निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2017 11:57 PM2017-04-04T23:57:48+5:302017-04-04T23:57:48+5:30

ताईंच्या शरीराला अखेरचा प्रणाम केला आज,पण त्या आहेत.. असतीलच!!!

Message | निरोप

निरोप

Next

ताईंच्या शरीराला अखेरचा प्रणाम केला आज,
पण त्या आहेत.. असतीलच!!!
माझी आणि तार्इंची पहिली भेट १९८० मध्ये झाली. मला शिष्यवृत्ती मिळाली होती. मी, माझे आई-बाबा तार्इंकडे गेलो होतो. त्यावेळी तार्इंनी पहिल्यांदा माझं गाणं दहा एक मिनिटं ऐकलं. तिथे वामनराव देशपांडे होते. माझं गाणं संपल्यावर देशपांडे तार्इंना म्हणाले, ‘आरतीला गाणं शिकव.’ ताई दोन मिनिटं गप्प राहिल्या. मग म्हणाल्या, उद्यापासून ये. मी शिकवीन तुला!
- केवढा सोन्याचा क्षण आयुष्यातला. एका दृष्टिहिनाला डोळा मिळावा तसं मला झालं. त्यानंतर अनेक वर्षे मी तार्इंकडे गाणे शिकत होते. तार्ई म्हणजे अफाट बुद्धिमत्ता आणि अद्भुत आवाज. त्यामुळे त्यांचं गाणं हे मन जाईल तिथपर्यंत जायचं.
संगीत हे अध्यात्म होतं त्यांच्यासाठी. त्यामुळे त्यांचं संगीत हे फक्त मनाला, बुद्धीला भावून थांबायचं नाही, अंत:करणातील अंधाऱ्या कोपऱ्यालाही स्पर्शून जायचं. आपले आपणही या कोपऱ्यापर्यंत पोहचत नाही, त्यांचे स्वर मात्र सहज तिथपर्यंत पोहचत.
तार्इंबरोबर अनेक ठिकाणी फिरले आहे. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. एका कार्यक्रमासाठी आम्ही गेलो असताना त्यांनी घेतलेल्या नवीन साडीची घडी त्यांनी मला मोडायला दिली. त्या गुरुमाउली होत्या. तार्इंच्या घरी गाणं शिकणं हा एक वेगळा, अद्भुत असा अनुभव होता. आम्ही एका खोलीत तानपुरा, स्वरमंडल अशी जुळणी करत असायचो.
त्यावेळी घंटानाद ऐकू यायचा, उदबत्तीचा सुगंध दरवळायचा तेव्हा कळायचं, तार्इंची पूजा झाली आता त्या शिकवायला येणार. त्यांनी रियाजाच्या खोलीत पाऊल ठेवलं की बालाजीचा देव्हारा दर्शनासाठी खुला झाल्यावर जो भाव निर्माण होतो त्याची अनुभूती यायची. तार्इंनी गायला सुरुवात केल्यावर कळायचं, यमन आहे आज. मग अख्खा दिवस यमनचाच. ताई फार शिस्तबद्ध.
शिष्यांमध्ये मोठा दरारा. मी शिकायला सुरुवात केली तेव्हा १८ वर्षांची होते. मला साडी नेसता यायची नाही. पण तार्इंची शिस्त होती, साडी नेसूनच यायचे. त्या वेळेच्या खूप पक्क्या होत्या. उशीर, नियम मोडलेले त्यांना अजिबात आवडायचे नाहीत. त्यांनी सांगितलेला गृहपाठ करून जायलाच लागायचा.
...किती सांगू!!! शब्द अपुरे आहेत माझे. त्यांच्या शरीराला निरोप दिला मी आज.
पण ताई आहेत. इथेच आहेत... प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात आणि भोवतीच्या अवकाशातही!
- आरती अंकलीकर
(शिष्य आणि जयपूर अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका)

Web Title: Message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.