नक्षलग्रस्त भागात शांततेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:39 AM2018-03-01T00:39:03+5:302018-03-01T00:39:03+5:30
देशासमोर नक्षलवादाच्या रूपाने अंतर्गत दहशतवादाचे मोठे आव्हान आहे. केवळ बंदुकीच्या बळावर ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी विधायक आणि कृतिशील पावलेही उचलायला हवीत.
देशासमोर नक्षलवादाच्या रूपाने अंतर्गत दहशतवादाचे मोठे आव्हान आहे. केवळ बंदुकीच्या बळावर ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी विधायक आणि कृतिशील पावलेही उचलायला हवीत. यासाठी समाजाची भूमिका महत्त्वाची आहे. याच भावनेतून आदर्श मित्र मंडळ या नावाला जागून पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. नक्षलग्रस्त भागात सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना रुजविण्यासाठी नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. राष्ट्रीय उत्सव साजरे करण्यापुरते मर्यादित न राहता, सामाजिक जाणीव जपण्याचे हे काम महत्त्वाचे आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देताना सामाजिक चळवळ म्हणून या उत्सवातून काम व्हावे, ही अपेक्षाही केली होती. ती अपेक्षा अनेक मंडळांकडून पूर्ण होत आहे. सामाजिक कार्याचा वसा घेऊन सुरुवातीला कैद्यांच्या मुलांना शैक्षणिक साह्य करण्याचे काम हाती घेण्यात आले. धनकवडी येथे सन २००० मध्ये स्थापन झालेल्या या आदर्श मित्र मंडळाने तीन वर्षांपासून नक्षलग्रस्त भागात सामाजिक सलोखा, राष्ट्रीय ऐक्याची भावना रुजविणा-या उपक्रमांच्या माध्यमातून नवनवे प्रयोग सुरू केले. या कार्यात पुण्यातील श्रीकृष्ण तरुण मंडळ, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मेहुणपुरा मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ, रोटरी क्लब यांनी सक्रिय सहभाग घेतला. आदर्श मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष उदय जगताप यांच्या पुढाकाराने गडचिरोलीतील खेड्यापाड्यांत, नक्षलग्रस्त वस्त्यांमध्ये व आत्मसमर्पित नक्षलींच्या गावांत त्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केल्या. पाच ते दहा किलोमीटरचे अंतर पायी जाणाºया विद्यार्थ्यांना गतवर्षी सायकलवाटप करण्यात आले. २५ शाळांना खेळांचे साहित्य वितरित करण्यात आले. तीन ठिकाणी ‘ई-लर्निंग’ शाळा सुरू केली. दरम्यान, या उपक्रमांची दखल घेऊन राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यात १,२०० शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ उपक्रमाची घोषणा केली. येथील ३३ पोलीस ठाण्यांमध्ये ग्रंथालये सुरू करण्यात आली. येथील शाळांमध्ये समुपदेशनाचा ‘अग्निपंख’ हा उपक्रम राबविला. या उपक्रमामुळे नक्षलींचे आत्मसमर्पित होण्याचे प्रमाण वाढले. तीन वर्षांत ५६ नक्षलवाद्यांनी गांधी विचार व तत्त्वज्ञानावर आधारित परीक्षा दिली. त्यांचे मनपरिवर्तन झाल्याने त्यांनी आत्मसमर्पण केले. प्रत्येकाच्या मनात ‘जगा आणि जगू द्या’ ही भावना वृद्धिंगत व्हावी, यादृष्टीने ‘सामाजिक सद्भावना परीक्षा’ हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. गौतम बुद्ध, महावीर, गुरू नानक, मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, संत ज्ञानेश्वर या सर्वांनी अखिल मानवजातीला पे्रम, करुणा, शांततेचा संदेश दिला. आतापर्यंत १३ हजार ५०० जणांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. हाच ‘शांतता संदेश’ नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून जगभरात पोहोचविण्याचा संकल्प आदर्श मित्र मंडळाने सोडला आहे. त्यादृष्टीने ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शांतता संदेश वाचनाचा जागतिक विक्रम नोंदविण्यात येणार आहे. आत्मसमर्पित नक्षलवादी, पोलीस, नक्षलींच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाºयांचे कुटुंबीय, स्थानिक नागरिक तसेच डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट अशा विविध स्तरांतील सुमारे सात हजार व्यक्तींच्या उपस्थितीत शांतता संदेशाचे सामूहिक वाचन केले जाणार आहे. गडचिरोलीतील उडान फाऊंडेशनने कार्यक्रमांचे संयोजन केले आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची जागतिक नकाशावर नवी ओळख निर्माण करून देण्यात पुण्यातील सार्वजनिक मंडळाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल.
- विजय बाविस्कर