समाजातील लोकांची मानसिकताच अपराधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:29 AM2019-05-08T06:29:42+5:302019-05-08T06:32:44+5:30
वयात आलेल्या मुला-मुलींना जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. पूर्वीच्या पिढ्यांनी त्यासाठी लावलेले जाती-धर्माचे निकष नव्या पिढ्यांना मान्य होतीलच असे नाही. हा एखाद्या जातीचा, गावाचा अपराध नव्हे, तो समाजाचाही गुन्हा आहे.
मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून ती व तिचा नवरा माहेरी आले असता त्यांना मारहाण करून व घरात कोंडून जाळून टाकण्याचा नगर जिल्ह्यातील निधोज या गावी घडलेला प्रकार जेवढा अघोरी तेवढाच तो समाजविरोधी आहे. या प्रकरणातील आरोपींना कायदा कठोरातली कठोर शिक्षा देईलही. मात्र ही घटना समाजाला फार हादरून टाकणारी व त्याच्या प्रगतीविषयक सद्य:स्थितीविषयी त्याला अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडणारीही आहे. लोकशाहीतील मताधिकाराने व स्वातंत्र्य आणि समतेसारख्या अधिकारांनी समाजमन अधिक खुले व मोकळे होण्याची गरज आहे.
अशा अवस्थेत आपापल्या जाती-धर्मांची कुंपणे आतून घट्ट व मजबूत करणाऱ्या कर्मठ मनोवृत्ती सर्वच जाती-धर्मात अजून राहिल्या आहेत व त्या आपल्याच पोटच्या मुलांचा जाळून खून करण्याएवढ्या दुष्ट व भीषण पातळीवर जाणाºया आहेत. आपली सामाजिक सुधारणा नुसती व्यर्थच नव्हे तर वाया गेली आहे, असे म्हणायला लावणारी ही स्थिती आहे. राजा राममोहन राय, जोतिबा, गांधीजी, आंबेडकर आणि सावरकर ही सारी मोठी माणसे जातीच्या बंधनांविरुद्ध होती. आंतरजातीय विवाह दोन्ही बाजूंच्या मान्यतेने होत असतील तर त्यांचा गौरव करणारी होती. समाजात खरे ऐक्य व आपलेपणा वाढीला लागायचा असेल तर त्यावर आंतरजातीय विवाह हाच खरा व प्रमुख मार्ग आहे असे ते म्हणत. शाळा-कॉलेजांतूनही हे साऱ्यांच्या कानीकपाळी ओरडून सांगितले जाते. पण महापुरुषांची शिकवण आणि प्रगतीचे धडे समाजाच्या कानापर्यंतच जात असतील आणि मनापर्यंत पोहोचत नसतील तर समाजात असे अघोरी प्रकार घडतच राहणार. रुक्मिणी आणि रणसिंग हे वधू-वर त्यांच्याच कुटुंबीयांकडून जाळले जाणार असतील तर हा सुधारणेचा इतिहास या समाजावर कोणताही परिणाम करू शकला नाही, असेच म्हटले पाहिजे. देशात स्वातंत्र्य आहे, वयात आलेल्या मुला-मुलींना आपला जोडीदार निवडून घेण्याचा अधिकार आहे.
पूर्वीच्या पिढ्यांनी त्यासाठी लावलेले जाती-धर्माचे निकष नव्या पिढ्यांना मान्य होतीलच असे समजण्याचेही कारण नाही. सबब ती मुले व मुली आपले साथीदार निवडतात. तसे निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना असणे ही अभिमानाचीही बाब आहे. मात्र त्यांच्यावर आपला कौटुंबिकच नव्हे तर मालकी हक्क सांगणारी जुनी पिढी त्यांना तिचे जुने निकष व अटी लावीत असेल तर ते त्यांच्या कर्मठच नव्हे तर मागासलेल्या मनोवृत्तीचे चिन्ह मानले पाहिजे. शाळेत ‘जात’ नाही, वर्गात नाही, नोकरीत नाही आणि आता समाजातही नाही. असलीही तरी ती आता संपण्याचा मार्गावर आहे. या स्थितीत तीच ती जुनी कुंपणे नव्या पिढ्यांभोवती लावण्यात ज्यांना परंपरेचा अभिमान व घराण्याची श्रेष्ठता दिसते त्यांना परंपराही कळली नसते आणि घराण्याचे तत्त्वही समजले नसते.
परंपरा आणि प्रतिष्ठा या काळानुरूप बदलणाºया बाबी आहेत आणि ते ओळखणे हे जुन्या पिढ्यांचे काम आहे. ते ओळखून नव्या जगाला सामोरे जाण्यासाठी मन व घर खुले करणे ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु या मार्गात अडचणी फार आहेत आणि त्या पुन्हा जुनाट व पारंपरिकच आहेत. अजून येथे जातींचे मोर्चे निघतात, जातीनिहाय मतदान केले जाते, जातींची व्यासपीठे उभी होतात, फार काय, एकेका जातीचा एकेक राजकीय पक्ष आपल्या राजकारणात असतो. पराकोटीचा विरोध, अवहेलना आणि तिरस्कार सोसून आंतरजातीय विवाह करण्यासाठी धैर्य लागते. या साºयांना भेदून आंतरजातीय विवाहापर्यंत जाणे ही गोष्ट साधी नाही. ज्यांना ती साधली त्यांचे अभिनंदन व स्वागत. मात्र जातीपाशी व धर्मापाशी अडकलेल्यांचे व त्यांना राजकीय पाठबळ देणा-या व्यवस्थेचे काय करायचे? ज्यांच्या राजकारणाचा व समाजकारणाचा भरच जातीवर आहे ते कर्मठ त्यातील भिंती आणखी मजबूतच करणार. त्याला परंपरेचा मुलामाही देणार. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात जे घडले तो एका घराचा, कुटुंबाचा, जातीचा व गावाचा अपराध नव्हे, तो समाजाचा व राजकारणाचाही गुन्हा आहे. तशी मानसिकता बाळगणारा प्रत्येकच जण यातला अपराधी आहे.