एम. एफ. हुसेन यांचे चित्र क्रिस्टिजच्या न्यूयॉर्क लिलावगृहाच्या ११८ कोटींना विकले जाते, तेव्हा..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 08:31 IST2025-03-24T08:31:02+5:302025-03-24T08:31:45+5:30
क्रिस्टिजच्या न्यूयॉर्क लिलावगृहाच्या वार्षिक कार्यक्रमात हुसेन यांच्या ‘ग्राम यात्रा’ या चित्राने मोठी किंमत मिळवली. या घटनेचे महत्त्व नेमके काय आहे?

एम. एफ. हुसेन यांचे चित्र क्रिस्टिजच्या न्यूयॉर्क लिलावगृहाच्या ११८ कोटींना विकले जाते, तेव्हा..
निखिल पुरोहित, कला गुंफणकार, कला लेखक
१९ मार्च २०२५ रोजी क्रिस्टिजच्या न्यूयॉर्क लिलावगृहाच्या ‘दक्षिण आशिया - आधुनिक आणि समकालीन कला’ या वार्षिक लिलावात भारतीय चित्रकलेने ११८ कोटींच्या क्लबात जाण्याचा विक्रम घडवला. एम. एफ. हुसेन यांनी १९५४ साली रंगवलेले हे सुमारे १४ फूट लांब तैलचित्र १३ भिन्न भागांतून भारतीय ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवते. शेतकऱ्याला मानवंदना देणारे हे चित्र प्रारंभी शीर्षकरहित होते. पुढे इब्राहिम अल्काझी यांनी ‘ग्राम यात्रा’ असे शीर्षक दिल्याची नोंद आहे.
डॉ. लिओन एलियास वोलोडार्स्की हे जागतिक आरोग्य संघटनेसाठी (WHO) दिल्ली येथे थोरॅसिक सर्जरी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी आले होते. त्यांनी १९५४ साली हुसेन यांचे हे चित्र विकत घेतले आणि १९६४ साली ओस्लो विद्यापीठ रुग्णालयाला दान केले. तब्बल ७० वर्षांनंतर क्रिस्टिजच्या लिलावाच्या निमित्ताने हे चित्र पुन्हा एकवार रसिकांसमोर आले. शंभर कोटींचा विक्रम घडवणाऱ्या या लिलावाला भारतीय कलाक्षेत्रातून निरनिराळे प्रतिसाद येताना दिसतात. आर्ट गॅलरींकडून या घटनेचे स्वागतच झाले असून भारतीय आधुनिक आणि नवोदित कलाकारांना, कला व्यापाराला तेजी येण्याची चाहूल वर्तवली जात आहे.
‘दक्षिण आशिया - आधुनिक आणि समकालीन कला’ या लिलावात १२७ आधुनिक आणि समकालीन कलाकारांच्या चित्रांचा समावेश आहे. क्रिस्तीजमधील दक्षिण आशियाई आधुनिक आणि समकालीन कलेचे प्रमुख निषाद अवरी यांनी गेली तेरा वर्षे अखंड प्रयत्न करून हे चित्र प्राप्त केले अशी चर्चा आहे.
हुसेन यांच्या या चित्राला ११८ कोटी रुपये (१३.८ दशलक्ष डॉलर्स) इतकी विक्रमी किंमत मिळाली असली, तरी कलेचा हा व्यवहार बराच गुंतागुंतीचा आहे. लिलावात जाहीर झालेल्या रकमेवर विविध प्रकारचे शुल्क आकारले जाते. विक्रेता कमिशन, खरेदीदार प्रीमियम, विपणन व कॅटलॉग शुल्क, विमा व हाताळणी शुल्क, विक्री कर/VAT, आणि काही ठिकाणी कलाकार पुनर्विक्री हक्क शुल्क अशा अनेक वजावटी होत जातात.
या विक्रमी विक्रीतील ११८ कोटींमधून ओस्लो रुग्णालयाला मिळणारी रक्कम साधारणत: ७८ कोटी एवढीच असू शकते. ही रक्कम रुग्णालयाच्या भावी डॉक्टरांचे प्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षणासाठी वापरण्यात येणार असल्याचे ओस्लो विद्यापीठाने जाहीर केले आहे.
या चित्राचे खरेदीदार अज्ञात असले तरी दिल्लीतील किरण नाडर संग्रहालय किंवा खुद्द किरण नाडर यांनीच ही खरेदी केली असावी असा अंदाज कला वर्तुळात बांधला जात आहे. या माहितीची पुष्टी झाल्यास या नव्या विक्रमी किमतीमुळे म्युझियमच्या स्थायी संग्रहात असलेल्या हुसेन यांच्या सर्व चित्रांचे एकंदर मूल्य वधारेल. शिवाय, खासगी संग्रहात असलेल्या हुसेन, सुझा, रझा अशा बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपच्या सर्वच चित्रकारांच्या चित्रांचे मूल्य बरेच वाढेल.
पर्यायाने एकंदर भारतीय आधुनिक कलावंतांच्या चित्रांच्या संग्रहाला वाव वाढेल. एरवी कमी प्रचलित कलाकारांच्या कलेची दखल घेतली जाईल आणि स्वातंत्र्यानंतर प्रवाहात घडलेल्या कलाकारांना योग्य जागा आणि सर्वांगीण मूल्यांकन मिळण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात वाढेल. धनिक संग्राहकांच्या प्रयत्नांनी स्मृतिआड झालेली अनेक चित्रे पुन्हा समोर येतील. या विक्रमाचा समकालीन कलेवर होणारा परिणाम मर्यादितच राहण्याची शक्यता असली तरी, एकंदर कलाक्षेत्रातील चलन बदलेल अशी चर्चा आहे.
आधुनिक आणि समकालीन कलेची दखल जागतिक पातळीवर घेतली जाण्याच्या अनेक ठळक घटना यानिमित्ताने आठवतात. म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, न्यूयॉर्क मधील गायतोंडे, नसरीन मोहम्मदी यांची चित्र प्रदर्शने आणि व्हेनिस बीएनाले २०२४ मधील भारतीय पॅव्हिलिअनची ठळक हजेरी ही याची साक्ष होय. डॉक्युमेंटा, जर्मनी सारख्या प्रदर्शनातील समकालीन भारतीय कलाकारांचा सहभागही महत्त्वाचा आहे. अर्थात, असे असले तरी चित्रानुभवाची आस, कलेविषयी समज आणि एकूणच दृश्य साक्षरता; याबाबत आपल्या देशाला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.
info.faandee@gmail.com