भगवंताची बासरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 04:04 AM2019-09-28T04:04:27+5:302019-09-28T05:42:24+5:30

खरंच वाटत नाही की ‘भगवंताची बासरी’ नव्वद वर्षांची झाली. सगळ्या गोष्टी काल-परवाच्याच तर वाटतायत!

melody queen Lata Mangeshkar turns 90 | भगवंताची बासरी

भगवंताची बासरी

Next

- उदय कुलकर्णी

प्रिय लतादीदी,
खरंच वाटत नाही की ‘भगवंताची बासरी’ नव्वद वर्षांची झाली. सगळ्या गोष्टी काल-परवाच्याच तर वाटतायत! तुम्हाला आठवतंय का ‘भगवंताची बासरी’ या शब्दात तुमचा मानपत्र देताना कुणी गौरव केला होता?

तो दिवस होता २१ नोव्हेंबर १९७८. शिवाजी विद्यापीठाचा सारा परिसर मंगेशकर कुटुंबीयांच्या वावरानं झगमगून निघाला होता. शिवाजी विद्यापीठानं तुम्हाला ‘डी.लिट्.’ प्रदान करण्याचा समारंभ झोकात करायचा असं ठरवलं होतं. पदवीदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बॅ. अप्पासाहेब पंत उपस्थित होते. कुलगुरू डॉ. भा. शं. भणगे यांनी मानपत्राचं वाचन केलं. अतिशय काव्यमय भाषेत हे मानपत्र होतं. मानपत्रातला एक-एक शब्द ऐकताना तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे रसिक सुखावत होते. कुलगुंरूनी मानपत्रात तुमचं वर्णन ‘भगवंताची बासरी’ या शब्दात केलं होतं. तुम्हाला ‘डी.लिट्.’ अर्पण केली जात असताना छायाचित्रकारांची धमाल धावपळ सुरू होती. खरं तर तुम्हाला स्वत:ला फोटोग्राफीची अतिशय आवड. जयप्रभा स्टुडिओत आणि इतरही काही ठिकाणी मी तुम्हाला आवडीनं कॅमेरा हाताळताना पाहिलं होतं, पण तुम्हाला ‘डी.लिट्.’ प्रदान होत असताना छायाचित्रकारांच्या गर्दीत केसात गजरा माळलेली एक वेगळी छायाचित्रकार धावपळ करताना दिसत होती. हो, त्या दिवशी आशाताई तुमच्या सन्मानाचा क्षण कॅमेऱ्यात साठवण्यासाठी मनापासून धडपडत होत्या.



बॅ. अप्पासाहेब पंतांनी तुमच्या सुरांचा गौरव करताना म्हटलं होतं, ‘लताबाईंचा सूर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्नेहाची भाषा होय!’ अप्पासाहेबांच्या या उद्गारांची आठवण मला पुन्हा कधी झाली सांगू? बाबा आमटे ‘भारत जोडो अभियान’ सुरू करण्याची पूर्वतयारी करत होते. कोल्हापुरात आल्यानंतर बाबा आमटेंना वाटलं भारत जोडो अभियानात लतादीदींनी सामील व्हायला हवं. तुम्हाला याबाबत अधिकारानं भालजी पेंढारकरच सांगू शकतील म्हणून बाबा आमटेंनी नाळे कॉलनीतील भालजींचा बंगला गाठला. योगायोगानं तुम्ही कोल्हापुरातच होता. आमटेंची इच्छा समजल्यावर भालजींनी तुम्हाला फोन करून बोलावून घेतलं. बाबा आमटेंनी या वेळी तुम्हाला गळ घालतानाच उत्स्फूर्तपणानं तुमच्यावर एक कविता करून तुम्हाला ऐकवली. या कवितेत बाबांनी तुम्हाला ‘राष्ट्राचा कान’ असं संबोधलं होतं. तुमची ही भेट झाल्यानंतर बाबा आमटेंनी मला फोन करून हा सगळा तपशील सांगितला होता आणि कविताही ऐकवली होती. बॅ. पंतांनी जे म्हटलं तेच आमटेंनी वेगळ्या शब्दांत सांगायचा प्रयत्न केला होता.



