आता वळू नका, रणि पळू नका, कुणी चळू नका...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2024 08:14 AM2024-08-01T08:14:31+5:302024-08-01T08:15:44+5:30
सामान्यांचे प्रश्न अधांतरी ठेवणाऱ्या या छळणाऱ्या काळात चळवळींचा झपाट्याने संकोच होत असताना या प्रज्ञावंतांची पुनर्भेट अत्यावश्यकच आहे!
डॉ. रणधीर शिंदे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष संपून नुकतीच दोन वर्षे झाली आहेत. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या आडवळणाच्या गावी जन्मलेल्या अण्णा भाऊंनी महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात हिरिरीने सहभाग घेतला. संयुक्त महाराष्ट्रासह स्वातंत्र्यानंतरच्या कष्टकऱ्यांच्या अनेक आंदोलनात अण्णा भाऊ आघाडीवर राहिले. त्यांनी कलापथकांचे नेतृत्व केले. आपल्या बुलंद पहाडी आवाजाने लोकजागृतीचे स्फुल्लिंग चेतविले. मुंबईच्या झुंजार कामगार जीवनाने आपल्याला घडवले आहे याची नम्र भावना त्यांच्या मनात होती.
अण्णा भाऊंचा संवेदनशील स्वभाव व विचारदृष्टी घडविण्यात मुंबई शहराचा मोठा वाटा आहे. त्यांनी कथा, कादंबऱ्या, वगनाटके, प्रवासवर्णन, गाणी, पोवाडे लिहिले ते सामाजिक बांधिलकीचे. त्यांच्या जीवनकार्यातून आजच्या समाजाने काय बोध घ्यायचा, ते आजच्या संदर्भात पहायला हवे.
आजच्या जीवनाची गती आणि वेग विस्मयकारी आहे. हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे, नवभांडवली व्यवस्थेचे जग आहे. आधुनिकोत्तर काळाचे चित्रविचित्र पेच आणि मोबाइल स्क्रीनवर विसावलेल्या सेल्फी समाजाचे जग आहे. सामान्यांचे प्रश्न अधांतरी ठेवणारा हा छळणारा काळ आहे. चळवळींचा झपाट्याने संकोच झाला आहे. समाज प्रश्नांविषयी कुणाला फारशी आच नाही. अशावेळी अण्णा भाऊंच्या कार्याचे स्मरण आणि पुनर्भेट आवश्यक आहे.
अण्णा भाऊंनी सामाजिक हस्तक्षेपाच्या भूमिकेला आणि कृतीला महत्त्व दिले. आपल्या वाङ्मयातून झुंजार आणि लढवय्या कामगारांचे जग मांडले. वंचित जगाची संवेदना, अस्मिताहीन समाजाचे दुःख आणि वेदना मांडली. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणाऱ्या, बंडखोर माणसांचे जग मांडले. अण्णा भाऊंच्या कथा- कादंबऱ्यांतील नायिका अत्यंत तेजस्वी आणि बाणेदार आहेत. त्यांनी भटक्या समाजाच्या व्यथाकथांचा प्रदेश मराठी साहित्यात आणला. महानगरातील दारिद्र्य आणि पराकोटीच्या भुकेचे व्याकूळ दर्शन घडविले. गावगाड्यातील जातीय विषमतेचे दर्शन घडविले. मराठी साहित्याला परंपरा आणि रुढीविरुद्धचा स्वर दिला.
अण्णा भाऊंच्या शाहिरी काव्याची भूमी ही अमळनेरच्या हुतात्म्यांपासून, मुंबईचा दंगा, प्रतिसरकारचा लढा, पंजाब-दिल्ली दंगा ते स्तालिनग्राडचा पोवाडा अशा स्थानिक ते आंतरराष्ट्रीय राजकारणाची होती. आंबेडकरी विचारविश्वावर त्यांची अढळ श्रद्धा होती. म्हणूनच ‘जग बदल घालुनी घाव / सांगून गेले मला भीमराव’ अशी परिवर्तनाची कविता त्यांनी लिहिली. ‘पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या आणि दलितांच्या तळहातावर तरली आहे’ हे अण्णा भाऊंनी निक्षूण सांगितले.
अण्णा भाऊंनी महाराष्ट्राला ‘फकिरा’सारखा नवा इतिहासनायक दिला. बुलंद धैर्याची आणि शौर्याची संघर्षरत ‘रानवेडी’ मराठी माणसे हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे दिगंतात दौडणारे वीरनायक अण्णा भाऊंच्या साहित्यात पदोपदी आहेत. त्यांनी या माणसांच्या स्वातंत्र्याची गाणी गायिली. त्यांच्या सबंध वाङ्मयात महाराष्ट्र प्रेमाची जादुई खेच आहे. त्यांनी नव्या अभंग महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले, मराठी मुलखाच्या कर्तबगारीचे पोवाडे गायिले. त्यांचा गण देखील प्रथम मायभूच्या चरणासाठी आहे. त्यांच्या साहित्यानेच ‘जागा रहा, जागा रहा, रात्र वैऱ्याची आहे’ ही जागप्रेरणा दिली.
अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्यातून मुंबईबरोबरच कृष्णा-कोयना-वारणेचा सजीव परिसर रेखाटला आहे. ‘तुणतुण्याचे आम्ही धनी/ सदा मैदानी’ अशा लोकसमूहगान परंपरेला त्यांनी नव्या काळातील परिवर्तनाचा साज चढवला. शाहिरी वाङ्मयाचे नूतनीकरण केले. तिला प्रबोधनाचा आशय दिला. अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्यातून नवी भाषा दिली. ती जशी भावपर आहे तशीच ती लढाऊ प्रतिकाराची आहे.
म्हणून संभ्रम आणि मानवीयतेचा अधिकाधिक संकोच होत असणाऱ्या आजच्या काळात अण्णाभाऊ साठे यांच्या समाजकार्याचे व वाङ्मयाचे स्मरण भारतीय समाजाला आवश्यक आहे. ‘आता वळू नका/ रणि पळू नका/ कुणी चळू नका/ बिनी मारायची अजून राहिली’ अशा अधुऱ्या स्वप्नाची याद देणाऱ्या या प्रज्ञावंताला वंदन.
rss_marathi@unishivaji.ac.in