विकासाचं ताट अन् पहिला घास !
By राजा माने | Published: August 14, 2018 12:20 AM2018-08-14T00:20:45+5:302018-08-14T00:21:11+5:30
एक राजबिंडा राजकारणी, दिलदार मित्र आणि सर्व स्तरातील लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या विलासरावांनी ज्या-ज्या वेळी त्यांच्यासमोर विकासाचे ताट आले, त्या-त्या वेळी त्यांनी पहिला घास...
विलासराव देशमुख यांचे अकाली जाणे उभ्या महाराष्टÑाला चटका लावून गेले. राजबिंड्या व्यक्तिमत्त्वाला दिलदार मनाची जोड लाभणे, हे भाग्याचे मानले जाते. त्या अर्थाने ते किती भाग्यवान होते, याचा अनुभव त्यांचा सहवास लाभलेल्या आणि न लाभलेल्या देखील व्यक्तींना यायचा. १९७० च्या दशकात उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील विलास देशमुख बाभळगावकर हा तरुण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून धडपड करायचा. त्या धडपडीला पदाची जोड देण्याचे काम त्यावेळचे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष उल्हास पवार करतात आणि तो तरुण उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष बनतो ! त्या काळातही पुण्यातील शिक्षण व वास्तव्याने संस्कारित झालेले नव्या जमान्याची भाषा बोलू लागतो. ग्रामपंचायतीतून फक्त भाषाच नाही तर बदलत्या काळाची दिशा घेऊनच बाभळगावात काम करतो. बाभळगाव ते मुंबई आणि मुंबई ते राजधानी दिल्ली असा ऐतिहासिक प्रवास करणारा विलास देशमुख बाभळगावकर या तरुणाने संपूर्ण राज्यातील सामान्य माणसांच्या हृदयात ‘विलासराव देशमुख’ हे नाव कोरले !
आज विलासरावजींच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या स्मृती जागवताना या इतिहासाची आठवण अनेकांना झाल्याशिवाय राहत नाही. उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या ऐतिहासिक कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला. केवळ जिल्हा निर्मितीनंतरच्या इमारती उभ्या करून समाधान मानणे हा त्यांचा पिंड नव्हताच! त्यामुळे विकासाचे प्रत्येक दालन खुले करताना त्यांनी लातूरच्या बाबतीत ‘जे नवे ते लातूरकरांना हवे’ हा मंत्र सदैव कृतीने जतन केला. तो करताना मिळालेल्या प्रत्येक पदाचा उपयोग त्यांनी लातूर जिल्ह्यासाठी काही तरी नवे देण्यासाठी केला. स्व. शंकरराव चव्हाण यांचे राजकारणातील मानसपुत्र म्हणून केवळ ते वावरलेच नाहीत तर स्व. शंकररावजींच्या कार्यपद्धतीचा अमल देखील त्यांनी पदोपदी केला.
मराठवाड्याला वरदायिनी ठरलेल्या जगातील पहिले मातीचे धरण बांधण्याचा इतिहास स्व. शंकररावजींनी त्यांच्या नावावर नोंदला. अशा गुरूचे बोट धरून राजकारण केलेल्या विलासरावांनी तोच कित्ता गिरविला. बालाघाटच्या माळरानावर मांजरा सहकारी साखर कारखान्यासारख्या प्रकल्पाची उभारणी करून त्यांनी मराठवाड्यातील शेतकºयांच्या जीवनाला नवी दिशा दिली. त्याच दिशेने शिक्षण असो वा कला, प्रत्येक क्षेत्रात ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले.
महाराष्टÑाच्या राजकारणात सर्व स्तरातील लोकसंपर्क आणि लोकप्रियता संपादन केलेल्या विलासरावांनी राज्याच्या उद्योग क्षेत्रापासून सिंचन क्षेत्रापर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात नवा दृष्टिकोन निर्माण केला. त्याच कारणाने सिंचन क्षेत्रात फलदायी ठरलेला बॅरेजेस प्रकल्प आज त्यांच्याच नावाने ओळखला जातो. राजकारणातील अनेक वादळे अंगावर घेताना त्यांना १९९५ साली विधानसभा निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागले. तरीही तो पराभवही त्यांनी राजकारणातील ‘एक अपघात’ म्हणून खिलाडूवृत्तीने स्वीकारला. लातूरकरांनीही पुन्हा विक्रमी मतांनी त्यांना विधानसभेत धाडले आणि ते मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री असो वा केंद्रीय मंत्री पद कुठलेही असेल ‘ज्या-ज्या वेळी विकासाचे ताट समोर आले, त्या-त्या वेळी त्यातील पहिला घास त्यांनी कधी लातूरसाठी, कधी मराठवाड्यासाठी तर बºयाच वेळा राज्यासाठी बाजूला काढून ठेवला...