठवला. प्रणयी जोडप्याचे एकमेकांबद्दलचे अनिवार आकर्षण व त्यांच्या विरहवेदना या संदेशात दाटून आल्या आहेत. यक्षाने मेघाला प्रथम रामगिरीपासून अलकेपर्यंत जाण्याचा मार्ग सांगितला व नंतर अलकानगरीचे व आपल्या घराचे वर्णन करून पत्नीला द्यावयाच्या आपल्या खुशालीचा संदेश पाठवला.
या भावकाव्यात कालिदासाने वस्तुनिष्ठ वर्णनावर शृंगाराचा, प्रणयाचा साज चढविला आहे. यातील दूत कल्पनेच्या लोकप्रियतेचा उपयोग जैन आणि वैष्णव संप्रदायाच्या कवींनी आपापल्या सांप्रदायिक धर्मप्रसारासाठी करून घेतलेला दिसतो. जैनकाव्यांत शान्तरस ओतप्रोत भरलेला आहे. वैष्णव-कवीची दूतकाव्ये राम-सीता व कृष्णराधा यांच्या प्रेमावर आधारलेली आहेत. या इतर कवींना पुरेसा प्रवास, चौकसबुद्धी, डोळस निरीक्षण इ. ची शिदोरी न लाभल्याने ती नीरसतेकडे झुकतात.
मेघदूतात कालिदासाचे जे व्यक्तिमत्त्व दिसते, ते अत्यंत लोभसवाणे व आकर्षक आहे. तो सर्व कलांत निपुण आहे. शास्त्रांत पारंगत आहे; पण त्याचे काव्यकुसुम पांडित्याच्या ओझ्याखाली चुरगळलेले नाही. त्याच्या प्रत्येक उद्गारात एक सुंदर सहजता, नेमकेपणा आणि संपन्न अभिरुची आहे. मेघदूतासारखी लोकोत्तर, एकमेवाद्वितीय कलाकृती सहजासहजी एका झटक्यात अवतरली असेल हे शक्यच नाही. तिच्यामागे विलक्षण उत्कट चिंतन, दर्शन व उदंड तपश्चर्या असली पाहिजे. पण कोणत्याही प्रयत्नांचा, श्रमांचा पुसटसाही ओरखडा या कृतीवर नाही.
( संस्कृत अभ्यासक)