निरोप

By admin | Published: June 30, 2016 05:46 AM2016-06-30T05:46:30+5:302016-06-30T05:46:30+5:30

आमुचा रामराम घ्यावा़़़ असं म्हणणाऱ्या तुकोबांचा आपण कधीतरी निरोप घेऊ शकू का?

Message | निरोप

निरोप

Next


आजोबांची काकडारती ऐकणं वृषालीला खूप आवडायचं आजोळी तिचा दिवस पहाटे सुरू व्हायचा तो आर्त स्वरातील भूपाळी, भजनं, आरती ऐकत, नव्हे अनुभवत़ विशेषत: शेवटी आजोबा घ्यायचे तो ‘सद्गुरूंचा निरोप’
प्रेमात राम रमतो,
प्रेमाला मोल ना जगामाजी
हाचि निरोप गुरूंचा,
गुरूरायाला तहान प्रेमाची॥
वृषुच्या मनात यायचं हा निरोप देतोय कोण? तेही सद्गुरूच नव्हेत का? अन् घेणारे आजोबा? त्यांच्यातही सद्गुरूंचा अंश नाही का? निरोप खरंच घेता येतो? तिच्या मनात ‘गीतरामायणातलं’ गीत गुंजू लागलं़़़
निरोप कसला माझा घेता
जेथे राघव तेथे सीता ॥
खरंच आहे़ आपणही विचार केला तर आपल्या लक्षात येतं़़़
आम्ही जातो आपुल्या गावा
आमुचा रामराम घ्यावा़़़
असं म्हणणाऱ्या तुकोबांचा आपण कधीतरी निरोप घेऊ शकू का? तुका काय फक्त देह होता, देहूला जगून गेलेला? का विदेही तुका आकाशाएवढा होता़़़ नि म्हणून तो आजही आहेच़़़़ तो असणारच आहे? त्याची वाणी ‘अभंग’ नाही का? काही जण म्हणतात ‘आपण प्रत्येक वेळी भेटतो तेव्हा नव्यानंच भेटतो. खरं आहे. कारण जीवनातील अनुभव आपल्याला सतत नवीन बनवत असतात़ पण ऋणानुबंध म्हणून काही असतंच की! ऋणानुबंधाच्या गाठीत मोठी तुष्टता, मोठा आनंद असतो़’ साधूसंतांचे ऋणानुबंध साऱ्या मानवजातीशीच नव्हे तर वृक्ष-वल्ली-वनचरे अशा सर्वांशीच असतात़ ‘जे जे भेटे भूत। ते मानिजे भगवंत’ किंवा ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणणारे ज्ञानोबा कधी कुणाचा निरोप घेऊ शकतील का? म्हणूनच नाही का त्यांनी ‘संजीवन समाधी’ घेतली? ते गेले नाहीतच़ त्यांचा निरोप कसा घ्यायचा? एक मात्र आहे़ निरोप म्हणजे संदेश़़़़ शिकवण़ ही संतांची शिकवण ‘एक तरी ओवी अनुभवावी’ यासाठी सांगायची़़़ त्यांची पत्रं वाचायची नि त्यातला निरोप सांगायचा़ त्यासाठी केलं जाणारं ‘निरूपण’ हाच संतांचा निरोप असतो़ तोच त्या पंढरीच्या विठूचाही निरोप असतो़ तो बाहेरून कुणी आणत नाही़ आतूनच ऐकू येतो़ मग ‘पावले चालती पंढरीची वाट’़ आषाढी-कार्तिकी हे केवळ निमित्त असतं़ या वाटेवरचे सारे केवळ ‘वारीकरी’ नसतात तर ‘वारकरी’ असतात़ अहंकारावर वार करणारे!
या दृष्टीनं पू़ गोंदवलेकर महाराजांचा निरोप स्पष्ट आहे़़़़
अभिमान शत्रु मोठा,
सर्वांना जाचतो सुखाशेने ।
हाचि निरोप गुरूंचा,
मारावा तो समूळ नामाने॥
हे नाम हीच ज्ञानदेवांची संजीवन समाधी आहे़ ‘समाधि साधन संजीवन नाम’ हाच माऊलीचा निरोप आहे़ शेवटी एवढंच लक्षात ठेवू या,
अवघे जीवन नामार्पणमस्तु
-रमेश सप्रे

Web Title: Message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.