पंडितजी, मंडईतली पहाट आणि हमाल...; मैफिलीची सुरुवातही मोठी रंगतदार  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 06:19 AM2022-02-19T06:19:13+5:302022-02-19T06:19:38+5:30

आता पंडितजींनी मांडीवरची शाल काढली, की त्यांच्यामागोमाग सगळे उठणार ! तेवढ्यात रिकाम्या झालेल्या समोरच्या जागेतून एक हमाल घरी निघालेला पंडितजींना दिसला.

Memorable story of Pandit Bhimsen Joshi's concert | पंडितजी, मंडईतली पहाट आणि हमाल...; मैफिलीची सुरुवातही मोठी रंगतदार  

पंडितजी, मंडईतली पहाट आणि हमाल...; मैफिलीची सुरुवातही मोठी रंगतदार  

Next

सुधीर गाडगीळ, ख्यातनाम लेखक, संवादक

पंडित भीमसेन जोशी यांच्यासोबत त्यांच्या संतवाणीचं निरूपण करणं ही माझ्या आयुष्याच्या मर्मबंधातली मोठी अमूल्य ठेव आहे. व्यायामाने कमावलेली भरदार शरीरयष्टी, कुरळे केस आणि भव्य भालप्रदेशाचे देखणे पंडितजी मैफिलीच्या ठिकाणी गाडीतून उतरत तेच मुळी एखाद्या रसिकराजासारखे!  मैफिलीची सुरुवातही मोठी रंगतदार . तानपुरे लागलेले, टाळ तापलेले आणि समोर उत्सुक रसिकवृंदाची गर्दी!  रंगमंचावरच्या त्या भारलेल्या वातावरणात पंडितजी येऊन स्थानापन्न झाले की पुढला क्रम ठरलेला असे.. ते सगळ्या वादकांकडे एकदा नजर टाकणार.. मग माउली टाकळकरांकडे पाहात नजरेनेच विचारणार, काय माउली? करूया सुरू?.. माउलींनी हसून होकार भरला की मग पंडितजी मांडीवरची शाल नीट करणार, गळ्याशी हात घालून अंगरख्याच्या आतलं जानवं चाचपणार, सोन्याच्या साखळीला स्पर्श करणार ... की मग डोळे मिटून पहिला स्वर लागणार !

त्याकाळी उघड्यावर मैफिली रंगत. मध्यरात्र उलटून गेली  तरी गवई थकत नसत आणि श्रोतेही जागचे हलत नसत. मला आठवतं, पुण्याच्या मंडईत संतवाणीचा कार्यक्रम होता. ओपन एअर. खच्चून गर्दी लोटलेली. मध्यरात्र उलटून गेल्यावर दोनच्या सुमारास पंडितजींनी शेवटचा गजर थांबवला आणि डोळ्यातलं तृप्तीचं पाणी पुसून श्रोते आपापल्या घराकडे निघाले. पांगापांग सुरु झाली. कलाकारांनीही आवरासावर सुरु केली. आता पंडितजींनी मांडीवरची शाल काढली, की त्यांच्यामागोमाग सगळे उठणार ! तेवढ्यात रिकाम्या झालेल्या समोरच्या जागेतून एक हमाल घरी निघालेला पंडितजींना दिसला. त्यांनी सहजच हाळी देऊन विचारलं, काय ? आवडलं का?
तो हमाल त्यांच्याकडे पाहात म्हणाला, ब्येस झालं सायेब, पन त्ये “जो भजे हरिको सदा” घ्याला पायजे हुतं !-

....मांडीवरची आवरायला घेतलेली शाल पंडितजींनी पुन्हा पसरली. साथीदारांना तेवढा इशारा पुरेसा होता. सगळ्यांनी आपापली वाद्यं लावली. टाळ पुन्हा सरसावले गेले. माउलींनी ताल दिला आणि समोर बसलेल्या त्या एकट्या हमालासाठी पंडितजींनी सुरु केलं... जो भजे हरिको सदा, वोही परमपद पावेगा...त्या पहाटे आम्ही घरी पोचलो तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात  त्या अद्वितीय आठवणीचा आनंद होता - आजही माझ्या अंगावर ते रोमांच आहेत !

 

Web Title: Memorable story of Pandit Bhimsen Joshi's concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.