'तेव्हा' डोवाल यांनी आखली होती दाऊदला ठार करण्याची योजना; पण मुंबई पोलिसांमुळे प्लान फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 05:51 AM2021-06-03T05:51:18+5:302021-06-03T21:02:45+5:30

अँटीगुवा बेटावर संध्याकाळी फिरायला गेलेल्या मेहुल चोक्सीला एका सुंदर तरुणीने गाठायचे, हे डोवाल यांनी दिल्लीत बसून ठरवले होते!

Mehul Choksi trapped by nsa ajit doval | 'तेव्हा' डोवाल यांनी आखली होती दाऊदला ठार करण्याची योजना; पण मुंबई पोलिसांमुळे प्लान फसला

'तेव्हा' डोवाल यांनी आखली होती दाऊदला ठार करण्याची योजना; पण मुंबई पोलिसांमुळे प्लान फसला

Next

- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

भारताचे ७६ वर्षीय हेर शिरोमणी अजित डोवाल यांच्यात खरोखरच दम आहे हे मेहुल चोक्सी कथानकाने देशाला पुन्हा एकदा दाखवून दिले. गुप्तचर विभाग, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (रॉ) स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप या तिन्ही संस्थांनी एकत्र येत डोवाल यांच्या मार्गदर्शनाखाली चोक्सी प्रकरणात काम केले. 

बँकांचे हजारो कोटी गिळंकृत करून नीरव मोदी आणि चोक्सी हे दोघे फरार झाले तेंव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शोधून आणण्याचा ध्यासच घेतला आहे. मोदी यांचा फोटो त्या दोघांबरोबर वृत्तपत्रात पहिल्या पानावर झळकला आणि जणू पंतप्रधानच त्यांचे आश्रयदाते आहेत  असे चित्र निर्माण झाले. तेव्हापासून मोदी अस्वस्थ झाले होते. मग या फरार जोडीला पकडून आणण्याचे काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर सोपविण्यात आले.



नीरव मोदी लंडनमध्ये गडप झाला तर चोक्सी अँटीगुवा या छोट्याशा बेटाचा नागरिक होऊन तेथे राहत होता. या पकड मोहिमेच्या माहीतगारांकडून  समजते, की डोवाल यांनी तीन ब्रिटिश नागरिकांना नीरव मोदी याचा शोध घेण्याच्या कामाला लावले होते. त्यांनी त्याला शोधून फोटो काढले आणि भांडे फुटले. भारतीय हेरांनी इंग्लंडमध्ये थेट कारवाई केली नाही. नीरवला पकडल्यावर आता प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. चोक्सी प्रकरणात त्याचे अँटीगुवाचे नागरिकत्व आड आले. मग डोवाल यांनी आपल्या दिल्लीतील कार्यालयात बसून योजना आखली. संध्याकाळचा फेरफटका करण्यास गेलेल्या चोक्सीला एका सुंदर तरुणीने गाठले. त्याला नादी लावून तिच्या सदनिकेपर्यंत नेण्यात आले. तेथून एका मोटारीत टाकून महाशयांना डॉमिनिकात नेण्यात आले. अजित डोवाल यांच्या गुप्त डायरीत शोभावी अशी ही रहस्यकथा आहे... जी कदाचित कधीच बाहेर येणार नाही.



डोवाल यांची योजना मुंबई पोलिसांनी उधळली तेव्हा... 
गुप्त मोहिमा पार पाडण्यात डोवाल यांचा हातखंडा आहे. ते शांतपणे काम करतात. मिझो नॅशनल फ्रंटच्या बंडखोरीच्या काळात लालडेंगा यांच्या ७ पैकी ६ सेनापतींना डोवाल यांनी कधी आपल्याकडे वळवले हे केवळ २-४ लोकांना ठाऊक होते. ब्रह्मदेशच्या आराकान प्रांतात आणि चीनच्या प्रदेशात ते भूमिगतही राहिले. 

