तारतम्यकार शरद पवार
By admin | Published: October 8, 2016 03:58 AM2016-10-08T03:58:12+5:302016-10-08T03:58:12+5:30
हे तर काहीच नाही, आमचा काळ पाहा’ असं सतत आणि कोणत्याही बाबतीत म्हणणारा एक संवर्ग समाजात नेहमीच उपस्थित असतो.
हे तर काहीच नाही, आमचा काळ पाहा’ असं सतत आणि कोणत्याही बाबतीत म्हणणारा एक संवर्ग समाजात नेहमीच उपस्थित असतो. ‘आमच्या काळात एका आण्यात पाच रत्तल शुद्ध तूप मिळायचं, लोक काठीला सोनं बांधून काशी यात्रेला जायचे आणि तुमचं पाहा, एकदम भुक्कड’ असे बद्धकोष्टी उद्गार ही मंडळी सतत काढीत असतात. पण शरद पवारही या संवर्गातले असावेत असं आजवर कधी वाटलं नव्हतं. पण आता तेही या संवर्गात सामील झालेले दिसतात. कदाचित वाढत्या वयाचा तो परिणाम असावा. त्यामुळे मोदी सरकार काय डिंडिम वाजवून राहिलंय, संपुआच्या काळात पाहा, एक दोनदा नव्हे तर तीनदा लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानवर शल्यकर्मी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक) केला होता पण आजच्यासारखा तेव्हांच्या आमच्या संपुआ सरकारनं त्याचा गवगवा किंवा गाजावाजा मात्र केला नव्हता, असं पवारांचं म्हणणं आहे. ज्या काळाची गोष्ट पवार करतात त्या काळात ते देशाचे संरक्षण मंत्री नव्हते. त्याच्या खूप आधी म्हणजे नरसिंहराव यांच्या काळात त्यांच्याकडे ते पद होते पण मध्येच रावांनी त्यांच्याकडील देशाच्या संरक्षणाची जबाबदारी काढून घेऊन मुंबईच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविली होती. म्हणून काय झाले, पवार मुळातच अष्टावधानी असल्याने संपुआच्या सत्ताकाळात शेतीकडे पाहाता पाहाता किंवा न पाहाता पाहाता ते सीमेकडेही नक्कीच बघत असणार. त्यामुळेच ते इतक्या अधिकारवाणीने बोलू शकतात. खरे तर इतके मोठे रहस्य संपुआ सरकारच्या कर्त्याधर्त्या सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनीच खुले करायला हवे होते. पण तसे काहीही न करता उलट विद्यमान पंतप्रधान मोदी आणि लष्कर यांचे अभिनंदन करुन ते मोकळे झाले. कदाचित त्यांना मोदींकडून एखाद्या महामंडळाच्या अध्यक्षपदाची किंवा अगदी काहीच नाही तर गेला बाजार सदस्यपदाची अभिलाषा असावी. अन्यथा त्यांनी काहीच का बोलू नये बरे? पण पवार तसे नाहीत. त्यांच्यासारखा निस्वार्थी व नि:संग राजकारणी होणे नाही. त्यामुळे आपणच हे रहस्योद्घाटन केले पाहिजे असा विचार त्यांनी केला असावा. संपुआ सरकारने केवळ देशहित डोळ्यासमोर ठेऊन त्या हल्ल्यांचा गवगवा केला नाही असेही पवारांचे म्हणणे आहे. त्याचा तपशील मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे दिला नाही. तथापि शत्रू देशाला पाणी पाजण्याचे जाहीर न करणे यातच देशहित सामावलेले असेल तर मग इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आजवर देश-विदेशात झालेल्या युद्ध आणि लढाया यांची जी वर्णने आली आहेत त्या साऱ्या देशांनी व त्या त्या काळातील नेत्यांनी देशहिताकडे काणाडोळा केला असेच म्हणावे लागेल आणि ते खरेही मानावे लागेल कारण पवार कधी असत्य बोलत नाहीत. पवार ज्या तीन हल्ल्यांचा उल्लेख करतात त्या हल्ल्यांची जी वर्णने अन्यत्र आली आहेत, त्यामध्ये या सर्व प्रकरणात भारताने घुसखोरी करुन आपले सैन्य मारल्याचा ‘कांगावा’ पाकिस्तानने केला असे म्हटले आहे. पवारांच्या कथनाचा मतलब इतकाच की त्या काळी पाकने जे म्हटले तो त्या सरकारचा कांगावा नव्हता तर ते सत्य होते आणि म्हणूनच पवार ज्या सरकारचे घटक होते त्या संपुआ सरकारची ती लबाडी होती. खरे असू शकते हे, कारण पवार स्वत: लबाडी करीत नाहीत. पवारांनी नागपुरात संपुआ सरकारची शौर्यकथा सादर केल्यानंतर उचापतखोर माध्यमांनी लगेच तत्कालीन लष्करी कारवाई महासंचालक विनोद भाटिया यांच्याशी संपर्क साधला पण त्यांनी पवारांचा दावा खोडून काढीत आपल्या म्हणजेच संपुआच्या काळात कधीही पाकिस्तानवर आताच्या सारखा शल्यकर्मी हल्ला केला गेला नव्हता असे स्पष्टपणे सांगितले. पण त्यात त्यांचाही काही स्वार्थ असू शकतो. पवार कशाला उगाचच इकडचं तिकडं करतील? पवारांच्या काळात (उगाच संपुआला आता कशाला श्रेय द्यायचे?) इतके तीन हल्ले केले गेले पण त्याची वाच्यता न केल्याने किती लाभ झाले याची गणतीच नाही. त्या तुलनेत आजचे पाहा. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची देहबोली बदलली, जगातील बव्हंशी लहानमोठ्या देशांनी पाकी दहशतवादाचा निषेध केला, अतिमोठ्या देशांनी पाकचे कान उपटले, सार्क परिषदेचे दिवाळीआधीच दिवाळे वाजले, पाकिस्तानला एकाकी पाडण्यात भारताला यश प्राप्त झाले, हे एकाकीपण असह्य होऊ लागल्याने आपल्या देशातील दहशतवाद्याना समूळ उखडून लावा असा आदेश पंतप्रधान शरीफ यांना लष्करप्रमुख राहील शरीफ यांना द्यावा लागला, मसूद अझर व हाफीझ सईद याना कुरवाळणेच देशाच्या एकाकीपणास कारणीभूत ठरत असल्याने त्याना कुरवाळणे बंद करण्याची मागणी सुरु झाली. हे सारे याआधी कधीच घडले नाही. कारण तेव्हां गवगवा न करण्याचे तारतम्य बाळगले गेले व आता त्या तारतम्याला सोडचिठ्ठी दिली गेली. जे काही करायचे ते गुपचूप, हा धडा आता तरी मोदींनी पवारांकडून शिकावा हेच बरे!