शिवाजी विद्यापीठानं केलेला सन्मान हा काही कोल्हापुरात जाहीरपणानं झालेला तुमचा पहिला सन्मान नव्हता. तुमच्या पार्श्वगायनाचा रौप्यमहोत्सव याच कलानगरीनं साजरा केला. वि. स. खांडेकर यांचा सहवास तुमच्यासाठी नवा नव्हता. मा. विनायकांच्या कंपनीत तुम्ही आपल्या रुपेरी कारकिर्दीची सुरुवात केली तेव्हा मा. विनायकांनी खांडेकरांना चित्रपटांसाठी लेखन करायला प्रवृत्त केलं होतं. एका अर्थी खांडेकर मा. विनायकांच्या हंस पिक्चर्स आणि प्रफुल्ल पिक्चर्स या कंपन्यांच्या परिवाराचा भाग होते. आणखी एक गंमत आठवते तुम्हाला? १९४१ चा तो काळ. नूरजहाँनी गायिलेली ‘खजांची’ या पंजाबी चित्रपटाची गाणी गाजत होती. या गाण्यांची स्पर्धा त्या वेळच्या राजाराम टॉकिजमध्ये आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत तुम्ही भाग घेतला होता आणि पंचवीस रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस तुम्हाला मिळालं होतं.



मला माहिती आहे, आजही तुम्ही नकला चांगल्या करू शकता. निव्वळ नकलाच का, सुरुवातीच्या काळात तुम्ही रंगभूमीवरसुद्धा अभिनय केला होता. रंगभूमीवर तुम्ही आणि बालगंधर्व यांना एकत्र पाहणारे भाग्यवानच म्हणायला हवेत. १९४३ साल असेल ना ते? त्या वर्षी सांगलीमध्ये साहित्य आणि नाट्यसंमेलन एकाच वेळी घेण्यात आलं होतं. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद श्री. म. माटे यांच्याकडे होतं, तर नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद मामा वरेरकर यांनी भूषवलं होतं. यानिमित्तानं सांगलीत ‘संगीतशारदा’चा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. नाटकात शारदेची प्रमुख भूमिका मा. नरेश यांनी केली होती आणि तुम्ही शारदेच्या मैत्रिणीची म्हणजे वल्लरीची भूमिका केली होती. इतर कलाकारांमध्ये बालगंधर्व, चिंंतामणराव कोल्हटकर, चिंतोबा गुरव अशा दिग्गजांचा समावेश होता. मा. दीनानाथांच्या निधनानंतर घरची सगळी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडली आणि मा. विनायकांच्या बोलावण्यावरून तुम्ही कोल्हापुरात आला. प्रफुल्ल पिक्चर्सच्या ‘चिमुकला संसार’, ‘माझे बाळ’, ‘गजाभाऊ’ अशा चित्रपटांमध्ये तुम्ही अभिनय केला. तुमची पार्श्वगायनाची सुरुवातही कोल्हापूरचे संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली झाली. तुमची भावंडं त्या काळात विद्यापीठ शाळेत शिकायला होती.



काळ झपाट्यानं बदलत गेला. तुमची कीर्ती दिगंत पसरली. जयप्रभा स्टुडिओ अडचणीत आला तेव्हा तो वाचवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला. नंतरही भालजींना भेटायला तुम्ही वेळोवेळी यायचात. भालजी जिवंत असेपर्यंत स्टुडिओत त्यांचाच शब्द अखेरचा राहील अशी भूमिका घेऊन तुम्ही शेवटपर्यंत त्यांचा योग्य मान राखलात! कोल्हापूरशी तुमचं नातं नेहमीच जिव्हाळ्याचं राहिलं आहे. कधी कोल्हापूरकर तुमच्यावर रागावले, तर कधी तुम्ही कोल्हापूरकरांवर रागावला, पण हे रागावणं आपल्या हक्काच्या माणसांवरचं रागावणं होतं. छत्रपती शिवाजी स्टेडियमची उभारणी करताना त्याच्या मदतीसाठी तुम्हाला कार्यक्रम करण्याची विनंती केली तेव्हा तुम्ही ती तत्काळ स्वीकारली होती. कोल्हापुरात शासकीय मेडिकल कॉलेज उभारण्याची निश्चिती झाल्यानंतर राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी तुम्हाला राज्यसभेच्या खासदार या नात्यानं मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी निधी मागितला आणि तुम्हीही तो खळखळ न करता दिला.

दीदी, ‘भगवंताच्या बासरी’शी कलापूर कोल्हापूरचं नातं पूर्वापार जिव्हाळ्याचं होतं आणि आहे. रूसवे-फुगवे प्रत्येक घरात होत असतात, पण म्हणून मनातलं आपलेपण कमी होत नाही. दीदी, तुमच्या सांगीतिक वाटचालीचा आम्हाला पुरेपूर अभिमान आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला आणखी खूप व आरोग्यसंपन्न आयुष्य लाभावं हीच मनापासूनची इच्छा!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
 

Web Title: melody queen Lata Mangeshkar turns 90

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.