सिक्कीमचे भारतात विलीनीकरण झाले त्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. रुमानियाचे राजदूत लीवियू यांची सुटकाही त्यांनी केली. १९९९ साली दहशतवाद्यांनी इंडियन एअर लाइन्सचे विमान आय सी - ८१४ कंदाहारला पळवले तेंव्हा ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’च्या कितीतरी आधी अमृतसरला सुवर्णमंदिरात जाऊन डोवाल यांनी त्यांच्याशी बोलणी केली होती. त्यांच्या या कामगिरीमुळेच मनमोहन सिंग यांनी त्यांना २००४ साली आयबीचे संचालक केले. डोवाल यांच्या निवृत्तीनंतरही संयुक्त पुरोगामी आघाडीने  दाऊद इब्राहिम मोहिमेत त्यांची सेवा घेतली. दाऊदपासून फुटून निघालेल्या छोटा राजन याला डोवाल यांनी पटवले.  २००० साली बँकॉकमध्ये केलेल्या हल्ल्याचा बदला राजनला घ्यायचा होता. 



यूपीए आणि मोदींच्या काळात गृह सचिव असलेले आर. के. सिंग सांगतात, छोटा राजनच्या लोकांना भारतात गुप्त ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले. दाऊदला ठार करण्याची ती योजना होती. असे म्हणतात, की राजनचे साथीदार विकी मल्होत्रा आणि फरीद तानाशा यांना एका मोठ्या हॉटेलात भेटून डोवाल दुबईला जाण्यासाठीची बनावट कागदपत्रे देत असतानाच मुंबई पोलीस तेथे प्रकटले आणि त्यांनी विकी, फरीद यांना अटक केली. भारताच्या या मोठ्या गुप्त हेराची ही पहिली फसलेली मोहीम. डोवाल यांनी मुंबई पोलिसांना गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी ऐकले नाही. भारतीय सुरक्षा यंत्रणेतल्या आपापसांतील धुसफुशीतून हे बाहेर आले, अशी चर्चा आहे.  ही मोहीम फसल्यावरच नवी पद्धत अंमलात आली. सर्व गुप्तचर यंत्रणा एनएसएच्या छत्राखाली आल्या.

बदलाचे वारे वाहत आहेत
सगळे काही ठीक चाललेले असते तेव्हा लोक तुमच्या अवतीभवती गोंडा घोळतातच. पण दिवस फिरले, कठीण काळ आला की तेच लोक सोडून जातात... विल्यम ओनिबोर यांच्या गीताचा हा भावार्थ खराच आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर केंद्रातील सत्ताधीशांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि राज्यातील न्यायसंस्था जो पवित्रा घेऊ लागल्या आहेत तो पाहून केंद्र सरकार हबकले आहे. मागच्या आठवड्यात सीबीआयच्या प्रमुखपदी व्हावयाच्या नेमणुकीबाबत निवड समितीच्या बैठकीत सरन्यायाधीश रामण्णा यांनी सरकार प्रस्तावित नावे उडवून लावली. 
सरकारच्या पोटात त्यामुळे गोळाच आला. आंध्राचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी केलेल्या व्यक्तिगत आरोपांमुळे रामण्णा अतिशय खोलवर दुखावले गेले आहेत. 

भ्रष्टाचाराचे विविध आरोप असल्याने सीबीआय, ईडी, आयकर अशा खात्यांच्या मर्जीवर अस्तित्व अवलंबून असलेल्या रेड्डी यांनी असे आरोप का केले हे गुलदस्त्यातच आहे. पण मावळते सरन्यायाधीश बोबडे यांनी नियुक्त केलेली समिती रामण्णा यांच्या पाठीशी ठाम राहिली. ते स्वत:च स्वत:चे मालक असल्याने म्हणतात ना, धन्याचा कोण धनी!

Web Title: Mehul Choksi trapped by nsa ajit doval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.